महाराष्ट्र

सामान्य कार्यकर्ता ते मराठ्यांचा तारणहार…!

चर्चेतील व्यक्तिमत्व संघर्षयोद्धा मनोज जरांगें पाटील यांचा धगधगता प्रवास

सामान्य कार्यकर्ता ते मराठ्यांचा तारणहार…!

चर्चेतील व्यक्तिमत्व संघर्षयोद्धा मनोज जरांगें पाटील यांचा धगधगता प्रवास

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मराठा आरक्षणासाठी मागील १५ वर्षांपासून मनोज जरांगे पाटील जिवाचे रान करीत आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी २९ ऑगस्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर संघर्षयोद्धा मनोज जरांगें पाटील यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी मुंबईत गेलेल्या मराठा बांधवांशी वेगवेगळ्या मीडियातले रिपोर्टर जेंव्हा संवाद साधतात तेंव्हा एक समान गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे गेलेले सर्व लोक शेतकरी आहेत. शेती परवडत नाही म्हणून लेकरा-बाळांसाठी आम्हाला आरक्षण पाहिजे हा एकच सूर सगळ्यांचा आहे.


दरम्यान, मराठ्यांचं वादळ पुन्हा मुंबईत धडकल्यानंतर मनोज जरांगे पाटील नेमके कोण आहेत?, अशी चर्चा रंगली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणजे गरीब मराठ्यांचे डोळ्यातले अश्रू, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आवाज आणि सरकारला हादरवणारा अपराजित योद्धा होय. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो वाहनांच्या ताफ्यासह लाखो मराठ्यांना मुंबईत घेऊन धडक देणारे मनोज जरांगे पाटील सध्या चर्चेत आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराठीतून मुंबईचे दिशेने मोर्चा काढला. 27 ऑगस्टला मनोज जारंगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाले आणि हजारो वाहनांसह लाखो मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये मनोज जरांगे पाटील नाव चर्चेत आलं.


संघर्षयोद्धा मनोज जरांगें पाटील हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीचीच आहे. 2013 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे म्हणून त्यांनी शंभुराजे या नाटकाचे प्रयोग बीड, जालना, अंबड, शहागड येथे आयोजित केले. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचं काम केलं. २९ ऑगस्ट २०२३ रोजी अंतरवाली सराटी येथे झालेला अमानुष लाठीमार हा महाराष्ट्रातील राजकारण आणि राजकारणाचा काळा दिवस होता. आंदोलन करणाऱ्या नेत्यावर, उपोषणाला बसलेल्या बाया माणसांवर, अशा निर्दयपणे लाठीमार आणि गोळीबार होईल, हे कुणालाही पटले नव्हते. पण हाच तो क्षण होता ज्याने संपूर्ण मराठा समाज पेटून उठला. त्या दिवसापासून सरकारसमोर उभा ठाकलेला प्रश्न फक्त मनोज जरांगे पाटील यांचा नव्हता, तो कोट्यवधी मराठ्यांचा होता.
गेल्या दोन वर्षांत सरकारने कितीतरी आश्वासने दिली. समित्या नेमल्या, शिफारसी केल्या, कागदोपत्री निर्णय घेतल्याचे ढोल वाजवले. पण प्रत्यक्षात काय ? आजही आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. मात्र जरांगे पाटील थकले नाहीत, झुकले नाहीत, थांबले नाहीत. मनोज जरांगें पाटलांचा आवाज अधिक प्रखर झाला आणि समाजाचा जनसागर त्यांच्याभोवती अनेक पटीने वाढला.

कोणी नेते समाजकारणाच्या नावावर घरदार, गाड्या-घोडे जमवतात. पण जरांगे पाटील यांनी उलट समाजकार्यासाठी आपली शेती विकली. स्वतःची संपत्ती गमावून ते समाजासाठी उभे राहिले. सरकार मॅनेज करू पाहते, पण मनोज जरांगे पाटील मॅनेज होत नाहीत, सरकारची मोठी समस्या म्हणजे हा नेता कुणाच्या दबावाला झुकत नाही. मंत्री, मुख्यमंत्री अंगावर आले तरी चर्चा उघडपणे करतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणे हेच एकमेव जरांगे पाटील आणि समाजाचे लक्ष्य आहे. मराठा समाजातील मोठा भाग लहान शेतकरी आहे, विशेषतः कोरडवाहू भागात हा समाज शेती करतो. शेतीवर अवलंबून असल्यामुळे कर्जबाजारीपणा, आत्महत्या, उत्पन्नातील अस्थिरता ही गंभीर सामाजिक आर्थिक समस्या आहे. म्हणून, शिक्षण आणि रोजगारात टिकून राहण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणारे हक्काचे ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला मिळावे अशी संघर्षयोद्धा मनोज जरांगें पाटील यांची मागणी आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!