पीकपेरणी

बंधारे कोरडे, सांगोल्यावर टंचाईचे सावट; केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक

टेंभूच्या उन्हाळी आवर्तनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा; पिके-फळबागा धोक्यात

बंधारे कोरडे, सांगोल्यावर टंचाईचे सावट; केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक

टेंभूच्या उन्हाळी आवर्तनाकडे शेतकऱ्यांच्या नजरा; पिके-फळबागा धोक्यात

सांगोला (तालुका प्रतिनिधी): उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने तालुक्यातील पाणीस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. माण व कोरडा नदीवरील बंधाऱ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने घटत असून, एकूण साठवण क्षमतेच्या तुलनेत केवळ ११ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, १८ बंधाऱ्यांची १३१८.५२ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असताना सध्या फक्त ७८.६१ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. परिणामी, शेतकरी व नागरिकांमध्ये टंचाईची भीती निर्माण झाली असून, सर्वांचे लक्ष आता टेंभू उपसा सिंचन योजनाच्या उन्हाळी आवर्तनाकडे लागले आहे.

गेल्या वर्षी दमदार पावसामुळे माण, कोरडा नदीसह ओढ्या-नाल्यांना मुबलक पाणी मिळाले होते. बंधाऱ्यांतील भरघोस साठ्याच्या भरोशावर नदीकाठच्या शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, ऊस, गहू, हरभरा तसेच डाळींबासारख्या नगदी-फळपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली. सध्या बहुतेक पिके जोमात असली तरी, वाढत्या उष्णतेमुळे सिंचनासाठी पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे बंधाऱ्यांतील साठा दिवसेंदिवस आटत चालला आहे.

बंधाऱ्यांतील सद्यस्थिती (दशलक्ष घनफूट/टक्केवारी):
चिनके: २.२४ (४.५६ टक्के)
वाटंबरे: १.७७ (३.४७ टक्के)
कमलापूर: १७.६८ (१५.७१ टक्के)
वासुद (अकोला): ३.७७ (५.०९ टक्के)
कडलास: ४.९९ (७ टक्के)
वाढेगांव: ८.३८ (१०.३४ टक्के)
बामणी: १०.३१ (१०.४५ टक्के)
मांजरी: १८.३७ (२७.१८ टक्के)
मेथवडे: ११.१० (१५.६४ टक्के)
अन्य: ६.५१ (२२.६२ टक्के)
दरम्यान, खवासपूर, लोटेवाडी, बलवडी, नाझरा, अनकढाळ, सांगोला, सावे, आलेगाव, मेडशिंगी हे नऊ बंधारे पूर्णतः कोरडे पडले आहेत. अनेक ठिकाणी बंधाऱ्यांचे दरवाजे काढल्याने शिल्लक पाणी वाहून गेल्याची नोंद आहे. ग्रामीण भागातील विंधन विहिरींतील पाण्याची पातळी घटली असून, पिण्याच्या पाण्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना पिके व फळबागा टिकवण्यासाठी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. डाळींबासारख्या दीर्घकालीन फळपिकांवर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावर नियोजनाची गरज

सांगोला तालुक्यातील नऊ बंधारे कोरडे ठणठणीत पडले असून उर्वरित बंधाऱ्यांतील साठाही झपाट्याने घटत असल्याने ग्रामीण भागातील विंधन विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत चालली आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच टंचाईची चाहूल लागल्याने पुढील तीन-चार महिन्यांसाठी काटेकोर जलव्यवस्थापनाची गरज अधोरेखित होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या आशा आता टेंभू उपसा सिंचन योजनाच्या उन्हाळी आवर्तनावर टिकून आहेत. वेळेत आवर्तन मिळाले, तरच पिके व फळबागांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पाणीसाठा आटत चालल्याने सांगोल्यातील कृषी अर्थकारणासमोर आव्हान उभे ठाकले आहे. टेंभूच्या आवर्तनातून वेळेत पाणीपुरवठा झाला, तरच पिके-फळबागांना दिलासा मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. अन्यथा, पुढील काही महिन्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सांगोला तालुक्यातील चिंचोली, अचकदाणी, जवळा, घेरडी, हंगिरगे या पाच तलावांची साठवण क्षमता ३६०.५६ दशलक्ष घनफूट इतकी आहे. सध्या या तलावांमध्ये १९९.४६ (५३ टक्के) दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या चिंचोली तलावात ६४.९१ दशलक्ष घनफूट, अचकदाणी तलावात १९.९९ दशलक्ष घनफूट, जवळा ३०.३८ दशलक्ष घनफूट, घेरडी ७७.१२ दशलक्ष घनफूट, हंगिरगे ७.०६ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!