‘समृद्ध पंचायतराज’चा अंतिम टप्पा सुरु; १५ एप्रिलपर्यंत स्वमूल्यांकनाची शेवटची मुदत!
ग्रामपंचायतींमध्ये विकासाची चुरस टोकाला; तालुका ते राज्यस्तरावर ‘नंबर १’साठी निर्णायक लढत

‘समृद्ध पंचायतराज’चा अंतिम टप्पा सुरु; १५ एप्रिलपर्यंत स्वमूल्यांकनाची शेवटची मुदत!
ग्रामपंचायतींमध्ये विकासाची चुरस टोकाला; तालुका ते राज्यस्तरावर ‘नंबर १’साठी निर्णायक लढत
सांगोला (प्रतिनिधी): ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून गावा-गार्वांना विकासात्मक चालना देण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे सुरू केलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे मूल्यमापन करण्यासंदर्भात अभियानात सहभागी ग्रामपंचायतीने स्वमूल्यांकन १५ एप्रिलपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या असून तालुकास्तरीय १६ एप्रिल ते ५ मे, जिल्हानिहाय ६ मे ते २५ मे, विभागनिहाय २६ मे ते १० जून तर राज्यस्तरीय ११ ते ३० जून पर्यंत मूल्यमापन करण्याचे निर्देश देण्यात आले असून तालुक्यात व राज्यात नंबर १ कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ग्रामीण विकासाला नवी दिशा देणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाने आता अंतिम टप्प्यात प्रवेश केला असून ग्रामपंचायतींसाठी १५ एप्रिलपर्यंत स्वमूल्यांकन सादर करण्याची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गावागावातील ग्रामपंचायतींनी ‘नंबर १’चा मान मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून तालुका ते राज्यस्तरापर्यंत चुरशीची स्पर्धा रंगली आहे. ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून ६ ऑगस्ट २०२५ रोजी सुरू झालेल्या या अभियानाने ग्रामीण भागात विकासाची चळवळ उभी केली. सुरुवातीपासूनच या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला असून गावागावांत विधायक कामांची जणू स्पर्धाच निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे अभियानाची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आली होती. या कालावधीत ग्रामपंचायतींनी विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात विकासकामे राबवली.
गावागावात विकासाची ‘स्पर्धा’
रस्ते, पिण्याचे पाणी, शाळा व अंगणवाडी सुधारणा, प्राथमिक आरोग्य सुविधा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, डिजिटल ग्रामपंचायत कार्यालय, हरित व पर्यावरणपूरक उपक्रम अशा अनेक आघाड्यांवर ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. परिणामी ग्रामीण भागात विकासाची सकारात्मक लाट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
मूल्यमापनाची टप्प्याटप्प्याची प्रक्रिया
स्वमूल्यांकन: १ ते १५ एप्रिल (ऑनलाइन अनिवार्य)
तालुका स्तर: १६ एप्रिल ते ५ मे
जिल्हा स्तर: ६ मे ते २५ मे
विभाग स्तर: २६ मे ते १० जून
राज्य स्तर: ११ ते ३० जून
एकदा सादर केलेल्या स्वमूल्यांकन प्रस्तावात कोणतीही दुरुस्ती करता येणार नसल्याने ग्रामपंचायतींमध्ये अचूक माहिती सादर करण्यासाठी धावपळ सुरू आहे.
सोलापूर जिल्ह्यात २१० गावांचा सहभाग
सोलापूर जिल्ह्यातील एकूण १०१५ ग्रामपंचायतींपैकी २१० ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग नोंदवला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. साप्ताहिक आढाव्यामुळे अनेक गावांमध्ये लक्षणीय विकासात्मक बदल घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामपंचायतींचे मूल्यमापन खालील प्रमुख घटकांवर होणार आहे.
सुशासनयुक्त पंचायत
सक्षम पंचायत
जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव
मनरेगा व इतर योजना
गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
उपजीविका विकास व सामाजिक न्याय
लोकसहभाग व श्रमदान
नाविन्यपूर्ण उपक्रम
तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती पारदर्शक पद्धतीने पाहणी करून केवळ ३ ग्रामपंचायतींची पुढील फेरीसाठी निवड करणार आहे.
कोट्यवधींची बक्षिसे; प्रतिष्ठेचा सवाल
या स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे—
तालुका स्तर: प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख, तृतीय ८ लाख, उत्तेजनार्थ २ लाख
जिल्हा स्तर: प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख, तृतीय २० लाख
विभाग स्तर: प्रथम १ कोटी, द्वितीय ८० लाख, तृतीय ६० लाख
राज्य स्तर: प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी, तृतीय २ कोटी
राज्यातील शेकडो ग्रामपंचायतींसाठी ही केवळ स्पर्धा नसून प्रतिष्ठेची लढत बनली आहे.
‘नंबर १’ कोण? उत्सुकता शिगेला
गेल्या काही महिन्यांत ग्रामपंचायतींनी विकासाची नवी उंची गाठली असून आता अंतिम मूल्यमापनातून कोणता गाव राज्यात ‘आदर्श’ ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “नंबर १ ग्रामपंचायत” ठरण्याची शर्यत आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून ग्रामीण भागात या निकालाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.



