गुन्हेगारी

सांगोल्यात चक्क भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांवर चोरट्यांचा डल्ला, सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे

सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील बोर्ड कस्टडीत घडली घटना, भूगोलाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह ..?

सांगोल्यात चक्क भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांवर चोरट्यांचा डल्ला, सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे

सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील बोर्ड कस्टडीत घडली घटना, भूगोलाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह ..?

सांगोला (प्रतिनिधी): तालुक्यातील सुरक्षा व्यवस्थेसह शिक्षण व्यवस्थेची गंभीर अवस्था उघड करणारी धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री उघडकीस आली. अपुरी सुरक्षा व्यवस्था, बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेरे याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील बोर्ड कस्टडीच्या स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून १८ मार्च रोजी होणाऱ्या बोर्डाच्या भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिकांवरच डल्ला मारल्याची घटना घडली. या प्रकारामुळे सांगोल्यात सुरक्षा व्यवस्थेसह शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असून चोरीचा तपास करण्यासाठी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या चोरीमुळे केवळ सांगोलाच नव्हे तर संपूर्ण राज्य शिक्षण मंडळ हादरले असून गुरूवारी होणाऱ्या भूगोलाच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, आता बोर्ड काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाच्या परीक्षा सुरू असून उद्या 18 मार्च रोजी भूगोलाचा शेवटचा पेपर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील परीक्षा केंद्रासाठी ठेवण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशाला या ठिकाणी बोर्ड कस्टडीमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा करण्यासाठी एक पोलीस कर्मचारी व दोन होमगार्ड यांची नेमणूक करण्यात आली होती.
सीसीटीव्ही यंत्रणा बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांना संधी मिळाली आणि त्यांनी थेट भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिकाच लंपास केल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस व शिक्षण प्रशासनात खळबळ उडाली. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता या स्ट्रॉंग रूम जवळ अधिकारी पोचल्यावर कुलूप तोडल्याचे दिसून आले. या स्ट्रॉंग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद असल्याने चोरट्यांचे कोणतेही फुटेज मिळू शकलेले नाही. प्रश्नपत्रिकांची चोरी होताना या ठिकाणी बंदोबस्ताला असलेला कर्मचारी कुठे होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, प्रश्नपत्रिका चोरीची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, तहसीलदार बाळुताई भागवत, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रश्नपत्रिका चोरीसारखी गंभीर घटना घडल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी तणावाखाली असल्याचे स्पष्ट दिसून येत होते. डॉ. प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवपुजे यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस व होमगार्डची तसेच संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून झाडाझडती घेतली.

या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या गोपनीयतेवर मोठा प्रश्न निर्माण झाला असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित बाबीत झालेल्या निष्काळजीपणाबद्दल पालक व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करीत असून पेपरचे गठ्ठे शोधण्याचे काम सुरू झाले आहे. उद्या दहावीचा भूगोलाचा पेपर चोरीला गेल्याने उद्याच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या प्रकारात जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ही होऊ लागली आहे.

  1. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील बोर्ड कस्टडीत ठेवलेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका अज्ञात इसमाने स्ट्रॉंग रूमचे लॉक कटरने तोडून पळवल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. या ठिकाणी असलेले सर्व सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे चोरी करतानाचे फुटेज मिळू शकले नाही. सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचारी व होमगार्डची चौकशी सुरू आहे. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. – अपर पोलीस अधीक्षक डॉ. प्रितमकुमार यावलकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!