राजकीय

गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम विद्यार्थी आणि हरित भविष्याचा संकल्प – चेतनसिंह केदार सावंत

गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम विद्यार्थी आणि हरित भविष्याचा संकल्प – चेतनसिंह केदार सावंत

सांगोला (प्रतिनिधी): शिक्षणासोबत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश देत सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने यंदाच्या आषाढी वारीत एक अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर आणि माळशिरस तालुक्यात तब्बल ५ लाख सीडबॉल तयार करून वारकरी भाविकांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

करमाळा पंचायत समितीच्या बचत भवनात पार पडलेल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मासिक आढावा बैठकीत हा महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढ, विद्यार्थ्यांचे भविष्य, शिक्षक समायोजन, शिष्यवृत्ती योजना आणि शाळांच्या विकासावर व्यापक चर्चा झाली. बैठकीस जि.प. सदस्य चंद्रकांत जाधव, श्रुती भोरगुंडे, सुषमा नारनवर, पंचायत समिती सभापती दिपाली ताड, पूजा ढेरे यांच्यासह शिक्षणाधिकारी कादर शेख, सचिन जगताप आणि विविध तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी गणित व विज्ञान विषयांवर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, क्रीडा विकास आणि डिजिटल शिक्षण यावरही सकारात्मक चर्चा झाली.दरम्यान, अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रियेला वेग देण्यात आला असून ११६ शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले आहे, तर ६७२ रिक्त पदांबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. आषाढी वारीत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्यासाठी सीडबॉल वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार असून, “वारीतून हरित क्रांती” घडविण्याचा निर्धार शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे. शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!