मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास वारकऱ्यांचा प्रतिसाद

मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास वारकऱ्यांचा प्रतिसाद
सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या वारकरी चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरास बुधवार दि २२ जुलै रोजी वारकऱ्यांनी रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला.

या शिबिराचे उद्घाटन डॉ प्रदीपदादा साळुंखे पाटील व विजयराव देशमुख यांनी केले. यावेळी भाजप नेते बाळासाहेब एरंडे, ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील यांच्यासह नगरसेविका तनुजा एरंडे, डॉ.सचिन गवळी, डॉ. राज मिसाळ, अभिजित नलवडे, अमोल नलवडे, वारकरी बांधव आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी या शिबिरात हजारो भाविकांची आरोग्यसेवा व चरणसेवा करण्यात आली. या शिबिरात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिबीरस्थळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. त्याचबरोबर दिपकआबांनी पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांचे पायाला आयुर्वेदिक तेल लावून मालिश करून चरणसेवा केली.
वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, तसेच त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषध उपलब्ध करून देणे, तसेच वारकऱ्यांना जेवण आणि अल्पोपहार देण्यात आला. पडत्या पावसात नक्षत्र मंगल कार्यालयात सर्व वारकऱ्यांना मुक्कामाची आणि विश्रांतीची सर्व सोय करण्यात आली होती. ग्यानबा तुकारामच्या गजरात लाखो भाविक दरवर्षी कर्नाटक तसेच शेजारील राज्यातून देशाचे आध्यात्मिक विद्यापीठ अर्थात पंढरीच्या पांडुरंगाचे आषाढीवारी निमित्त दर्शन घेण्यासाठी जात असतात. वाटेत निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी बुधवार दि २२ आणि गुरुवार २३ जुलै असे दोन दिवस नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा ता. सांगोला येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या पहिल्या दिवशी काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांच्यासह सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे आणि फॅबटेक फार्मसी कॉलेज सांगोला येथील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा दिली.
दिपकआबांनी जपला अध्यात्मिक वारसा…
माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मातोश्री ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील आणि वडील स्व. आमदार काकासाहेब साळुंखे पाटील हे दोघेही वारकरी होते. दरवर्षी शारदादेवी साळुंखे पाटील या न चुकता पंढरीची वारी पूर्ण करायच्या त्यांच्या पश्चातही त्यांच्या नावाने आळंदी ते पंढरपूर सुमारे ३०० ते ५०० वारकऱ्यांची दिंडी दरवर्षी पंढरपूरला जाते. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनीही आपला अध्यात्मिक वारसा जपत बुधवारी वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून मालिश केली आणि वारकऱ्यांची चरणसेवा केली.



