राजकीय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात शैक्षणीक जनजागृतीचा महाउपक्रम राबविणार – चेतनसिंह केदार सावंत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात शैक्षणीक जनजागृतीचा महाउपक्रम राबविणार – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये २२ ते २४ जुलै या कालावधीत शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक जनजागृतीपर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. या उपक्रमांतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन इयत्ता १ ली ते ५ वी, ६ वी ते ८ वी आणि ९ वी ते १२ वी अशा तीन गटांमध्ये करण्यात येणार आहे. स्पर्धांसाठी पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन, स्वच्छ भारत, विकसित भारत २०४७, आषाढी वारी, सामाजिक समता आणि शाश्वत विकास हे प्रेरणादायी विषय निश्चित करण्यात आले आहेत.या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव, सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय मूल्ये, सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना विकसित करणे हा आहे.

दि. २२ जुलै २०२६ रोजी शाळास्तरीय स्पर्धा, तर २३ जुलै २०२६ रोजी तालुकास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा व विद्यार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात दि. २४ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणपूरक दृष्टिकोन आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!