इसबावी बंधाऱ्यात पाणीपातळी खालावली; सांगोला शहरासह तालुक्यावर जलसंकट
उजनीचे पाणी पोहोचण्यास ३-४ दिवसांचा विलंब; ३० एप्रिलपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

इसबावी बंधाऱ्यात पाणीपातळी खालावली; सांगोला शहरासह तालुक्यावर जलसंकट
उजनीचे पाणी पोहोचण्यास ३-४ दिवसांचा विलंब; ३० एप्रिलपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

सांगोला (प्रतिनिधी): पंढरपूरयेथील भीमा नदीवरील इसबावी बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावल्याने ऐन उन्हाळ्यात सांगोला शहरासह तालुक्यावर जलसंकट ओढवले आहे. जलसंपदा विभागाकडून उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले असले तरी इसबावी बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी तीन-चार दिवसाचा कालावधी लागणार आहे त्यामुळे येत्या गुरुवार ३० एप्रिल पर्यंत सांगोला शहरात कमी दाबाने कमी वेळासाठी व अवेळी पाणीपुरवठा होणार आहे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व नगराध्यक्ष आनंदा माने यांनी केले आहे.
सांगोला शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजारावर पोचली असून लोकसंख्या शहरासह उपनगर व १३ वाड्या वस्त्यावर विखुरलेली आहे. सांगोला नगरपालिकेकडून शहरात सुमारे ६ हजार ५८५ नळकनेक्शन जोडणी दिली आहे. शहराला दररोज सुमारे ५५ लाख लिटर पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागवली जाते. दरम्यान पंढरपूर इसबावी बंधाऱ्यातून पाणी पंपिंगद्वारे पाईपलाईन मधून सांगोला -पंढरपूर रोडवरील जलशुद्धीकरण केंद्रात आणून शुद्धीकरण केले जाते तेथून पाणी उचलून शहर व उपनगरातील ११ पाण्याच्या उंच टाक्यातून पाणीपुरवठ्याचे दैनंदिन वितरण केले जाते.
पंढरपूर इसबावी बंधाऱ्यातून सरासरी ११ लाख लिटर पाणी पंपिंगद्वारे शिरभावी मुख्य टॅंक या ठिकाणी जलशुद्धीकरण आणले जाते. त्यानंतर शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून सांगोला तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार सुमारे २६ हजार ३२६ नागरिकांची तहान भागवली जात आहे.
सांगोला नगरपालिकेकडून जवळपास सर्व नळ कनेक्शनला मीटर जोडणी केल्यामुळे नागरिकांकडूनही पाण्याचा अपव्यय होत नाही. पंढरपूर इसबावी बंधाऱ्यातून दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून नगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा सभापती वैशाली सावंत यांनी केले आहे



