पेपर चोरी प्रकरण! सीसीटीव्ही बंद, कस्टडी अंधारात; व्यवस्थापनाला खडे बोल
५० प्रश्नपत्रिका लंपास; गटशिक्षणाधिकारी-मुख्याध्यापक निलंबित, पोलिस-होमगार्डवरही कारवाई

पेपर चोरी प्रकरण! सीसीटीव्ही बंद, कस्टडी अंधारात; व्यवस्थापनाला खडे बोल
५० प्रश्नपत्रिका लंपास; गटशिक्षणाधिकारी-मुख्याध्यापक निलंबित, पोलिस-होमगार्डवरही कारवाई
सांगोला (प्रतिनिधी): दहावी बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेबाबत अक्षरशः बेजबाबदारपणा झाल्याचे धक्कादायक वास्तव सांगोला येथील विद्यामंदिर प्रशालेत उघड झाले. कडक सुरक्षा असायला हवी असलेल्या बोर्ड कस्टडीतून भूगोल विषयाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिका चोरीस गेल्याने शिक्षण विभाग, पोलिस यंत्रणा आणि सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या व्यवस्थापनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला. सीसीटीव्ही बंद, कस्टडी रूममध्ये वीज नसणे, अपुरा पोलिस बंदोबस्त आणि जबाबदार अधिकाऱ्यांची निष्काळजीपणा यामुळे ही चोरी घडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शिक्षण विभागाने तडकाफडकी कारवाई करत प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व केंद्र संचालक तथा मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबित केले. तसेच बंदोबस्तावरील एक पोलिस कर्मचारी व दोन होमगार्ड यांच्यावरही निलंबनाची कारवाई केल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांनी सांगितले.
कुलूप तोडले, पेटी फोडली आणि प्रश्नपत्रिका गायब..
मंगळवारी सकाळी शिक्षण विभागाचे कर्मचारी कस्टडी रूममध्ये गेले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. आत तपासणी केली असता बोर्ड कस्टडी पेटीत ठेवलेल्या भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिका गायब असल्याचे स्पष्ट झाले.
इतक्या संवेदनशील कस्टडीमध्ये चोरी होणे म्हणजे सुरक्षेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले.
“ही बोर्ड कस्टडी की उघडे गोदाम?” — अधिकाऱ्यांचा संताप
घटनेची माहिती मिळताच विभागीय बोर्ड अध्यक्ष औदुंबर उकिरडे व जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी तातडीने पाहणी केली. पाहणीदरम्यान कस्टडी रूममध्ये सीसीटीव्ही बंद, विजेची सोय नाही, खोली असुरक्षित आणि इमारतीच्या कोपऱ्यात प्रश्नपत्रिका ठेवलेली पाहून अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. वारंवार सूचना देऊनही सुधारणा न केल्याबद्दल व्यवस्थापनाला झापत “शेतकऱ्यांच्या धान्याच्या कणग्याही यापेक्षा सुरक्षित असतात; ही कस्टडी आहे की उघडे गोदाम?” अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी जोरदार खरडपट्टी काढली.
नियम धाब्यावर; बंदोबस्त फक्त नावालाच
नियमानुसार बोर्ड कस्टडीसाठी एक सशस्त्र पोलिस अधिकारी व तीन कर्मचारी तैनात असणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्षात केवळ एक पोलिस कर्मचारी व दोन होमगार्ड असा तोकडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यातही तैनात असलेला पोलिस कर्मचारी घटनास्थळी नसल्याची चर्चा असून इतक्या महत्त्वाच्या कस्टडीची सुरक्षा अक्षरशः होमगार्डच्या भरवशावर सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
घटनेनंतर माध्यमिक शिक्षण विभागाने तातडीने कारवाई करत प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व मुख्याध्यापक तथा केंद्र संचालक अमोल गायकवाड यांना निलंबित केले. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर बंदोबस्तावरील एक पोलिस कर्मचारी व दोन होमगार्ड यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांनी दिली.
घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे व तहसीलदार बाळुताई भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून चोरीमागे कोणाचा हात आहे का याचाही तपास सुरू आहे. फॉरेन्सिक पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून चोरीमागील नेमका सूत्रधार शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
पेपर झाला, पण व्यवस्थेची पोलखोल
दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार भूगोल विषयाचा पेपर सुरळीत पार पडला असला तरी प्रश्नपत्रिका चोरीच्या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल झाली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. एवढ्या मोठ्या निष्काळजीपणामुळे बोर्ड परीक्षेच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.



