भाकरीच्या चंद्रावर अवकाळीचा डाग…
यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीच्या उत्पादनात घट

भाकरीच्या चंद्रावर अवकाळीचा डाग…
यंदा ज्वारीच्या भाकरीची चव महागणार; मालदांडी ज्वारीच्या उत्पादनात घट
सांगोला (प्रतिनिधी): एकेकाळी ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात फळपिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा ज्वारीचा पेरा ७० टक्केच झाला आहे. यामुळे हुरड्यावरही संक्रांत आली आहे. गरिबांची भाकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्वारीच्या बाजारभावात वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात ज्वारीचे क्षेत्र घटल्याने त्याचा परिणाम ज्वारीच्या उत्पादनावर होणार असून यामुळे ज्वारीचे दर यंदा गगणाला भिडले आहेत. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने ज्वारी पिकांचे नुकसान झाले असून गरिबांचे प्रमुख अन्न असलेल्या भाकरीच्या चंद्रावर अवकाळीचा डाग पडला आहे.
चपातीपेक्षा भाकरी महाग झाली असून भाकरीचे आयुर्वेदिक महत्व वाढले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात ज्वारीचा धान्य बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ज्वारीचा भाव वधारल्याने सर्वसामान्यांची कष्टाची भाकर महाग झाली आहे. हॉटेलमध्ये सुद्धा भाकरीची किंमत चपातीपेक्षा जास्त आहे. ज्वारीचा घटता पेरा व आरोग्याला असलेले आयुर्वेदिक लाभ यामुळेच आपसूकच भाकरीकडे अनेक जण वळत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत आहाराला अति महत्त्व आले आहे. गत अनेक वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे. अशातच यावर्षी पावसामुळे ज्वारीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात गरिबांची भाकर आणखीनच महागणार असल्याचे चित्र आहे.
गरिबांचे प्रमुख अन्न असलेली भाकरी महागली आहे. ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र दीड लाख हेक्टरने घटल्यामुळे ज्वारीचे दर वाढले आहेत. दिवाळीपूर्वी ३५ रुपये किलो असलेला ज्वारीचे दर सध्या ४५ ते ५५ रुपयांवर गेले आहेत. गव्हापेक्षा ज्वारीचा दर अधिक असल्यामुळे भाकरीची श्रीमंतांचे अन्न होण्याकडे वाटचाल सुरू आहे. गरिबांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. ग्रामीण भागात भाकरीला पसंती असली, तरी शहरात गव्हाची चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे ज्वारीची आवक यंदा घटली आहे.
शेतशिवारात सध्या सकाळपासून सायंकाळपर्यंत काढणीची लगबग सुरू असली तरी खर्चाचा ताण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. ग्रामीण भागात मनुष्यबळाची टंचाई भासत असून, काही मजूर इतर भागात कामासाठी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे उपलब्ध मजुरांची मागणी वाढली असून त्याचा परिणाम मजुरीदरांवर झाला आहे. सध्या शेतशिवारात ‘मजूर मिळणे कठीण’ अशी स्थिती आहे. अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी अनेक दिवसांपासून ज्वारीच्या काढणीसाठी आणि साठवणुकीसाठी मेहनत घेत होते, मात्र अचानक आलेल्या पावसाने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. या अवकाळी पावसामुळे ज्वारीची गुणवत्ता खराब होण्याबरोबरच, ती पूर्णपणे भिजल्याने विक्रीसाठी अयोग्य बनली आहे. अशा प्रकारे अवकाळी पावसाने शेतीत नुकसान झाल्याच्या घटना समोर येत आहेत, ज्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ज्वारीला तृणधान्यातील उपयोगी आरोग्यदायी धान्य मानले जाते. ज्वारीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि जस्त यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहेत. ‘ब’ जीवनसत्त्वे भरपूर असल्याने शरीराला नैसर्गिक आणि दीर्घकाळ ऊर्जा मिळते, वजन नियंत्रणात राहते. लोह, अँटिऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. लोह रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवते, अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणार्या अमिनो अॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात २०१६-१७ ते २०१९-२० यादरम्यान ज्वारीचे क्षेत्र १७ लाख ३६ हजार २८६ हेक्टर होते. २०१९-२० ते २०२३-२४ या दरम्यान ज्वारीचे क्षेत्र १४ लाख ९५ हजार ७९२ हेक्टर होते. २०२४-२५ साली ज्वारीचे क्षेत्र १५ लाख ४६ हजार ३५५ हेक्टर इतके होते. चालू वर्षी १३ लाख ९१ हजार ८४१ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीच्या पेरणीत चार लाख ३२ हजार ३७५ हेक्टरने घट झाली आहे. ऊस, फळबागा आणि अन्य पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र घटल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. परंपरेने रब्बी ज्वारीचे कोठार असलेल्या सोलापूरमध्ये यंदा ज्वारी पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे. प्रस्तावित २ लाख ७५ हजार ०८८ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ २ लाख २७ हजार ६२० हेक्टर (८३ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली.



