महाराष्ट्र

शिक्षणाचा खेळखंडोबा! परीक्षेच्या आदल्या दिवशी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ, बोर्ड कस्टडी रूमची सुरक्षा रामभरोसे, दहावीचा पेपर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार

शिक्षणाचा खेळखंडोबा! परीक्षेच्या आदल्या दिवशी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ, बोर्ड कस्टडी रूमची सुरक्षा रामभरोसे, दहावीचा पेपर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार

सांगोला (प्रतिनिधी): एकीकडे दहावीच्या परीक्षेचा शेवटचा टप्पा जवळ येत असताना शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणि बोर्ड कस्टडी रूमच्या सुरक्षेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथील बोर्ड कस्टडी रूमचे कुलूप तोडून दहावीच्या भूगोलाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी होणाऱ्या भूगोलाच्या पेपरवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी पुणे विभागीय बोर्डाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे व माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कस्टडी रूममध्ये विजेची सुविधा नसल्याने तसेच सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस यंत्रणेसह शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. बुधवार १८ मार्च रोजी होणारा दहावीचा भूगोल विषयाचा पेपर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. दरम्यान प्रभारीकट शिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे करीत आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षादरम्यान पेपरफुटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. राज्यात दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून राज्याच्या शिक्षण मंडळाने शर्थीचे प्रयत्न केलेत. अशातच सांगोल्यामध्ये परीक्षेआधीच दहावीचे भूगोलाचे ५० पेपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर प्रशाला या ठिकाणी तालुक्यातील सर्व केंद्रांवर प्रश्नपत्रिका वितरित करण्यासाठी ‘बोर्ड कस्टडी रूम’ करण्यात आली आहे. नियमानुसार, या ठिकाणची सुरक्षा अत्यंत कडक असणे अपेक्षित होते. मात्र, काल (सोमवारी) रात्री अज्ञात चोरट्यांनी या बोर्ड कस्टडी रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिका लंपास केल्या. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही साहित्याला हात न लावता केवळ प्रश्नपत्रिकाच चोरल्या गेल्याने हा पेपरफुटीचाच एक प्रकार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

बोर्ड कस्टडी रूम समोरील सीसीटीव्ही बंद असल्याने चोरट्यांचे कोणतेही फुटेज मिळू शकलेले नाही. या ठिकाणी बंदोबस्ताला असलेला कर्मचारी देखील ही घटना होताना कुठे होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.  मात्र थेट बोर्डाच्या पेपर ठेवलेले बोर्ड कस्टडी रूम फोडून प्रश्नपत्रिकाची चोरी होणे हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. ज्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याचे भवितव्य अर्थात प्रश्नपत्रिका ठेवल्या जातात, त्या बोर्ड कस्टडी रूम रूमची अवस्था पाहून पोलिसही चक्रावून गेले आहेत. अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. तसेच बोर्ड कस्टडी रूममध्ये लाईटची सोय नसल्याचे दिसून आल्याने शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ताशेरे ओढले. पेपर चोरीला जात असताना तेथील सुरक्षा व्यवस्था काय करत होती? बोर्ड कस्टडी रूमचे कुलूप तोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल जातेच कशी? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे, मात्र शिक्षण विभागाच्या या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
राज्यभरातील लाखो विद्यार्थी या पेपरची तयारी करत असताना सांगोल्यातील या प्रकारामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वर्षभर परिश्रम करून विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात. मात्र, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पेपर रद्द झाला किंवा फुटला, तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. सीसीटीव्ही बंद असणे आणि सुरक्षा नसणे यावरून शिक्षण विभागाने या प्रक्रियेला किती गांभीर्याने घेतले आहे, हेच दिसून येते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!