ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईची झळ; सांगोल्याला शिरभावी पाणीपुरवठा योजनेचा आधार!
शिरभावी पाणीपुरवठा योजनेची ५८ गावांकडे १ कोटी ६१ लाखांची थकबाकी

ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईची झळ; सांगोल्याला शिरभावी पाणीपुरवठा योजनेचा आधार!
शिरभावी पाणीपुरवठा योजनेची ५८ गावांकडे १ कोटी ६१ लाखांची थकबाकी
आठ वर्षांनंतरही मंगळवेढा–पंढरपूर पंचायत समितीकडील बिले प्रलंबित
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात ऐन पावसाळ्यातही काही भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम असून, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. शिरभावी पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणीपुरवठा केला जात असून, अपुरा पुरवठा असलेल्या भागांत टँकरद्वारे पाणी पोहोचविण्यात येत आहे. सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागांतर्गत कार्यरत शिरभावी व ८१ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवर थकबाकीचे संकट गडद झाले आहे. जून २०२६ अखेर ५८ गावांकडे तब्बल १ कोटी ६१ लाख ९८ हजार ५१६ रुपये इतकी थकबाकी असून योजनेच्या आर्थिक व्यवस्थापनावर ताण निर्माण झाला आहे.
शिरभावीसह ८१ गावांना वर्षभर अखंडितपणे पाणीपुरवठा करणारी योजना म्हणून या योजनेचा राज्यात नावलौकिक आहे. पण वेळोवेळी थकबाकीची रक्कम वाढत असल्याने ही योजना आर्थिक संकटात सापडली आहे. अनेक गावांची थकबाकी मोठया प्रमाणावर आहे. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात देखील वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे. सांगोला तालुक्याची जीवनदायिनी ठरलेली शिरभावी पाणीपुरवठा योजना थकबाकीमुळे आर्थिक संकटात सापडली आहे. सोलापूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यातही वेळेवर पाणीपुरवठा होणारा तालुका अशी सांगोल्याची ओळख या योजनेमुळेच निर्माण झाली. मात्र वाढत्या थकबाकीमुळे योजनेच्या देखभाल, दुरुस्ती व नियमित खर्च भागविणे कठीण होत चालले आहे. अनेक गावांची थकबाकी लाखोंच्या घरात पोहोचल्याने प्रशासन चिंतेत आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेतील थकबाकी असलेली गावे पुढीलप्रमाणे, कंसात थकबाकीची रक्कम , शिरभावी (२,६२,५८७), संगेवाडी (९८,८५७), मेथवडे (१२,७५,५२०), मेथवडे माळी वस्ती (२,५५,५२३), देवळे (७४,२९२), मांजरी (९,८३,६५१), बामणी (२,७७,११३), सावे (४,००,००९), धायटी (१,०६,१८३), चिंचोली (३,०३,०७५), हलदहिवडी (७५,१८०), वाकी शिवणे (२,९१,३१६), शिवणे (२,३८,७१०), खिलारवाडी (६२,४५३), महूद बु. (२८,४०,५९०), महिम (१,८०,३१०), गायगव्हाण (१९,५०१), देवकतेवाडी (२,८१,१२५), खवासपूर (४,५०,३०१), एखतपुर (९४,३२३), लोटेवाडी (२,४१,२४९), कटफळ (४,४७८), अचकदाणी (२,९७,१३४), लक्ष्मीनगर (५,३८,७६७), सोनलवाडी (१७७), बागलवाडी (६०), वाकी नरळे वस्ती (४,७०,३०३), वाकी घेरडी (६६५), वाणीचिंचाळे (७२४), आलेगाव (२,२६,४२६), घेरडी (८८,८२१), मेडशिंगी (२०), वाढेगाव (१३,९७,५६५), लोणविरे (२८,४५९), हणमंतगाव (१,१२५), कडलास (३२,१०६), आगलावेवाडी (२८,८१७), बुरुंगेवाडी (६,४०४), जवळा (१,३९,५०४), राजूरी (१००), कारंडेवाडी (२,८६,७९०), तरंगेवाडी (७३,५४५), भोपसेवाडी (२,७९,१९६), नाझरे (७६,४१९), वझरे (३,८९,९४३), अनकढाळ (४,४३६), अजनाळे (१३७), य. मंगेवाडी (९२,२७८), गोडसेवाडी (१२,८४५), कमलापूर (३,६४०), अकोला वा. (२,६७,२१६), कोळा (७,१३,८४८), बुद्धेहाळ (१९,६९२), सोमेवाडी (९७,७४०), हबीसेवाडी (१,३९,४०८), डिकसळ (४,१३५), हंगीरगे (१,४४,८२६), जुजारपूर (२,४१,९८९), हायवे कोळा (२०,८९८) अशी एकूण ५८ गावांकडे तब्बल १ कोटी ४९ लाख ३८ हजार ८६९ रुपयांची थकबाकी आहे.
तसेच शेतकरी सूत गिरणीकडे ६ लाख ४० हजार ९६२ रुपये, महिला सूत गिरणीकडे २७ हजार ४२६, मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६, पंढरपूर पंचायत समिती ४३ हजार २००, सांगोला तहसील कार्यालयाकडे २ लाख ५८ हजार ८३४ अशी एकूण शिरभावी पाणीपुरवठा योजनेची थकबाकी १२ लाख ५९ हजार ६४८ रुपये इतकी आहे. तर मेटकरवाडी, चिकमहुद, इटकी, मानेगाव, डोंगरगाव, सोनंद, उदनवाडी, बलवडी, चिणके, निजामपूर, वाटंबरे, वासूद, केदारवाडी, पाचेगाव बुद्रुक, गौडवाडी, चोपडी, बलवडी, नराळे, पारे, जुनोनी, हटकर मंगेवाडी, हातीद, राजापूर, पाचेगाव खुर्द या २६ गावांनी थकबाकी भरली आहे.
सावे, चिंचोली, महूद बु., खवासपूर, लक्ष्मीनगर, वाढेगाव, मेथवडे, मांजरी, कोळा, वाकी नरळे वस्ती, जुजारपूर आदी गावे थकबाकीत आघाडीवर असल्याचे चित्र आहे. वाढत्या थकबाकीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने संबंधित गावांना व संस्थांना तातडीने देयके भरण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
२०१८ च्या दुष्काळात नागरिकांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शिरभावी योजनेमधून मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला टँकर भरण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतु आठ वर्षांनंतरही मंगळवेढा व पंढरपूर पंचायत समितीने शिरभावी योजनेची बिले थकवली आहेत. मंगळवेढा पंचायत समितीकडे २ लाख ८९ हजार २२६ रुपये, पंढरपूर पंचायत समितीकडे ४३ हजार २०० रुपये, सांगोला तहसिल कार्यालयाकडे २ लाख ५८ हजार २६० इतकी थकबाकी आहे.
शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या नूतनीकरणाची कामे २७ जुलै २०२४ पासून सुरू आहेत. सदर योजनेच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ६०० किमीचे पाईपलाइनचे काम ९० टक्के पूर्णत्वास आले आहे.
सध्या ३० गावांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच शिरभावी, मानेगाव, बुरलेवाडी, वाणी चिंचाळे या ठिकाणाहून सहा टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना आवश्यक प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिरभावी पाणीपुरवठा योजनेची यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळा सुरू असतानाही पाण्यासाठी प्रशासनाला दुहेरी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. संबंधित विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



