बळीराजा चिंतेत : बेडूक, गाढव अन् घोड्याने दिला दगा…उंदीर वाहन तारणार का?
जिल्ह्यात ७३ हजार ०५६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी; ३३ मंडलात अल्प पाऊस

बळीराजा चिंतेत : बेडूक, गाढव अन् घोड्याने दिला दगा…उंदीर वाहन तारणार का?
जिल्ह्यात ७३ हजार ०५६ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी; ३३ मंडलात अल्प पाऊस
सांगोला (प्रतिनिधी): यंदा मान्सूनने वेळेत आणि समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारात कोट्यवधी रुपयांचे बियाणे आणि खतांचा साठा दुकानांमध्येच पडून आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. यंदाच्या नक्षत्रांमध्ये वाहन बनून आलेल्या बेडूक, गाढव व घोड्याने दगा दिला. पुष्य नक्षत्राचे उंदीर वाहन शेतकऱ्यांना तारणार का?, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला, तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरण्यांची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात केवळ २२ टक्के (७३ हजार ०५६ हेक्टर) क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ७३ हजार ०५६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जे जिल्ह्याच्या एकूण सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी (२२ टक्के) आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी पाहिल्यास परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते. जून महिन्याची पावसाची सरासरी १०२.५ मिलिमीटर आहे. पण अपेक्षित सरासरीच्या तुलनेत प्रत्यक्षात पडलेला पाऊस केवळ ८२.० मिलिमीटर (सरासरीच्या ८० टक्के) आहे. पण तोही हलकाच आणि सलग नाही, जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली होती. जुलै महिना सुरू होऊन, आता तो निम्म्यावर आला, तरी परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे पेरण्या पूर्णपणे रखडल्या आहेत. तरीही ज्या शेतकऱ्यांनी धाडसाने पेरण्या केल्या होत्या, त्यांची उगवलेली पिके आता पावसाअभावी आणि वाढलेल्या तापमानामुळे शेतातच जळून खाक होऊ लागली आहेत.
खरीप हंगामात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके घेतली जातात. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ८१ हजार २७० हेक्टर आहे. पण आतापर्यंत केवळ ३१ हजार ३९२ हेक्टरवर (३९ टक्के) पेरणी झाली आहे. तूरीचे क्षेत्र ८६ हजार ५८३ हेक्टर आहे, त्यापैकी केवळ १० हजार ७८२ हेक्टरवर (१२ टक्के) पेरणी झाली आहे. मूगाचे क्षेत्र १४ हजार ६८२ हेक्टरपैकी फक्त ८५९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तर खरीप पीक असलेल्या उडदाची पेरणी ५८ हजार १६६ हेक्टरपैकी केवळ ९ हजार ०११ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या अखेरीस पडलेल्या पावसाचा आधार घेऊन तूर, उडीद, भुईमूग यांसारख्या पिकांची पेरणी केली, त्यांची पिके सुरुवातीला उगवून आली. मात्र, गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस पूर्णपणे बेपत्ता झाल्यामुळे आणि कडक ऊन व वारा यामुळे शेतातील जमिनीची ओल कमी झाली आहे. त्यामुळे उभी पिके आता शेतातच जळू लागली आहेत. फळबागा वाचवण्यासाठी शेतकरी विहिरींच्या पाणीपातळीवर अवलंबून आहेत, पण पाण्याची पातळीही खोल गेली आहे. पावसाअभावी शेतकरी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने व्यापारी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापूर शहर व जिल्ह्यांमध्ये ३ हजार ८०० परवानाधारक बियाणे विक्रेते आहेत. तर, रासायनिक खताचे ३ हजार ३०० व किटकनाशक व औषधी विक्रेते २ हजार ८०० विक्रेते आहेत.
पर्यायी पाण्याची सोय उपलब्ध असल्याशिवाय खरीपाचा पेरा करून नका, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बियाणे मुबलक आहेत. आता, रासायनिक खताचा साठा उपलब्ध असल्याने पुढील हंगाम, इतर बागायत पिकांसाठी टंचाई भासणार नाही. – शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर
जुलै महिन्याच्या २१ दिवसात वाघोली (मोहोळ) मंडलात अवघा १० मि. मी., बोराळे, विंचूर, पुळूज प्रत्येकी १५ मि.मी. जवळा, महूद, अकलूज, लवंग, माळशिरस, सदाशिवनगर, सावळेश्वर, महूद मंडळात अवघा १८ व १९ मि.मी. इतकाच पाऊल पडला आहे. तिर्हे, जेऊर, पेनूर, माढा, म्हैसगाव, टेंभुर्णी, रांझणी, पटवर्धन कुरोली, शिवणे, सोनंद, दहिगाव, महाळुंग, वेळापूर, पिलीव, बोराळे, मरवडे, आंधळगाव, हुलजंती सोलापूर, कामती, मोहोळ या मंडलात २५ ते २८ मि.मी. पाऊस पडला आहे. उपळे दुमाला मंडलात सर्वाधिक १३३ मि.मी. तर आगळगाव व नारी प्रत्येकी १०० मि.मी. पाऊस पडला.
मृग नक्षत्रापाठोपाठ, आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्राचा पाऊस फारच कमी पडला. मृगाचे वाहन बेहूक, आद्राचे गाढव तर पुनर्वसू नक्षत्राचे वाहन घोडा होते. या तिनही नक्षत्रात पाऊस रुसल्याने पुष्य नक्षत्र पडणार का?, असे चित्र निर्माण झाले आहे. २० जुलै रोजी पुष्य नक्षत्र सुरू झाले आहे. या नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मात्र, आतापर्यंत पाऊस अत्यल्प पडल्याने पुष्य नक्षत्र बरसणार का?, असा प्रश्न आहे .पुष्य नक्षत्राचे उंदीर वाहन तारणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र पुढीलप्रमाणे…
सोयाबीन ३१ हजार ३९२ हेक्टर
मका १६ हजार ९७७ हेक्टर
तूर १ हजार ०७२ हेक्टर
उडीद ९ हजार ०११ हेक्टर
बाजरी ३ हजार २६४ हेक्टर
मूग ८५९ हेक्टर
सूर्यफूल ३५६ हेक्टर
कापूस २५५ हेक्टर
भुईमूग १४२ हेक्टर
खरीप ज्वारी २० हेक्टर
नवीन ऊस लागवड ६ हजार ८८८ हेक्टर



