पीकपेरणी

सांगोल्यात खरीप हंगामात ४१ हजार ३७५ हेक्टरवर पेरणीचे नियोजन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी खरीप हंगामाचा घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सूचना

सांगोल्यात खरीप हंगामात ४१ हजार ३७५ हेक्टरवर पेरणीचे नियोजन

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी खरीप हंगामाचा घेतला आढावा, अधिकाऱ्यांना केल्या सूचना

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुका कृषी विभागामार्फत आगामी खरीप हंगाम-२०२६ च्या अनुषंगाने ४१ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले आहे, तर खरीप हंगामासाठी २० एप्रिल पर्यंत ४७०७.४७ क्विंटल विविध बियाणे उपलब्ध झाले आहेत. खरीप पीक पेरणीसाठी लागणारे १६ हजार ६७६ मे.टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. गत १२ एप्रिलपर्यंत ९ हजार ७३९ मे.टन खते उपलब्ध झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली.


तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व २०२६ नियोजन आढावा बैठक आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला पंचायत समिती बचत भवन येथे झाली. या बैठकीसाठी पंचायत समिती सभापती पूनम इंगवले, उपसभापती अजय सरगर, पंढरपूर उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब लांडगे, तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव, सहायक गटविकास अधिकारी वसंत फुले, कृषी अधिकारी निखिल बाबर व कृषी अधिकारी बाळासाहेब बाबर, सहायक निबंधक प्रतिनिधी पुजारी, महावितरणचे दिघे, तालुक्यातील सर्व मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, कृषी निविष्ठा विक्रेते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

सांगोला तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी खरीप हंगामाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी विजेची समस्या सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

बैठकीच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी खरीप हंगामपूर्व २०२६ च्या नियोजनाच्या अनुषंगाने माहिती दिली. वर्षभर राबविण्यात येणान्या कृषी विभागाच्या सर्व योजना मागील वर्षातील व सन २०२६-०२७ या वर्षाचे नियोजन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने अल् निनोमुळे हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या समस्येवर उपाययोजना ही बाब मध्यवर्ती ठेऊन योग्यवेळी खरीप पेरणी, मूलस्थानी जलसंधारण, जलतारा, बीबीएफ पेरणी या बाबीचे मोहीम स्वरूपातील नियोजन केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन श्रीधर शेजवळ व आभार अमोल अभंग यांनी मानले.

सांगोला तालुक्यात खरीप हंगामात बाजरीचे १७ हजार ६७२.४८ हेक्टर क्षेत्र असून १० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. मक्याचे ८ हजार ८३४ हेक्टर क्षेत्र असून २५ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. तूर १६५० हेक्टर, मूग ५५० हेक्टर, उडीद १००० हेक्टर, सूर्यफूल १५०० हेक्टर, सोयाबीन १०० हेक्टर, भुईमूग ५०० हेक्टर, कापूस ५० हेक्टर, मटकी ५२५ हेक्टर असे एकूण सांगोला तालुक्यात खरीप हंगामात ३० हजार ६३० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून ४१ हजार ३७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी दिली.

सांगोला तालुक्यात खरीप हंगामासाठी युरिया ५ हजार ९८२ मे.टन, एस.एस.पी.२ हजार ०९८ मे.टन, एम. ओ.पी. ७७७ मे.टन, डी.ए.पी. १ हजार ९२४ मे.टन, एन.पी.के. ५ हजार ८९५ मे.टन, नॅनो युरिया ९ हजार १८४ मे.टन, नॅनो डी.ए.पी. १ हजार ०३९ मे.टन असे एकूण २६ हजार ८९१ मे.टन इतके खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!