सांगोल्यात एलसीबीची धडक कारवाई; अवैध शस्त्रविक्री करणारे तिघे जेरबंद
दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, तीन मोबाईलसह १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त हातीद पुलाखाली सुरू होती शस्त्रांची डील, शस्त्रांच्या रॅकेटचा तपास सुरू

सांगोल्यात एलसीबीची धडक कारवाई; अवैध शस्त्रविक्री करणारे तिघे जेरबंद
दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे, तीन मोबाईलसह १ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
हातीद पुलाखाली सुरू होती शस्त्रांची डील, शस्त्रांच्या रॅकेटचा तपास सुरू
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात अवैध शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाडसी कारवाई करून रंगेहात जेरबंद केले. हातीद गावाजवळील पुलाखाली सुरू असलेला शस्त्रांचा सौदा पोलिसांनी उधळून लावत आरोपींकडून दोन देशी बनावटीची गावठी पिस्टले, चार जिवंत काडतुसे, तीन महागडे मोबाईल हँडसेट असा १ लाख ८५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सांगोला तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल शंकर घाडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अवधूत सुभाष केंगार (रा. कोळा), हर्षवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे (रा. किडेबिसरी) आणि आबा धोंडीराम नरळे (रा. जुनोनी) यांच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ३ व २५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि विजय शिंदे, सपोनि अमित बाबर, पोहेकॉ रवि माने, पोहेकॉ दशरथ गोरे, पोहेकॉ राठोड, पोकॉ अन्वर आत्तार, पोकॉ सुरज रामगुडे, पोकॉ मनोज राठोड, चापोशि आशुतोश जाधव, पोकॉ शिवलिंगया स्वामी, चापोशि सुनिल पवार असे सर्वजन कार्यालयात उपस्थित होते. त्यावेळी पोनि संजय जगताप यानी सपोनि विजय शिंदे व सपोनि अमित बाबर यांना कळविले की, अवधुत केंगार व त्यांचे सोबत त्यांचे दोन साथीदार सांगोला ते मिरज जाणारे महामार्गावर हातीद गावच्या ब्रीजखाली देशी बनावटीचे पिस्टल व राउंड सोबत बाळगुन त्याची विक्री करत आहेत, अशी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचून संशयितांवर नजर ठेवली. तसेच सांगोला पोलीस ठाणेकडील पोसई पाटील व पोहेकॉ कोष्टी हे देखील त्या ठिकाणी हजर झाले.
संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अवधूत सुभाष केंगार (रा. कोळा), हर्षवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवळे (रा. किडेबिसरी) आणि आबा धोंडीराम नरळे (रा. जुनोनी) या तिघांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची गावठी पिस्टले, चार जिवंत काडतुसे, तीन मोबाईल जप्त करण्यात आले. या सर्व मुद्देमालाची किंमत १ लाख ८५ हजार ८०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरचे देशी बनावटीचे २ पिस्टल व ४ जिवंत काडतुस हे कोठून आणले याबाबत विचारले असता आबा धोंडीराम नरळे यांनी सदरचे देशी बनावटीचे २ पिस्टल व काडतुस हे महेबुब रा. मध्यप्रदेश राज्य (संपुर्ण नाव माहित नाही) यांचेकडून २ वर्षापूर्वी घेतले असल्याचे सांगीतले.
प्राथमिक तपासात आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा वैध शस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच ते बेकायदेशीरपणे शस्त्रांचा ताबा ठेवून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. त्यामुळे भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेली ही शस्त्रे आरोपींनी नेमकी कुठून आणली, ती कोणाला विकली जाणार होती, या व्यवहारामागे आणखी कोणाचे रॅकेट कार्यरत आहे का, तसेच यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे व्यवहार केले आहेत का, या सर्व बाबींचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईमुळे सांगोला तालुक्यातील अवैध शस्त्रव्यवहार करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



