प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार’ प्रदान
सर्वसाक्षी’ काव्यसंग्रहाचे कोल्हापुरात प्रकाशन
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील आलेगाव येथील सुपुत्र तथा किसन वीर महाविद्यालय, वाई (जि. सातारा) येथील मराठी विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याला आणखी एक मानाचा तुरा लाभला आहे. त्यांच्या ‘सर्वसाक्षी’ या नव्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच कोल्हापूर येथे मोठ्या साहित्यिक वातावरणात पार पडले. याच वेळी त्यांना ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
सध्या पुणे (पश्चिम) येथील किवळे परिसरातील ‘लिटल अर्थ’ येथे वास्तव्यास असलेले प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांनी आयुष्यभर अध्यापन करत असतानाच साहित्यसेवेची अखंड साधना सुरू ठेवली. कविता, कथा, ललित लेखन आदी विविध साहित्यप्रकारांत त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. यापूर्वी त्यांचा ‘आराधना’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून, आता ‘सर्वसाक्षी’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाने साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.

रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी के. एस. आय. प्रकाशन संस्थेतर्फे आयोजित २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर “करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर” येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. मान्यवर साहित्यिकांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
या प्रसंगी संमेलनाध्यक्ष मातृभक्त आचार्य शंकर घनश्यामदास अंदानी (पुणे), उद्घाटक डॉ. मधुकर बाबुराव हुजरे (धाराशिव), प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील (घुणकी), स्वागताध्यक्ष कवी सरकार श्री. विलास पाटील (इंगळी), दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक डॉ. सुरेश राठोड (कोल्हापूर), काव्यसंमेलनाध्यक्ष सुधाकर बाबूराव शिंदे (इचलकरंजी) यांच्यासह अनेक नामवंत साहित्यिक, कवी, पत्रकार आणि रसिक उपस्थित होते.

सभामंडपात राज्यभरातील कवी, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार आणि साहित्यप्रेमींची मोठी उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल शिंदे (जयसिंगपूर), पूजा रणदिवे (कोल्हापूर) आणि तेजस्विनी रजपूत (कोल्हापूर) यांनी प्रभावी शैलीत केले.
‘सर्वसाक्षी’ या काव्यसंग्रहात प्रा. यादव यांनी मानवी जीवनातील विविध भावविश्वाला शब्दबद्ध केले आहे. कौटुंबिक नातेसंबंध, स्त्री-पुरुषांतील प्रेमाच्या विविध छटा, निसर्ग, सामाजिक वास्तव, देशप्रेम, भक्तीभाव आणि ग्रामीण जीवनातील व्यक्तिरेखा यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण या कवितांमधून अनुभवायला मिळते. काही कवितांना भावगीतांचे स्वरूप लाभले असून, काही लावण्यांमधून शृंगारिकतेचाही सुरेख आविष्कार दिसून येतो.
ग्रामीण संस्कृती, सामाजिक जाण आणि अंतर्मनातील भावविश्व यांचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या या कवितासंग्रहाचे साहित्यिक, रसिक वाचक आणि संशोधकांकडून मनापासून स्वागत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याच संमेलनात प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांना ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, साहित्यिक, पत्रकार आणि रसिकांचे आभार मानण्यात आले.



