बार्शीला ६५ वर्षांनंतर मिळाला झेडपी अध्यक्षपदाचा मान
दीपक वैद्य अध्यक्ष, इंद्रजीत पवार उपाध्यक्ष; जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजप सत्तेत

बार्शीला ६५ वर्षांनंतर मिळाला झेडपी अध्यक्षपदाचा मान
दीपक वैद्य अध्यक्ष, इंद्रजीत पवार उपाध्यक्ष; जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजप सत्तेत
सांगोला (प्रतिनिधी) : सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर बार्शी तालुक्याच्या उपळाई ठोंगे गटातून निवडून आलेले भाजपचे दीपक वैद्य यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी, तर उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ गटाचे इंद्रजीत पवार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन्ही नावांची घोषणा केली असून या पदांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा राहणार आहे.

बुधवार, दि. १८ मार्च रोजी जिल्हा परिषदेत अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. जिल्हा परिषदेतील भाजपच्या गटनेत्या रश्मी बागल, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चेतनसिंह केदार सावंत, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आदी नेते यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल झाले. त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकडे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारांचे अर्ज जमा केले. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष दोन्ही पदे भाजपकडे जाणे निश्चित मानले जात होते. विरोधकांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दीपक वैद्य व इंद्रजीत पवार यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन अध्यक्ष- उपाध्यक्षांचा सत्कार केला.
बार्शीला ६५ वर्षांनंतर अध्यक्षपद
दीपक वैद्य यांच्या निवडीमुळे बार्शी तालुक्याला तब्बल ६५ वर्षांनंतर प्रथमच जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने वैद्य यांचे नाव आधीपासूनच आघाडीवर होते. शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेले वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते प्रथमच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असून थेट अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.
बार्शी तालुक्यात बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपला मिळालेल्या यशामुळे या तालुक्याकडे अध्यक्षपद आले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अध्यक्षपद धनगर समाजाकडे गेल्यानंतर सामाजिक समतोल राखण्यासाठी उपाध्यक्षपद मराठा समाजाला देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील इंद्रजीत पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. भाजपचे प्रांतिक सदस्य शहाजी पवार यांच्या प्रयत्नांमुळे उपाध्यक्षपद उत्तर सोलापूरकडे खेचले गेले, अशी चर्चा आहे. इंद्रजीत पवार हेही प्रथमच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांनी यापूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून काम केले आहे. पवार कुटुंबाची भाजपमधील निष्ठा आणि पडत्या काळात केलेले काम लक्षात घेऊन त्यांना ही संधी दिल्याचे सांगितले जाते.
उत्तर सोलापूरला दुसऱ्यांदा उपाध्यक्षपद
विशेष म्हणजे ज्या माजी अध्यक्ष बळीराम साठे यांचा पराभव करून इंद्रजीत पवार निवडून आले, त्याच साठे यांनी पूर्वी भूषवलेले उपाध्यक्षपद आता पवार यांच्या वाट्याला आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्याला यापूर्वीही उपाध्यक्षपद मिळाले होते. साठे यांनी १९९७-९८ मध्ये उपाध्यक्ष, तर २००९ ते २०१२ या कालावधीत अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते.



