प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा- रणजितसिंह निंबाळकर
भाजपा सोलापूर ग्रामीणच्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६” ला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा- रणजितसिंह निंबाळकर
भाजपा सोलापूर ग्रामीणच्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६” ला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगोला (प्रतिनिधी): स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज, गोपाळपूर येथे भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान २०२६” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. प्रदेश सचिव रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रशिक्षण वर्गात संघटन मजबुती, विचारधारा, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया, कार्यविस्तार आणि देशासमोरील आव्हाने अशा विविध विषयांवर मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले. दरम्यान प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना संघटन बळकटीची नवी दिशा मिळेल असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा पदाधिकारी, जिल्ह्यातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, बूथ प्रमुख, बीएलए -1 प्रतिनिधी तसेच युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुनीत जोशी यांनी “विकास, संगोपन आणि जबाबदारी जाणीव” या विषयावर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांनी समाजाशी सतत संपर्क ठेवून जबाबदारीने संघटन कार्य करावे, असे सांगितले. त्यांनी विकासकामांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी महेरदीप महेश पाटणे यांनी “SIR” विषयावर मार्गदर्शन करत बूथ स्तरावर मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेची माहिती दिली. बोगस मतदारांची नावे कमी करणे, पात्र मतदारांची नोंदणी करणे आणि मतदार यादी अधिक पारदर्शक करण्यासाठी बीएलए-1 यांनी सक्रियपणे काम करावे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथवर जबाबदारीने काम करून संघटन अधिक सक्षम करावे, असे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्र विभागीय संवादक योगेश बाचल यांनी “बूथ व्यवस्थापन” विषयावर मार्गदर्शन करत प्रत्येक बूथ हा पक्षाचा मजबूत पाया असून बूथ निहाय नियोजन, मतदार संपर्क, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि निवडणूक व्यवस्थापन यावर त्यांनी विशेष भर दिला. महाराष्ट्र राज्य ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी “कार्यविस्तार” या विषयावर मार्गदर्शन करत भाजपा विचारधारा गावागावात पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका घ्यावी. संघटन वाढीसाठी नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहन त्यांनी केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे यांनी “विचार परिवार” या विषयावर मार्गदर्शन करत भाजपा ही केवळ राजकीय संघटना नसून राष्ट्रहिताची विचारधारा असल्याचे सांगितले. सोलापूर ग्रामीण (माढा) जिल्हा प्रभारी संजय जगताप यांनी प्रशिक्षण वर्गास भेट देऊन संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत विविध सत्रांची माहिती घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रशिक्षण वर्गाचे कौतुक केले.
भारत आमदापुरे यांनी “देशासमोरील आव्हाने” या विषयावर मार्गदर्शन करत राष्ट्रीय सुरक्षेपासून आर्थिक विकासापर्यंत विविध मुद्द्यांवर विचार मांडले. बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांनी सजग राहून जनतेमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवावा, असे त्यांनी सांगितले.
अनिकेत निकम यांनी “सोशल मीडिया आणि नमो ऍप” या विषयावर मार्गदर्शन करत डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. नमो ॲपचा प्रभावी वापर करून कार्यकर्त्यांनी संघटनाशी सातत्याने जोडलेले राहावे, असे त्यांनी सांगितले. सुरेश हळवणकर यांनी “भाजपा इतिहास” या विषयावर मार्गदर्शन करत भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. राष्ट्रहित, संघटनशक्ती आणि विचारधारा यावर भाजपा उभी असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक जोमाने संघटन कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणामुळे पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तथा भाजपा सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियान संयोजक सचिन शिंदे, सहसंयोजक दत्तात्रय जाधव तसेच सर्व आयोजक समिती यांचे सहकार्य लाभले.



