कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मान
विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सन्मान
विश्वस्त डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
सांगोला (तालुका प्रतिनिधी): मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिराचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. अत्यंत प्रभावी आणि व्यापकपणे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि २४ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे या ट्रस्टचे विश्वस्त डॉ.पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार केला. यावेळी राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आदीसह मान्यवर उपस्थित होते.
राज्यात पंढरीच्या पांडुरंगाची वारीला शेकडो वर्षांची परंपरा आणि इतिहास आहे. खांद्यावर भगवी पताका गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, हातात टाळ-मृदंग, ओठांवर ‘विठ्ठल विठ्ठल’चा अखंड गजर आणि मनात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ अशी लाखो वारकऱ्यांची पावले आषाढी एकादशीला पंढरीकडे वळतात. जात, धर्म, श्रीमंती-गरीबीचे भेद विसरून सर्वजण एका भक्तीच्या धाग्यात बांधले जातात. उन्हाची तमा नाही, पावसाची पर्वा नाही फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनात घेऊन पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची आपण चरणसेवा केली पाहिजे हा विचार राज्यात सर्वात प्रथम ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या मनात आला. त्यातून त्यांनी पाचेगाव ता. सांगोला येथे गेल्या १५ वर्षापूर्वी दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही संकल्पना सत्यात उतरवली. पंढरीला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून पायांची मालिश करणे, वारकऱ्यांचे पाय चेपणे या चरणसेवेची सुरुवात शारदादेवी साळुंखे पाटील यांनी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वारकऱ्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय घेतला. पाचेगाव ता सांगोला येथे होणाऱ्या दिपकआबा साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, यंदा प्रथमच मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि कै.आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नक्षत्र मंगल कार्यालय मेथवडे फाटा सांगोला येथे २२ आणि २३ जुलै रोजी आयोजित केलेल्या चरणसेवा आणि आरोग्यसेवा शिबिरात सुमारे ५० हजाराहून अधिक वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांची चरणसेवा केली होती. या शिबिराचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची आरोग्यसेवा देखील करण्यात आली होती.
या शिबिराचे यशस्वीपने आयोजन करून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा आणि आरोग्यसेवा केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ पियुषदादा साळुंखे पाटील यांचा सत्कार करून केलेल्या कामाचे कौतुक केले.
सध्या राज्यभर मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर चरणसेवा शिबिर आयोजित केले होते. पाचेगाव ता सांगोला येथे गेल्या १८ वर्षांपूर्वी या संकल्पनेची सुरुवात सलग ४२ वर्षे आळंदी ते पंढरपूर पायी आषाढीची वारी करणाऱ्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अध्यात्मिक विचारातून झाली होती. स्व. काकींनी लावलेल्या चरणसेवेच्या रोपट्याचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून वारकरी सेवेच्या वटवृक्षात रूपांतर होत आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या या शिबिरातून हजारो वारकऱ्यांची चरणसेवा करण्यात आली. या संकल्पनेच्या खऱ्या जनक म्हणून आजही संबंध राज्यभरातील वारकरी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील म्हणजे काकी यांचा उल्लेख करतात.



