सांगोल्यात अवकाळी पावसाचा तडाखा; फळबागांसह उभी पिके उद्ध्वस्त
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांची कृषिमंत्र्यांकडे धाव; तात्काळ पंचनामे व आर्थिक मदतीची मागणी

सांगोल्यात अवकाळी पावसाचा तडाखा; फळबागांसह उभी पिके उद्ध्वस्त
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांची कृषिमंत्र्यांकडे धाव; तात्काळ पंचनामे व आर्थिक मदतीची मागणी
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फळबागा, भाजीपाला आणि उभी पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई येथे कृषिमंत्री डॉ. दत्तात्रय (मामा) भरणे यांची भेट घेत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील चोपडी, नाझरे, बलवडी, सोमेवाडी, हातीद, उदनवाडी, गौडवाडी यांसह अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्र्यांना दिली. विशेषतः डाळिंब, द्राक्ष, पेरू, भाजीपाला आणि इतर नगदी पिकांवर या नैसर्गिक संकटाचा मोठा परिणाम झाला आहे. गारपिटीमुळे अनेक फळबागांवरील संरक्षक जाळ्या फाटल्या असून झाडे उन्मळून पडली आहेत. उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आधीच उत्पादन खर्च, बाजारभाव आणि नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता नव्या संकटाचे सावट निर्माण झाले आहे.

यावेळी आमदार डॉ. देशमुख यांनी महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत मंजूर करण्याची मागणी केली. तसेच बाधित भागातील परिस्थिती गांभीर्याने घेऊन शासनाने त्वरित मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, कृषिमंत्री डॉ. दत्तात्रय (मामा) भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून बाधित शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत देण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन दिले. कृषिमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानत, शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.




