कृषी सल्लासामाजिक

सांगोल्यात अवकाळीचा कहर; ११९ हेक्टर शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल

द्राक्षे, डाळिंब, आंबा बागांचा मोठा फटका; वीज पडून ३ म्हशी, एक गाय, चार शेळ्या, २ मेंढ्यांचा मृत्यू

सांगोल्यात अवकाळीचा कहर; ११९ हेक्टर शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल

द्राक्षे, डाळिंब, आंबा बागांचा मोठा फटका; वीज पडून ३ म्हशी, एक गाय, चार शेळ्या, २ मेंढ्यांचा मृत्यू

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात मार्च व एप्रिल महिन्यात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने भीषण कहर केला असून तालुक्यातील सहा गावांतील सुमारे १६१ शेतकऱ्यांच्या तब्बल ११९ हेक्टर क्षेत्रावरील शेती व फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान दोन शेतकऱ्यांच्या चार शेळ्यांसह दोन मेंढ्या तर चार शेतक-यांपैकी तीन शेतकऱ्यांच्या तीन म्हशी व एका शेतकऱ्याची गाय वीज पडून मयत झाली आहे. शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित खातेदार शेतकरी यांना शासकीय अनुदान अदा करण्यात येईल असे तहसीलदार श्रीमती बाळूताई भागवत यांनी सांगितले.

सांगोला तालुक्यात यंदा मार्च व एप्रिल महिन्यात अचानक आलेल्या सुसाट वादळी वाऱ्यासह गारपीटीच्या पावसाचा अनेक गावांना फटका बसल्याने शेती पिकांसह द्राक्षे, केळी, आंबा, चिकू, डाळिंब फळ पिकांना बसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सांगोला तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे उभ्या पिकांची अक्षरशः नासधूस झाली असून अनेक ठिकाणी फळबागा जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षे, केळी, आंबा, चिकू, डाळिंब यांसारख्या फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, वीज पडून जनावरांचा देखील मोठा बळी गेला आहे. सोमेवाडी येथील महेश हणुमंत काळेल यांच्या चार शेळ्या, डिकसळ येथील दत्तात्रय बबन गेजगे यांची एक म्हैस, जवळा येथील धनाजी हरिबा धुमाळ यांची एक म्हैस, कोंबडवाडी येथील तानाजी किसन कोळेकर यांची गाय व वाटंबरे येथील बाळासाहेब निवृत्ती गायकवाड यांची म्हैस वीज पडून मृत्युमुखी पडली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे.

महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, उदनवाडी येथे १८ शेतकऱ्यांचे ८.५५ हेक्टर, झापाचीवाडी येथे १२ शेतकऱ्यांचे ६.५५ हेक्टर, कारंडेवाडी येथे ६ शेतकऱ्यांचे ४.९० हेक्टर, अकोला येथे ७ शेतकऱ्यांचे २.८५ हेक्टर, राजुरी येथे तब्बल ११८ शेतकऱ्यांचे सुमारे ९५.८० हेक्टर आणि गावडेवाडी येथे २ शेतकऱ्यांचे ०.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकूण १६१ शेतकऱ्यांच्या सुमारे ११९ हेक्टरवरील शेती व फळपिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उर्वरित गावांतील पंचनामे अद्याप सुरू असून अंतिम नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शासनाच्या निर्देशानुसार कृषी विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकांकडून थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी तातडीने मदत देण्याची मागणी केली असून पंचनामे लवकर पूर्ण करून अनुदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तहसीलदार श्रीमती बाळूताई भागवत यांनी सांगितले की, शासन निर्णयातील तरतुदीनुसार बाधित शेतकऱ्यांना शासकीय अनुदान दिले जाणार असून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले असून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!