शैक्षणिक

ज्ञान, संस्कार आणि आरोग्यदायी शिक्षणातून घडवूया उज्ज्वल भविष्य!” — चेतनसिंह केदार-सावंत

“ज्ञान, संस्कार आणि आरोग्यदायी शिक्षणातून घडवूया उज्ज्वल भविष्य!” — चेतनसिंह केदार-सावंत

सांगोला (प्रतिनिधी): राजुरी येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित करण्यात आलेला शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी शाळेत प्रथमच दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, शाळेचा गणवेश व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी परिसरात सणासारखे वातावरण निर्माण झाले होते. रंगीबेरंगी सजावट, शिक्षकांचे आपुलकीने भरलेले स्वागत आणि पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना नियमित अभ्यास, पुस्तकांशी मैत्री आणि शिक्षणाच्या माध्यमातून जीवनात यश संपादन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्नशील राहावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज असून भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत म्हणाले, “शाळा प्रवेशोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांच्या सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. आज शाळेत प्रवेश घेणारे हे चिमुकले विद्यार्थीच उद्याचा देश घडविणार आहेत.

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सदाशिव दबडे, केंद्रप्रमुख दिनकर गाडे, शाखा विस्तार अधिकारी भंडारी, सूर्यकांत खुळे, सरपंच प्रतिभाताई व्हळगळ, उपसरपंच मोहिनीताई काटे, महेश काटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक बडंगर, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, पत्रकार, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!