कृषी सल्लासामाजिक

मिरज-दिल्ली किसान रेल सेवेला रेल्वे प्रशासनाची मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा; थेट ग्राहकाशी संपर्क

36 तासांत राजधानीत पोहोचणार शेतमाल; पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा

मिरज-दिल्ली किसान रेल सेवेला रेल्वे प्रशासनाची मान्यता;
शेतकऱ्यांना दिलासा; थेट ग्राहकाशी संपर्क

36 तासांत राजधानीत पोहोचणार शेतमाल; पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा

सांगोला (प्रतिनिधी): सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि विजयपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फळे, भाजीपाला, फुले तसेच इतर नाशिवंत कृषी उत्पादनांची देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत जलद आणि सुरक्षित वाहतूक करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या मिरज ते दिल्ली किसान रेल सेवेला अखेर रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे. ही बहुप्रतीक्षित किसान रेल सेवा 15 डब्यांची असणार असून, दर शनिवारी दुपारी 4 वाजता मिरज स्थानकातून दिल्लीच्या दिशेने रवाना होईल. पंढरपूर आणि कुर्डूवाडी मार्गे धावणारी ही रेल्वे अवघ्या 36 तासांत राजधानी दिल्लीमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे नाशवंत शेतमालाला देशातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत वेळेत पोहोचण्याची नवी संधी उपलब्ध होणार आहे.


शेतकरी मोठ्या प्रमाणावर गुणवत्तापूर्ण भाजीपाला आणि इतर कृषी उत्पादनांचे उत्पादन घेतात. मात्र, या शेतमालाला देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत पोहोचवताना वाहतूक व्यवस्था आणि खर्च ही मोठी अडचण ठरत होती. शेतकऱ्यांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देणे, वाहतूक खर्च कमी करणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे या उद्देशाने किसान रेल सेवा सुरू करण्यासाठी सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून साकारत असलेल्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे द्राक्षे, डाळिंब, पेरू, टोमॅटो, ढबू मिरची, फुले, भाजीपाला आदी शेतमाल कमी वेळेत आणि कमी खर्चात दिल्ली व मुंबईसारख्या प्रमुख बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होणार आहे. रेल्वेचा पार्सल विभाग या सेवेसाठी सज्ज झाला असून, शेतमाल वाहतुकीवर ५० टक्के अनुदान मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. अनुदान मंजूर झाल्यास दिल्लीपर्यंत वाहतुकीचा खर्च प्रतिकिलो ४.५० रुपयांवरून २.२५ रुपये इतका कमी होणार आहे. त्यामुळे रेल्वेमार्गे शेतमाल पाठविणे शेतकऱ्यांसाठी अधिक किफायतशीर ठरणार आहे.


मिरज ते दिल्ली किसान रेल्वेसेवेला मिळालेली मान्यता ही केवळ नवीन रेल्वे सेवेची सुरुवात नसून, पश्चिम महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासन, कृषी विभाग, शेतकरी संघटना, व्यापारी तसेच सर्व संबंधित घटकांनी दिलेले सहकार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. किसान रेल सेवा सुरू झाल्यानंतर सांगली, सोलापूर जिल्ह्यासह आसपासच्या भागातील शेतमालाला राष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्याचा अधिक वेगवान मार्ग उपलब्ध होणार असून, हा उपक्रम जिल्ह्याच्या कृषी विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त केला जात आहे.

भविष्यात वित्तीय संस्थांच्या सहकार्याने शीतगृहे, पॅक हाऊसेस, वेअरहाऊसिंग, प्रक्रिया उद्योग, वाहतूक व रोजगाराच्या नव्या संधी या परिसरात विकसित होण्याची मोठी क्षमता निर्माण झाली आहे. किसान रेल सुरू झाल्यानंतर द्राक्षे, डाळिंब, केळी, भाजीपाला, फुले, दुग्धजन्य पदार्थ व इतर कृषी उत्पादनांना दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठांपर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे. यामुळे मालाची वाहतुकीतील नासाडी कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!