शैक्षणिकसामाजिक

S.I.R. चे धोरण…. B. L.O. शिक्षकांचे मरण

✍️ शिक्षक नेते सुरेश पवार यांचा ब्लॉग ✍️

S.I.R. चे धोरण….बी.एल.ओ. शिक्षकांचे मरण

✍️ शिक्षक नेते सुरेश पवार यांचा ब्लॉग ✍️ =============================

“आम्हांला शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या ” हे आर्त घेऊन आजवर अनेकदा शिक्षकांनी रस्त्यावर उतरून टाहो फोडला पण अजूनही कुणाच्या हृदयाला पाझर फुटला नाही. सरकारी शाळांच्या दुरावस्थेची चर्चा तर नेहमीच होते, पण त्याच्या मूळाशी जायला कुणालाही वेळ नाही….. नव्हे त्याची गरजच नसावी. जे चाललंय ते नियोजनबद्ध, सहेतूक असेल तर सकारात्मक बदल होईल अशी अपेक्षा कशी ठेवता येईल ? विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी RTE अधिनियम 2009 मधील कलम 27 नुसार देण्यात आली असून या तरतुदीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ”

शिक्षकांना जनगणना, प्रत्यक्ष निवडणूकीचे काम आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन वगळता इतर कुठलेही काम दिले जाणार नाही ” हे सरकारी बाबूंनी लिहून दिलेले उत्तर वाचून दाखविण्या पलीकडे सरकार मधील मंत्र्यांनी कधीच काही केले नाही. वेळोवेळी निर्गत झालेल्या शासन निर्णय व परिपत्रकांतून ‘ प्रत्यक्ष निवडणुकीचे काम शिक्षकांना द्यावे ‘ असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत, असे असतानाही ‘ प्रत्यक्ष निवडणुकीचे काम ‘ या शब्दाचा अर्थ आपण काढतो तसा मान्य करायला महसूल यंत्रणा अजिबात तयार नाही. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र यंत्रणा नाही हे कारण पुढे करुन निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षकांना वेठीस धरले जाते. लोकसभा – विधानसभा एवढ्याच नव्हे तर स्थानिक स्वराज संस्थांच्या सर्व निवडणूकांचे सोपस्कार शिक्षकांशिवाय पुर्णत्वास जात नाहीत. हे चक्र एवढ्यावरच थांबत नाही तर अगदी कारखाने, सूतगिरणी, बँका या सहकारी संस्थांच्या निवडणूकांसाठी जे मनुष्यबळ वापरले जाते ते बहुसंख्य शिक्षकांचेच असते. कुठल्याही निवडणुकीसाठी सरसकट प्राथमिक शिक्षकांना आदेश देऊनही आवश्यक कर्मचारी संख्येचा कोरम अपूर्ण राहिल्यावर मग निवडणूक शाखेला इतर विभागातील कर्मचाऱ्यांची आठवण येते. निवडणूक प्रशिक्षण, मतदान यंत्रे व अन्य साहित्याचे वाटप तसेच मतदान झाल्यावर कर्तव्य भत्तावाटप आणि मतदान यंत्रे जमा करताना शिक्षकांच्या वाट्याला येणारी अवहेलना न सांगितलेलीच बरी…. शिक्षण खात्यात स्वाभिमानाने वावर असलेल्या शिक्षकांची अवस्था महसूल विभागाकडे कर्तव्यासाठी गेल्यावर मात्र दीनवाणी झालेली असते.

