कृषी विभागाची धडक कारवाई; बार्शी-अक्कलकोटमध्ये १२ लाखांच्या बनावट उडीद बियाण्यांचा साठा जप्त
QR कोडही ठरले बनावट; कंपनीच्या लोगोचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ

कृषी विभागाची धडक कारवाई; बार्शी-अक्कलकोटमध्ये १२ लाखांच्या बनावट उडीद बियाण्यांचा साठा जप्त
QR कोडही ठरले बनावट; कंपनीच्या लोगोचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ
सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यात बनावट बियाणे विक्रीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या आदेशानुसार कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने बार्शी आणि अक्कलकोट येथे धडक कारवाई करत १२ लाखांहून अधिक रुपयांच्या बनावट उडीद बियाण्यांचा साठा जप्त केला. “निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा, जि. जळगाव” या नामांकित कंपनीच्या नावाचा, लोगोचा आणि ब्रँडचा गैरवापर करून “NUL-7 (विश्वास)” या उडीद बियाण्याची बनावट पाकिटे बाजारात विक्रीसाठी आणल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणी बाळासाहेब भिकाजी बाबर (प्रभारी कृषी अधिकारी, पंचायत समिती, अक्कलकोट) यांनी अक्कलकोट पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तुकाराम मोरे (आबा कृषी सेवा केंद्र, अक्कलकोट) व रत्नाकर रघुनाथ कोले (स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव, ता. परांडा, जि. धाराशिव) तसेच बार्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किशोर बापुसाहेब अंधारे यांनी बार्शी पोलिस ठाण्यात दिलेल्या दिलेल्या फिर्यादीनुसार रत्नाकर रघुनाथ कोले (स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव, ता. परांडा, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्याची चर्चा सुरू आहे. कृषी विभागाने या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने घेत संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

बार्शी पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक किशोर बापुसाहेब अंधारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दयानंद आरगडे यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून जिल्हास्तरीय भरारी पथकाने मंगळवारी रात्री बार्शी शहरातील स्वराज कॉलनी, पवार प्लॉट, कासारवाडी रोड परिसरातील गाळा क्रमांक ३ वर अचानक छापा टाकला.
ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या आदेशानुसार कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बी. डी. बागल, विभागीय निरीक्षक अतुल जाधव, कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. गाळा मालक अण्णासाहेब नटवे यांनी हा गाळा रत्नाकर रघुनाथ कोले (समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगांव, ता. परांडा, जि. धाराशिव) यांना भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती पथकाला दिली. गाळ्यास कुलूप असल्याने पंचांसमक्ष कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आला.

तपासणीदरम्यान “निर्मल सीड्स” कंपनीच्या नावाने तयार केलेले NUL 7 (“विश्वास”) उडीद बियाण्याचे ५ किलो वजनाचे एकूण २१६ पोते आढळून आली. या संपूर्ण साठ्याची किंमत ४ लाख २३ हजार ३६० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. भरारी पथकाने बियाण्याच्या पोत्यांची तपासणी केली असता मोठा धक्कादायक प्रकार समोर आला. पोत्यांवरील QR कोड स्कॅन केल्यानंतर कंपनीची कोणतीही अधिकृत माहिती दिसून आली नाही. साधारणपणे अशा QR कोडमध्ये पीक, वाण, उत्पादन संस्था, चाचणी दिनांक, वैधता कालावधी, अंकुरण क्षमता, शुद्धता आदी माहिती दिसणे अपेक्षित असते. मात्र या पोत्यांमध्ये कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.
याशिवाय कंपनीने सादर केलेल्या मूळ बियाणे बॅगा आणि जप्त केलेल्या संशयित बॅगांमध्ये स्पष्ट फरक आढळल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. संबंधित गोडाऊनला कोणताही बियाणे साठवण अथवा विक्री परवाना नसल्याचेही उघड झाले.
कारवाईवेळी निर्मल सीड्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सोमनाथ भिमशेट्टी आणि तालुका प्रतिनिधी नितीन खटके उपस्थित होते. त्यांनी तपासणीदरम्यान संबंधित पोती कंपनीची नसून कंपनीच्या नोंदणीकृत ब्रँड, ट्रेडमार्क आणि लोगोचा अनधिकृत वापर करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांनी याबाबत लेखी जबाबही दिला. पथकाने पंचांसमक्ष दोन नमुने तपासणीसाठी सीलबंद केले तर उर्वरित २१४ पोती गोडाऊनमध्ये ठेवून संपूर्ण गोडाऊन सील करण्यात आले.

दरम्यान, बार्शीतील कारवाई सुरू असतानाच अक्कलकोटमध्येही कृषी विभागाने धडक कारवाई केली. प्रभारी कृषी अधिकारी बाळासाहेब बाबर यांच्या फिर्यादीनुसार, जिल्हास्तरीय भरारी पथकाने संत हरळय्या शॉपिंग सेंटर, कांदा बाजार येथील “आबा कृषी सेवा केंद्र” येथे तपासणी केली. या दुकानात “निर्मल सीड्स” कंपनीच्या नावाने “विश्वास” उडीद बियाण्याची तब्बल ४८० पाकिटे सापडली. या संपूर्ण साठ्याची किंमत ६ लाख २८ हजार ८०० रुपये होती. यापैकी ४८ पाकिटे शेतकऱ्यांना विक्री करण्यात आली होती, तर उर्वरित ४३२ पाकिटे जप्त करण्यात आली. याची किंमत तब्बल ८ लाख ४६ हजार ७२० रुपये इतकी असल्याचे समोर आले.
अक्कलकोट येथील तपासणीतही QR कोड स्कॅन केल्यानंतर कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. विशेष म्हणजे शासनाच्या “साथी” पोर्टलवर या बियाण्यांची नोंदणीच नसल्याचे उघड झाले. तसेच बियाणे विक्री परवाना दर्शनी भागात नसणे, विक्री बिलांवर शेतकऱ्यांच्या सह्या नसणे, साठा व भावफलक अद्ययावत नसणे अशा अनेक गंभीर अनियमितता पथकाला आढळून आल्या.
कारवाईवेळी निर्मल सीड्स कंपनीचे तालुका प्रतिनिधी वासुदेव नाटीकर यांनीही संबंधित पाकिटे संशयित असल्याचे सांगत कंपनीच्या नावाचा गैरवापर झाल्याची पुष्टी केली.
या दोन्ही प्रकरणांत स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र, शेळगाव (ता. परांडा, जि. धाराशिव) येथील रत्नाकर रघुनाथ कोले यांचे नाव समोर आले आहे. कृषी विभागाच्या तपासात बनावट बियाण्यांची पुरवठा साखळी त्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२), ३(५), बियाणे कायदा १९६६ मधील विविध कलमे, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
खरीप हंगाम तोंडावर असताना बनावट बियाण्यांचा साठा बाजारात आणून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट अथवा बनावट बियाण्यांमुळे उत्पादन घटते, पेरणी वाया जाते आणि शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळते. कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.



