ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर पर्यंत…
शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर पर्यंत…
शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
सांगोला (प्रतिनिधी): गतवर्षीपासून शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर शेतकऱ्याने आपल्या शेतातील पीक मोबाईलवर नोंदवून अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र या ऑनलाईन प्रक्रियेत सर्व्हर डाऊनची समस्या कायम असल्याने शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १४ सप्टेंबर २०२५ पर्यंत असल्याने शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
शेतपीकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक नोंदणी केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाउन होत असल्याने शेतकऱ्याना अडचणीला सामोरे जावे लागले आहे. ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी, नेटवर्क समस्या, सव्र्व्हरवरील भार यामुळे ई पिक पाहणी अपलोड होत नसल्याने दररोज शेतकरी हताश होऊन परतत आहेत. शेतकऱ्यांना योजनांचा लाभ द्यायचा असेल, तर शासनाने या प्रक्रियेचा पुनर्विचार करून पर्यायी सोपी पद्धत लागू करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. १४ सप्टेंबर पर्यंत ही नोंदणी करून घ्यायची आहे. मात्र ई-पीक पाहणीच्या ॲपचे सर्व्हर डाउनमुळे ई-पीक नोंदणीत अडचणी येत आहेत.
शेतकऱ्यांनी ॲपवर स्वतःच्या मोबाइलमधून नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. खरिपातील विविध पिकांच्या पेरणी क्षेत्राची योग्य आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध व्हावा. पेरा केलेल्या पिकाची ई-पीक पाहणी नोंदणी करणे हे राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. पिक पाहणी नोंदणी न केल्यास पीक विमा, शासकीय अनुदान, पंतप्रधान सन्मान निधी तसेच राज्य सरकारच्या नमो किसान योजनाचा लाभ मिळणार नाही, असे असल्याने शेतकरी ई-पीक पाहणी करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे, ही नोंदणी पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
महत्वाचे…
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी, ई-पीक पाहणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे.
तुमच्या मोबाईलमधील ‘ई-पीक पाहणी (DCS)’ हे ॲप Google Play Store वरून अपडेट करून घ्या.
तुमचा मोबाईल नंबर वापरून ॲपमध्ये लॉग-इन करा आणि प्राप्त झालेला OTP टाका.
तुमचा जिल्हा, तालुका, आणि गावाचे नाव निवडा. त्यानंतर खाते नंबर टाकून शेताची माहिती भरा.
खरीप हंगाम निवडून तुमच्या शेतात सध्या असलेले पीक (उदा. सोयाबीन, मका, उडीद) आणि त्याला मिळणारे पाणी याची माहिती अचूक नोंदवा.
फोटो अपलोड करा: तुमच्या पिकाचे दोन स्पष्ट फोटो योग्य दिशेने काढून अपलोड करा.
माहिती सबमिट करा: सर्व माहिती काळजीपूर्वक तपासा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर, कोणत्याही चुका 48 तासांच्या आत दुरुस्त करता येतात.
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र होण्याकरिता, ही नोंदणी वेळेवर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.