प्रत्यक्ष निवडणूकीच्या कामाशिवाय बी.एल.ओ. म्हणून बहुतेक ठिकाणी शिक्षकांकडेच जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. हे काम वाटते तेवढे सहज सोपे नक्कीच नाही. मागील 5/ 7 वर्षात निवडणूक मतदार याद्यांच्या अनुषांगिक कामाचे स्वरुप आणि व्याप्ती कमालीची वाढलेली आहे. मतदार नोंदणी, दुबार नावांची पडताळणी , फोटो संकलन, मयत मतदार वगळणे, नावातील तांत्रिक चुकांची दुरुस्ती, ग्रामसभांतून मतदार यादीचे वाचन, मतदान ओळखपत्रांचे वाटप, व्होटर स्लीपचे वाटप.अशा विविध स्वरुपाची कामे बी.एल.ओ. च्या माथी मारण्यात आलेली आहेत. यातील मयत मतदार वगळणे यासारखी अनेक कामे पुन्हा पुन्हा करुन घेतली जातात पण नव्या यादीत ती नावे पुन्हा तशीच असतात. ‘ काम न्हाय घरी अन सांडून भरी ‘ असाच हा प्रकार आहे.शिवाय मतदार जनजागृती व नोंदणीसाठी विशेष अभियान ही जबाबदारी देखील शिक्षकांनाच पार पाडावी लागते. अलिकडेच हंगामी कर्मचारी व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बी. एल. ओ. चे काम सोपवू नयेअसा आदेश निघाल्याने गावपातळीवरील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, कोतवाल, डाटा आँपरेटर अशा काही लोकांना लगेचच कार्यमुक्त करुन हे काम सक्तीने शिक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. एकंदर बहुसंख्य शिक्षकांकडेच बी. एल. ओ. चे काम असून महाराष्ट्रात सध्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाची (SIR) मोहीम सुरु आहे. एक महिन्याच्या कालावधीत हे काम पुर्ण करावयाचे आहे.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या आरंभी हा टप्पा सुरु झालाय. शाळा सुरु होऊन अवघे पंधरा दिवस उलटले असतानाच शाळा सोडा पण हे काम सुरु करा ‘ असा तगादा तहसिल कार्यालयाकडून सुरु झाला आहे. इतकेच नव्हे तर अनेक जिल्ह्यात शिक्षकांची सेवा अधिगृहीत करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यात नीट, टीईटी पेपर फुटी आणि आमदार – खासदार फुटीचे लोण थेट शाळापर्यंत आले आहे. विविध प्रलोभने दाखवून पालकांना फोडून जिल्हा परिषद शाळातील पट पळविण्याची स्पर्धा तीव्र झाली असून त्याचा चिवट प्रतिकार कर्तव्य भावनेतून जिद्दीने शिक्षक करीत आहेत. पटनोंदणी, पाठ्यपुस्तके, गणवेश वाटप या सर्व गोष्टींचा ताळमेळ घालून एकवीस दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करता – करता दैनंदिन शैक्षणिक कामकाज आता कुठे रुळावर आले आहे, अशावेळी ही विशेष मोहीम निवडणूक आयोगाने आखली आहे. खरे तर प्रत्येक तालुक्यातून 60 ते 70 शिक्षकांची पदे समानीकरणाच्या गोंडस नावाखाली रिक्त होती, त्यात भर म्हणून एकेका तालुक्यातून सरासरी 20 शिक्षक 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत तर 10 तरुण शिक्षक नव्याने केंद्रप्रमुख झाले आहेत. एकूण काय तर प्रत्येक तालुक्यात किमान 100 पदे रिक्त आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शाळा सुरु झाल्या. त्यातही नवीन अभ्यासक्रमाची प्रशिक्षणे आता सुरु झाली. शाळेत उरल्या शिक्षकांतील निम्मे शिक्षक प्रशिक्षणासाठी पाठवायचे आहेत … काही शाळांत तर तिकडे पाठवायला सुद्धा शिक्षक नाहीत ही वस्तुस्थिती आहे.कुटुंबगणना, बी. एल. ओ. या कामामुळे शिक्षका़ंची उन्हाळी सुट्टी यंदा ना के बराबर अशा स्थितीत संपली. शाळा सुरु झाल्यावर कात टाकून उत्साहाने शिक्षक कामाला लागले असतानाच ही मोहीम आता सुरु झालीय. अनेक ठिकाणी द्विशिक्षकी शाळेतील दोघांनाही तर काही ठिकाणी पाच पैकी चार शिक्षकांना बी. एल. ओ. कामासाठी जुंपण्यात आले आहे.

गावात जेवढे बुथ तेवढ्या ठिकाणी शिक्षकच BLO आहेत. मग गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी कर्मचारी, माध्यमिक शिक्षक यापैकी कुणीच कर्मचारी कार्यरत नाहीत काय? हा प्रश्न निर्माण होतो. सगळी कामे शिक्षकांच्याच पाचवीला कशी काय पुजली आहेत ? शाळा बंद पडली तरी चालेल पण तुम्ही SIR मोहीम पूर्ण केली पाहिजे म्हणून अक्षरश: दम भरला जातोय. देवगड येथील प्रांताधिकारी यांनी प्रशिक्षणावेळी एका शिक्षकाला ‘ हरामखोर ‘ असे संबोधून तमाम शिक्षकांचा उपमर्द केला…… अनेक ठिकाणी अशाच असंवैधानिक शब्दांचा वापर केला जातोय. सर्वांशी आपुलकी – आदरभाव जपणार्या आणि विद्यार्थ्यांमध्ये ही जीवनमूल्ये रुजविण्यासाठी धडपडणार्या शिक्षकांची ही थट्टा नव्हे काय ? आता प्रत्यक्ष मोहीम सुरु झाल्यावर प्रत्येक दिवसासाठी ठरवून दिलेले उद्दिष्ट अपूर्ण आहे,एवढ्या अहवालावरुन गुन्हे दाखल केले जात आहेत. मोठ्या समूहाकडून काम करवून घेण्यासाठी कुठलेही सौजन्य न दाखवता’ एकाला मारा आणि हजारोंना भयभीत करा ‘ ही रणनीती अवलंबली जात आहे. हे काम Work From Home या धाटणीतील नाही. बुथमधील सर्व घरापर्यंत आणि 100 टक्के मतदारापर्यंत जाऊन हे काम करावयाचे आहे. ग्रामीण भागातील परिस्थितीचे अवलोकन करता 30 टक्के हून अधिक मतदार अर्थार्जनासाठी शहरात स्थलांतरीत झालेले आहेत. यातील बहुसंख्य मतदार हे केवळ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गावाकडे येतात ही वस्तुस्थिती आहे. या मतदारांचे फाँर्म भरुन घ्यायचे मोठे आव्हान आता बी.एल.ओ. पुढे आहे. एकदा सोडून पाच वेळी अशा घरांना भेटी द्यायच्या आहेत. अनेकदा प्रयत्न करुनही फाँर्म भरला जाणार नाही, त्यामुळे मतदार यादीतून नाव वगळले जाईल, त्याचे खापर मात्र शिक्षकांच्याच माथी फुटणार आहे. स्थानिक पातळीवर विविध राजकीय पक्ष आणि गटातटात विभागलेल्या कार्यकर्त्यांच्या सजगतेवर त्या त्या बुथची मतदार संख्या स्थिर होईल.

