जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे अडीच हजार हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान
आठ तालुक्यातील १७० गावांना गारपीटीचा फटका, ३ हजार ४२३ शेतकरी बाधित

जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे अडीच हजार हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान
आठ तालुक्यातील १७० गावांना गारपीटीचा फटका, ३ हजार ४२३ शेतकरी बाधित
सांगोला (प्रतिनिधी): यंदाच्यावर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट कहर केला असून, मार्च महिन्यातील पाच दिवस गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला आहे. यात महसूल प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार २ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
उन्हाळ्याच्या कडाक्यात काही क्षण गारवा देणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी मात्र घातक ठरला. द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी यांसारख्या लाखोंची गुंतवणूक असलेल्या फळबागा गारांच्या माऱ्याने उध्वस्त झाल्या. गहू, हरभरा, ज्वारी, मका आणि भाजीपाला पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. अनेक ठिकाणी झाडांची पाने गळून पडली, फळे तुटून जमिनीवर साचली, तर काही ठिकाणी संपूर्ण बागा नष्ट झाल्याचे चित्र दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी झाली. कडक उन्हाळ्याने नागरिक त्रस्त झाले असतानाच त्यांना पावसाच्या हलक्या सरींनी गारवा अनुभवायला मिळाला. मात्र, अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीपिके, फळबागांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत असल्याचं दिसून आलं आहे. सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा समस्या निर्माण झाल्याने वातावरणात सातत्याने बदलत आहे. कधी अधिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापूर व अतिवृष्टी झाली. आता यंदाच्या वर्षी देखील गारपीट, अवकाळी पावसामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. या गारपीटीचा फटका जिल्ह्यातील १७० गावांना बसला असून त्यातून ३ हजार ४२३ शेतकरी बाधित झाले आहेत. यात २६४.७ हेक्टरवरील जिरायती पिके तर ८३०.७५ हेक्टर वरील बागायती पिकांचे तर १ हजार ३४३ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झालं आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील आठ गावांना गारपिटीचा तडाका बसला असून, ४२९ शेतकरी बाधित झाले आहेत. त्यात द्राक्षे, आंबा, केळी, खरबूज, ढोबळी मिरची, ज्वारी हरभरा, गहू, डाळिंब यासारख्या २२७.४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील ४२ गावातील ४६८ शेतकरी बाधित झाले आहे. यात आंबा, गहू, केळी, हरभरा, भोपळा, कलिंगडसह २८९ हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. मोहोळ तालुक्यातील १९ गावातील १ हजार ०७४ शेतकऱ्यांना गारपिटीचा तडाका बसला असून, द्राक्षे, गहू, आंबा, शेवगा, कांदा, हरभरा, पेरू या सारख्या ६४५ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त नुकसान फळबागांचे झाले आहे. माढा तालुक्यातील दहा गावातील ९७ शेतकरी बाधित झाले असून गहू, ज्वारी, द्राक्षे, पेरू, आंबा, डाळिंब, केळी यासारख्या ५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
पंढरपूर तालुक्यातील एका गावातील दोन शेतकरी बाधित झाले असून दोन शेतकऱ्यांचे तीन हेक्टर वरील द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यातील १९७ शेतकरी बाधित झाले असून गहू, हरभरा, मका, द्राक्ष, पेरू, आंबा व डाळिंब, भाजीपाला व इतर पिके अशा ३४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. माळशिरस तालुक्यातील ३२ गावातील ८२५ शेतकरी बाधित झाले असून गहू, हरभरा, मका, डाळिंब, केळी, द्राक्षे, पेरू अशा ६२१ हेक्टर वरील पिकांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. मंगळवेढा तालुक्यातील ३७ गावातील ३१ शेतकरी बाधित झाले असून २४५ हेक्टर क्षेत्रावरील मका, दोडका, द्राक्ष, लिंबू, आंबा, डाळिंब, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे.
फळबागांचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हवामानातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम, तर दुसरीकडे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ या दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. गेल्या वर्षी महापुराचा फटका बसल्यानंतर यंदा गारपिटीने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या या तडाख्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला असून, शासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



