शैक्षणिक

कमलापुरात ‘सी. व्ही. रमण’ बालवैज्ञानिक स्पर्धेची स्वप्नांना पंख देणारी संधी!

गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो सहल; राज्यस्तरावर आकर्षक बक्षिसांचा वर्षाव

कमलापुरात ‘सी. व्ही. रमण’ बालवैज्ञानिक स्पर्धेची स्वप्नांना पंख देणारी संधी!

गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने इस्रो सहल; राज्यस्तरावर आकर्षक बक्षिसांचा वर्षाव

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली असून ‘सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षा’ उत्साहात पार पडणार आहे. गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट विमानाने इस्रोच्या श्रीहरीकोट्टा केंद्राची सहल घडविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या स्पर्धेबाबत माहिती देताना शिक्षक सुनील चांगदेव आदलिंगे यांनी सांगितले की, जनसेवा सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठान, अहिल्यानगर यांच्या वतीने ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यातील दुसऱ्या रविवारी ही परीक्षा घेतली जाणार असून, कमलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा हे परीक्षेचे केंद्र असणार आहे. गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या बालवैज्ञानिकांना विमानाने इस्रो (श्रीहरीकोट्टा) येथे शैक्षणिक सहल घडवली जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी विशेष विज्ञान कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून विज्ञानातील नवकल्पनांना चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यस्तरीय स्पर्धेत अव्वल ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना ४ हजार रुपयांची आकाश निरीक्षण दुर्बिण, १५०० रुपयांचे विज्ञान प्रयोग साहित्य तसेच इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय १३००, १२०० आणि ११०० रुपयांच्या विज्ञान साहित्यांचीही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. जिल्हास्तरावर एकूण १२ बक्षिसे देण्यात येणार असून त्यामध्ये रोबोटिक्स किट, मायक्रोस्कोप आणि विविध विज्ञान साहित्यांचा समावेश आहे. तालुकास्तरावर १५ बक्षिसे ठेवण्यात आली असून विद्यार्थ्यांना ५०० ते ३०० रुपयांपर्यंतचे विज्ञान साहित्य देण्यात येणार आहे.
इयत्ता ५ वी ते ९ वीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असून, उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसांसह मोफत विज्ञान सहल, कार्यशाळा आणि आजीवन शिष्यवृत्तीची संधी उपलब्ध होणार आहे. कमलापूरमध्ये होणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा देणारी ठरणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘आकाशाला गवसणी घालण्याची’ ही मोठी संधी मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!