महाराष्ट्र

पंढरपूर देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात

जुनोनीजवळ टायर फुटलेल्या कारला ईरटीगाची जोरदार धडक; माय-लेकाचा जागीच मृत्यू, सहाजण जखमी

पंढरपूर देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात

जुनोनीजवळ टायर फुटलेल्या कारला ईरटीगाची जोरदार धडक; माय-लेकाचा जागीच मृत्यू, सहाजण जखमी

सांगोला (प्रतिनिधी): अधिक मासानिमित्त पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या सांगली जिल्ह्यातील भाविकांच्या ईरटीगा कारचा जुनोनी (ता. सांगोला) परिसरात भीषण अपघात झाला. समोरील कारचा टायर फुटून वाहन अचानक रस्त्यात आल्याने पाठीमागून येणाऱ्या ईरटीगा कारची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवार, दि. २५ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास सांगोला–मिरज महामार्गावरील जुनोनी येथील माणदेशी विद्यालयाजवळ घडला.

या अपघातात संदीप चिंतामणी भोसले (वय ३०) व रेखा चिंतामणी भोसले (वय ६५, दोघे रा. पलूस, जि. सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला. तर ज्योती संदीप भोसले (२५), विद्या अनिल भोसले (४२), अनिल चिंतामणी भोसले, वेदांत अनिल भोसले (१०), दूर्वा अनिल भोसले (८) आणि वैभव अनिल भोसले (१२) हे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी महिलेवर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अन्य चौघांवर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभूराजे साळुंखे यांनी खबर दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पलूस जि सांगली औद्योगिक वसाहतीतील अनिल भोसले ,संदीप भोसले, रेखा भोसले, ज्योती भोसले, विद्या भोसले, वेदांत भोसले, दुर्वा भोसले व वैभव भोसले असे मिळून सर्वजण सोमवारी सकाळी ८ वाजता पलूस येथून एम एच -१०डीक्यू-०६७० ईरटीका कार मधून अधिक मासानिमित्त पंढरपूर देवदर्शन करून पुढे अतिश माने ( पेनूर ता मोहोळ ) नातेवाईकाकडे जाणार होते.

दरम्यान, त्यांची कार मिरजकडून सांगोल्याच्या दिशेने येत असताना जुनोनी गावाजवळ समोरील एमएच-४३ एजे-३४४७ या कारचा उजव्या बाजूचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कार अचानक उजव्या बाजूला आली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ईरटीगा कारची त्या वाहनाला जोरदार धडक बसली. धडकेनंतर ईरटीगा कार दुभाजक ओलांडून रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन तीन ते चार पलट्या झाली. त्यामुळे अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र संदीप भोसले व रेखा भोसले यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे पलूस परिसरात हळहळ व्यक्त होत असून भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार बाबासाहेब भातुगडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!