सामाजिक

अचकदाणीच्या तळ्यात वैष्णवांचा मेळा; हजारो किलोमीटरवरून आलेल्या परदेशी पाहुण्या बदकांनी सांगोल्याचा निसर्ग फुलवला

नोव्हेंबर ते मार्चदरम्यान स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ, तलावातील मुबलक अन्नामुळे अचकदाणी ठरते आवडता थांबा,  पक्षीप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र

अचकदाणीच्या तळ्यात वैष्णवांचा मेळा; हजारो किलोमीटरवरून आलेल्या परदेशी पाहुण्या बदकांनी सांगोल्याचा निसर्ग फुलवला

नोव्हेंबर ते मार्चदरम्यान स्थलांतरित पक्ष्यांची वर्दळ, तलावातील मुबलक अन्नामुळे अचकदाणी ठरते आवडता थांबा,  पक्षीप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील अचकदाणी गाव परिसरातील वनविभागाच्या तलावात यावर्षीही परदेशी स्थलांतरित पक्ष्यांचा मोठा मेळा भरला असून वैष्णव बदकांसह विविध प्रजातींच्या बदकांच्या थव्यांनी संपूर्ण परिसर गजबजून गेला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत युरोप, सायबेरिया, चीन, मंगोलिया व मध्य आशिया येथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या पाहुण्या पक्ष्यांनी अचकदाणीच्या तळ्याला आपला विसावा दिला आहे.
थंड प्रदेशात अन्नटंचाई व अत्यंत कमी तापमानामुळे हे पक्षी कझाकस्तान, तिबेट मार्गे सुमारे पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करून भारतात दाखल होतात. यातील काही पक्षी हिमालय पर्वतरांग ओलांडून महाराष्ट्रात येतात. सांगोला तालुक्यातील अचकदाणी येथील वनविभागाच्या रोपवाटिका परिसरातील तलाव हा या स्थलांतरित पक्ष्यांसाठी सुरक्षित व अन्नसमृद्ध ठिकाण ठरत असल्याने दरवर्षी येथे मोठ्या संख्येने त्यांची उपस्थिती दिसून येते.


यावर्षी तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे शेवाळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असून हेच स्थलांतरित बदकांचे मुख्य अन्न आहे. त्यामुळे या तळ्याला परदेशी पाहुण्या पक्षांची विशेष पसंती मिळत असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले.
या तळ्यात रेड क्रेस्टेड पोचार्ड (मोठी लालसरी बदके), नॉर्दर्न पिनटेल (तलवार बदक), नॉर्दर्न शोव्हलर (थापट्या बदक), युरेशियन विजन अर्थात वैष्णव बदक, गार्गनी (भुवई बदक) व गडवाल बदक या स्थलांतरित बदकांचे मोठे थवे पाहावयास मिळत आहेत. मार्च महिन्याच्या अखेरीस हे सर्व पक्षी पुन्हा आपल्या मूळ देशाच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू करतात.
तलाव परिसरातील वनविभागाच्या रोपवाटिका उद्यानातही विविध दुर्मिळ व सुंदर पक्ष्यांचे दर्शन घडत आहे. एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर (स्वर्गीय नर्तक), सायबेरियन स्टोनचॅट, पिवळा, करडा व पांढरा धोबी, कंठेरी चिखल्या, केन्टीश चिखल्या, सामान्य तुतवार, ठिपकेदार तुतवार, पाणलावा, पाणभिंगरी यांसारखे अनेक स्थलांतरित पक्षी येथे दिसत आहेत.
याशिवाय स्थानिक पक्ष्यांमध्ये हळदीकुंकू बदके, टिबुकली, वारकरी बदके, मोठा व लहान पाणकावळा, शेकाट्या, चित्रबलाक, काळ्या डोक्याचा शराटी, राखाडी व जांभळा बगळा, मराठा सुतार, तांबट, चष्मेवाला, नाचरा मकशाद, हळद्या, राखी धनेश यांसारख्या पक्ष्यांची उपस्थितीही लक्ष वेधून घेत आहे.


सध्या अनेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम सुरू असल्याने त्यांच्या रंगात अधिक उठाव व आकर्षकता दिसून येत आहे. त्यामुळे अचकदाणी परिसर पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमी व छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे व प्रा. डॉ. विधीन कांबळे यांनी या पक्ष्यांची नोंद केली असून, सांगोला तालुका व परिसरातील नागरिकांनी येथे भेट देताना दुर्बीण किंवा कॅमेरा सोबत आणून पक्षी निरीक्षणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वनविभागाच्या रोपवाटिका उद्यान व परिसरात एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर (स्वर्गीय नर्तक), सायबेरियन स्टोनचाट (गप्पीदास), येलो, ग्रे, व्हाईट वॅगटेल (पिवळा, करडा व पांढरे भुवईचा धोबी), लिटल रिंगड प्लोवर (कंठेरी चिखल्या), केन्टीश प्लोवर (केन्टीश चिखल्या), कॉमन सेंडपाइपर (सामान्य तुतवार), वूड सेंडपाइपर (ठिपकेदार तुतवार), कॉमन स्नाईप (पाणलावा), स्मॉल प्राटीनकोल (पाणभिंगरी) याचबरोबर स्थानिक पक्षी इंडियन स्पॉटेड बिल्ड डक म्हणजे हळदी कुंकू बदके, टिबुकली बदके, वारकरी बदके, ग्रेट अँड लिटिल कारमोरेंट म्हणजे मोठा व लहान पानकावळा, ब्लॅक विंग्ड स्टील्ट म्हणजे शेकाट्या, पेंटेड स्टॉर्क (चित्रबलाक),ब्लॅक हेडेड आयबीस (काळया डोक्याचा शराटी), ग्रे अँड पर्पल हेरॉन (राखाडी व जांभळा बगळा),मराठा सुतार, खाटीक किंवा गांधारी, थिरथिऱ्या, इंडियन व्हाईट आय म्हणजे चष्मेवाला, बार्बेट किंवा कॉपर स्मिथ म्हणजे तांबट, इंडियन फॅन्टेल म्हणजे नाचरा मकशाद, इंडियन गोल्डन ओरिओल म्हणजे हळद्या, इंडियन ग्रे हॉर्नबिल म्हणजे राखी धनेश इत्यादी सुंदर पक्षी पहावयास मिळत आहेत याची नोंद पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे व प्रा. डॉ. विधीन कांबळे यांनी केली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!