ग्रामपंचायत निवडणूकीतील प्रभागाचा फैसला 2-5 मतांवर ठरतो, त्यामुळे एकेका मताचे मोल खूप मोठे असते. ग्रामीण भागातील स्थलांतरीत मतदारांची नावे शहरात आणि गावाकडे दोन्हीकडे असतात. एकाच वेळी ही मोहीम सर्वत्र असल्याने कोण कुठे नाव कायम ठेवेल आणि परराज्यात वास्तव्यास असलेली व्यक्ती या काळात कसा प्रतिसाद देईल हे सांगता येणार नाही. या कालावधीत राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात आलेल्या बी. एल. ए. ची भूमिका देखील अत्यंत महत्वाची ठरणार आहे. सद्याच्या मतदार यादीतील प्रत्येक मतदारांशी सातत्याने संपर्कात राहून कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल. आता कितीही पाठपुरावा केला तरी थंडा प्रतिसाद मिळेल. पण ग्रामपंचायत निवडणूकीतील निकालानंतर त्या गटाची नावे कशी आली आणि आमची नावे वगळली कशी ? याची गरमागरम चर्चा सुरु होईल. शेवटी अपयशाचे खापर गुरुजींच्या माथ्यावर फोडले जाईल हे मात्र नक्की !सुप्रीम कोर्टाच्या तुघलकी निर्णयामुळे टीईटी सक्तीचे भूत मानगुटीवर बसल्याने भयग्रस्त झालेल्या शिक्षकांनी मागील चार महिन्यात नेटाने अभ्यास करीत परीक्षेची तयारी केली होती, पण, भित्यापाठी ब्रम्हराक्षस लागावा तशी गत टीईटी पेपरफुटीमुळे शिक्षकांची झाली आहे. विद्यार्थ्यांना पाठांतरा ऐवजी कौशल्ये आणि आकलनासाठी सिद्ध करणार्या शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या तयारीसाठी घोकंपट्टी करावी लागत होती. चांगली तयारी झालेली असताना परीक्षा रद्द झाली, आता SIR मुळे तिकडे ढुंकून बघायला देखील कुणाला वेळ मिळणार नाही. त्यामुळे सारेच मुसळ केरात गेलयं. वैयक्तिक अडचणी बाजूला ठेऊन विचार केला तरी…… एका बाजूला शाळेची जबाबदारी, अतिरिक्त कामांचे ओझे, पट टिकवण्याचे आव्हान आणि दुसरीकडे मुदतीत SIR पूर्ण करण्याची सक्ती यामुळे शिक्षकांची अवस्था ‘ इकडे आड तिकडे विहीर ‘ अशी होऊन बसली आहे.

पहिले सत्र संपले की लगेचच नवीन वर्षात प्रत्यक्ष जनगणनेची तयारी सुरु होईल……. ना फुरसत ना उसंत….. या दुष्टचक्रात अडकलेल्या शिक्षकांना मोकळा श्वास घ्यायची तरी मुभा आहे की रस निघायचा बंद झाला तरीही चोथा सुद्धा चरख्यात घालून पिळला जातो हाच न्याय शिक्षकांच्या भाळावर सटवाईने कोरुन ठेवलाय का* हे एकदा आम्हांला कळू द्या…….. तुर्तास इतकेच!

✍️ शब्दांकन………
श्री. सुरेश पवार (गुरुजी)
संस्थापक, छत्रपती परिवार मरवडे, ता. मंगळवेढा.
माजी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सोलापूर.📞7057475610 📞

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!