दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरुवात.

सांगोला (प्रतिनिधी): येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला बुधवार दिनांक २० मे पासून सुरुवात झाली. प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र ६४७१ ला मान्यता मिळाली असून ही प्रक्रिया सोमवार दि. २२ जून २०२६ पर्यंत चालणार आहे. डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज नोंदणी, भरलेले अर्ज स्वीकारून कागदपत्रांची पडताळणी व अर्ज निश्चिती या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे.
विद्यार्थी दिनांक २० मे २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवडून ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे तसेच आपल्या प्रवर्गासाठी कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश अर्ज निश्चित करू शकतात. दिनांक २४ जून २०२६ रोजी मंडळाच्या संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित करण्यात येतील. विद्यार्थी त्यांच्या प्रवेश अर्जात काही त्रुटी असल्यास दिनांक २५ जून २०२६ ते ३० जून २०२६ यादरम्यान दुरुस्त्या करून घेऊ शकतात. मंडळाच्या संकेतस्थळावर दिनांक ०२ जुलै २०२६ रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करण्यात येतील.

सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, जत, आटपाडी इ. तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन संबंधित कागदपत्रे जमविताना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला येथे सुविधा केंद्र असून याचा फायदा पालकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव (भाऊ) गायकवाड यांनी केले.

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे एक परिपूर्ण इंजिनियर किंवा व्यावसाविक होऊन बाहेर पडतात. कॉलेजमध्ये असणाऱ्या उपलब्ध सुविधा, शिक्षणाचा दर्जा, शिस्त या गोष्टीमुळे पालकांची नेहमीच शिवाजी पॉलिटेक्निकला पसंती राहिली आहे.



