राज्याच्या केळी निर्यातीत सोलापूर राज्यात नंबर वन
उजनीच्या लाभक्षेत्रात बहरले केळीचे मळे, ९ लाख ५० हजार मेट्रिक टन केळीची निर्यात

राज्याच्या केळी निर्यातीत सोलापूर राज्यात नंबर वन
उजनीच्या लाभक्षेत्रात बहरले केळीचे मळे, ९ लाख ५० हजार मेट्रिक टन केळीची निर्यात
सांगोला (प्रतिनिधी): एकेकाळी कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्याने आता कृषी क्षेत्रात नवा इतिहास घडविला आहे. ऊस, द्राक्ष आणि डाळिंबासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याने आता केळी निर्यातीत राज्यात अव्वल स्थान पटकावत जळगावलाही मागे टाकले आहे. ऊस, डाळिंब आणि द्राक्षाची ओळख सांगणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात अलीकडच्या काही वर्षांत केळी क्षेत्रात वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात केळीची ४० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. तर निर्यातीतला वाटाही जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. उजनी धरणातून हमखास पाणी मिळण्याची खात्री असल्यामुळे लाभक्षेत्रातील करमाळा, माळशिरस, माढा, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यांत केळींची लागवड वाढली आहे. निर्यातीत सोलापूरने जळगावला मागे टाकले आहे. २०२५-२६ या सालात सोलापूर जिल्ह्यातून ४५ हजार ६९६ कंटेनरच्या माध्यमातून ९ लाख ५० हजार २७० मेट्रिक टन इतकी केळीची निर्यात झाली आहे.

सोलापूर हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण अलीकडच्या काही वर्षांत उजनी धरणाच्या पाण्यामुळे हे चित्र बदलले आहे. त्यात जिल्ह्यातील माढा, करमाळा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यांना लाभलेला भीमा नदीचा काठ आणि दुसरीकडे माळशिरस, सांगोला या भागाला मिळालेले म्हैसाळ, टेंभू, नीरा देवघर, नीरा-भाटघरसारख्या प्रकल्पाचे पाणी हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच या पट्ट्यात आता ऊस, द्राक्ष आणि डाळिंबाबरोबर केळीचे क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे.
करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ आणि पंढरपूर या तालुक्यांत दहा ठिकाणी केळीच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. शीतगृह, दर्जेदार वेष्टन व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापुरातून इराण, ओमान, दुबई, इराक, सौदी अरेबिया, नेपाळ येथे केळींची निर्यात करण्यात येते. निर्यातक्षम उत्पादन आणि निर्यातीसाठीच्या सोयी-सुविधांबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते.
राज्यात प्रामुख्याने जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत केळी लागवड होते. जळगावच्या केळींचा देशभरात दबदबा असला तरी, पाच-सहा वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याने केळीच्या निर्यातीत आघाडी घेतली आहे. २०२१-२२ या सालात सोलापूर जिल्ह्यातून ११ हजार ०३८ कंटेनरच्या माध्यमातून ३ लाख ६० हजार ७६० मेट्रिक टन केळींची निर्यात झाली होती. उजनी धरणातून पाणी मिळण्याची हमखास खात्री असल्यामुळे करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यांत केळी खालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.
२०२५-२६ या काळात केळी निर्यात मेट्रिक टन पुढीलप्रमाणे, कंसात कंटेनर संख्या, कंदर (करमाळा) १ लाख २८ हजार २११ मेट्रिक टन (६१६४ कंटेनर), अकलूज (माळशिरस) २ लाख २३ हजार १७४ मेट्रिक टन (१० हजार ७३० कंटेनर), टेंभुर्णी (माढा) २ लाख ३३ हजार २४४ मेट्रिक टन (११ हजार २१४ (कंटेनर), जेऊर (करमाळा) ६१ हजार ७१४ मेट्रिक टन (२९६७ कंटेनर), शेटफळ (मोहोळ) ३६ हजार ३५८ मेट्रिक टन (१७४८ कंटेनर), वाशिंबे ( करमाळा) ६७ हजार ४५४ मेट्रिक टन (३२४३ कंटेनर), वरकटणे (करमाळा) ७५ हजार ५६३ मेट्रिक टन (३६३३ कंटेनर), करकंब (पंढरपूर), ७१ हजार २८२ मेट्रिक टन (३४२७ कंटेनर), येवती (मोहोळ) २९ हजार ८५२ मेट्रिक टन (१४३५ कंटेनर), आष्टी (मोहोळ) २३ हजार १४८ मेट्रिक टन (११२६ कंटेनर) अशी एकूण ९ लाख ५० हजार २७० मेट्रिक टन (४५ हजार ६५६ कंटेनर) केळीची निर्यात झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातून जर्मनी, नेदरलँड्स, रशिया, युके या देशांमध्ये १२ लाख ३६ हजार ५५० किलो द्राक्षे, नेपाळ मध्ये १ लाख १३ हजार ४३० किलो चिंच, बेल्जियम, चीन, फ्रान्स, इटली, जर्मनी, जपान, युएसए व इतर देशांमध्ये ६० हजार १४० किलो चिंच बी पावडर निर्यात केली आहे.
“सोलापूरची केळी आता जागतिक ब्रँड”
उजनीच्या पाण्यावर बहरलेली शेती, आधुनिक निर्यात व्यवस्था आणि मेहनती शेतकऱ्यांच्या जोरावर सोलापूर जिल्ह्याने केळी निर्यातीत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. “सोलापूरची केळी” हा आता जागतिक बाजारपेठेत विश्वासार्ह कृषी ब्रँड बनत असून, भविष्यात या निर्यातीचा आकडा आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.



