महाराष्ट्र

सांगोल्यात अवकाळी पाऊस-गारपिटीचा तडाखा; उन्हाळी पिके उद्ध्वस्त, फळबागा संकटात

डाळिंब, आंबा, द्राक्षे, खरबूज, कलिंगडासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान – तातडीने पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

सांगोल्यात अवकाळी पाऊस-गारपिटीचा तडाखा; उन्हाळी पिके उद्ध्वस्त, फळबागा संकटात

डाळिंब, आंबा, द्राक्षे, खरबूज, कलिंगडासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान – तातडीने पंचनाम्याची शेतकऱ्यांची मागणी

सांगोला (प्रतिनिधी): अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या जोरदार तडाख्याने सांगोला तालुका अक्षरशः हादरून गेला असून रब्बी हंगामासह उन्हाळी पिकांवर मोठे संकट कोसळले आहे. बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, ज्वारी, भाजीपाला, तसेच डाळिंब, आंबा, द्राक्षे, पेरू, सीताफळ यांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेला हंगाम डोळ्यादेखत उध्वस्त झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

सांगोला तालुक्यात सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या गारपिटीने शेतातील उभी पिके अक्षरशः आडवी झाली. यावर्षी गव्हाचे विक्रमी उत्पादन अपेक्षित होते; मात्र राशी होण्यापूर्वीच पावसाने गाठल्याने गहू व ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गव्हाची कणसे जमिनीवर पडल्याने उत्पादनासह प्रतीवरही परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
उन्हाळी नगदी पिकांनाही या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. टरबूज, खरबूज, कलिंगड, टोमॅटो, भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणावर असलेल्या भागात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेषतः काढणीला आलेली खरबूज-कलिंगड पिके पावसाच्या पाण्यात सडण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक गणित कोलमडले आहे. फळबागांनाही या गारपिटीने झोडपले असून आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळून पडला आहे. डाळिंब, द्राक्ष बागांमध्ये फळांना तडे गेल्याचे चित्र दिसत आहे, तर पेरू व सीताफळ बागांचेही नुकसान झाले आहे. यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्यामुळे पिके भुईसपाट झाली असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्षभराच्या अन्नाची सोय करणाऱ्या गहू-ज्वारी पिकांवर पाणी फिरल्याने ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

सांगोला तालुक्यात डाळिंब १६ हजार १९२ हेक्टर, पेरू १ हजार २१८ हेक्टर, द्राक्षे ५०२ हेक्टर, सीताफळ ४७९ हेक्टर, आंबा ९८६ हेक्टर, आवळा १९ हेक्टर, चिकू ३२० हेक्टर, केळी ७७५ हेक्टर, बोर ४०२ हेक्टर, पपई २०२ हेक्टर, ड्रॅगन ९२ हेक्टर अशा २१ हजार १८७ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतकरी फळबागा जोपासण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. अशातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!