महाराष्ट्र

मुंढे’ नावाचाच धाक!; ना पथक आलं, ना कारवाई… तरी सांगोल्यात पान टपऱ्यांवर शुकशुकाट

एफडीएच्या धडक मोहिमेची दहशत; अफवा पसरताच शटर डाउन, गुटखा विक्रेते पसार

‘मुंढे’ नावाचाच धाक!; ना पथक आलं, ना कारवाई… तरी सांगोल्यात पान टपऱ्यांवर शुकशुकाट

एफडीएच्या धडक मोहिमेची दहशत; अफवा पसरताच शटर डाउन, गुटखा विक्रेते पसार

 

सांगोला (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची राज्यभर निर्माण झालेली दहशत आता सांगोल्यातही स्पष्टपणे दिसून आली. विशेष म्हणजे, ना एफडीएचे पथक शहरात दाखल झाले, ना प्रत्यक्ष कारवाई झाली; मात्र “तुकाराम मुंढे यांचे पथक सांगोल्यात येणार” अशी चर्चा आणि सोशल मीडियावरील संदेश वाऱ्यासारखा पसरताच शहरातील अनेक पान टपऱ्यांनी सकाळपासूनच शटर खाली ओढले. काही टपरी चालकांनी तर संभाव्य कारवाईच्या भीतीने दुकानांमधील गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांचा साठाही हटविल्याची चर्चा दिवसभर रंगली.

राज्यात अवैध गुटखा, सुगंधित तंबाखू व प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे विक्रेत्यांमध्ये आधीपासूनच भीतीचे वातावरण आहे. राज्यातील विविध भागांत झालेल्या मोठ्या कारवायांनंतर सांगोल्यातही तपासणी होणार असल्याची अफवा पसरताच अनेक व्यावसायिकांनी कोणताही धोका न पत्करता दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

अन्न व औषध प्रशासनाचे राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचं पथक सांगोल्यात तपासणीसाठी येणार असल्याची अफवा पसरल्यानंतर अनेक पान टपऱ्या बंद करण्यात आल्या. अफवा ऐकूनच शहरातील अनेकांनी पान टपऱ्या धडधड बंद केल्या. कारवाईच्या भीतीपोटी अनेकजण टपऱ्या बंद करून टपरी चालक पसार झाले. सोशल मीडियावरील हा मेसेज व्हायरल होताच मिठाई दुकानांसह पानटपऱ्या आणि हॉटेल्स चालकांनी दुकाने बंद करून पळ काढला. अवैध गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री करणाऱ्या टपरी चालकांमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाची मोठी दहशत निर्माण झालीय. दिवसभर शहरातील अनेक चौकांमधील पान टपऱ्या बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेहमी ग्राहकांच्या गर्दीने गजबजणाऱ्या टपऱ्यांवर शुकशुकाट होता.

अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवायांमुळे राज्यभर अवैध गुटखा व तंबाखू विक्रेत्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. उत्पादकांपासून विक्रेत्यांपर्यंत सर्वांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, गंभीर प्रकरणांमध्ये मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सांगोल्यातील व्यावसायिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, शहरात प्रत्यक्ष एफडीएचे पथक आले नव्हते किंवा कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नव्हती. तरीदेखील केवळ अफवेमुळे अनेक पान टपऱ्या बंद राहिल्याने दिवसभर शहरात या घटनेची जोरदार चर्चा रंगली. “कारवाई झाली नाही; पण कारवाईच्या भीतीनेच दुकाने बंद झाली,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

‘मुंढे पॅटर्न’चा वाढता प्रभाव.                                      राज्यातील धाडसी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाची धुरा स्वीकारल्यानंतर अवैध गुटखा, तंबाखू आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात व्यापक मोहीम सुरू केली आहे. बेकायदेशीर गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्यांवर थेट मोक्का (MCOCA) लावण्याचे आदेश दिल्यामुळे, दंडात्मक कारवाई आणि दुकाने सील होण्याच्या भीतीने अनेक पान टपऱ्या बंद झाल्या आहेत. काहींनी तपासणीच्या भीतीने प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हटविण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी पान टपऱ्यांवर ग्राहकांची वर्दळ कमी झाली असून तपासणी पथकांच्या हालचालींवर विक्रेत्यांचे बारकाईने लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!