सामाजिक

जागतिक चिमणी दिवस विशेष; चला चिऊताईला वाचवूया

या चिमण्यांनो परत फिरा रे..., चिमणी संवर्धनासाठी ५० हून अधिक देशांत उपक्रम

जागतिक चिमणी दिवस विशेष; चला चिऊताईला वाचवूया

या चिमण्यांनो परत फिरा रे…, चिमणी संवर्धनासाठी ५० हून अधिक देशांत उपक्रम

सांगोला (प्रतिनिधी): आज २० मार्च… ‘जागतिक चिमणी दिवस’… जगभरात चिमणी संवर्धनासाठी जागर करणारा दिवस. जागतिक चिमणी दिनाची सुरुवात २०१० मध्ये ‘नेचर फॉरएव्हर’ या पक्षी संवर्धन संस्थेने केली. चिमण्यांची घटती संख्या आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागील उद्देश होता. हा कार्यक्रम ५० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. चिमण्यांचे संरक्षण करणे आणि त्यांची घटती संख्या थांबवणे हे याचे ध्येय आहे. २०१२ मध्ये, घरगुती चिमणी दिल्लीचा राज्य पक्षी बनली. तेव्हापासून या कार्यक्रमाला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली आहे. सर्वत्र लोक चिमण्यांचा उत्सव साजरा करतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी काम करतात.

कधीकाळी आपल्या चिवचिवाटानं माणसाचं भावविश्व समृद्ध करणारी चिऊताई आज कुठे जास्त दिसत नाहीये… त्यामुळे गेल्या दशकभरात चिमणी संवर्धनासाठी जगभरात जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. अलिकडे या प्रयत्नांच्या यशातून परत चिऊताईंचा किलबिलाट शहरांतून ऐकायला येऊ लागला आहे. कधीकाळी पक्षांच्या चिवचिवाटाणे उगवलेली प्रसन्न सकाळ तुम्हाला आठवत असेल. तो पाखरांचा किलबिलाट आणि पक्षांचा चिवचिवाट मनाला एक नवी शक्ती आणि प्रेरणा देणारा. पण काळ बदलला तसा सकाळचा किलबिलाट आणि चिवचिवाट बऱ्याच अंशी कमी झालाय. कवितेतील, बालगीतातील लहान मुलांची चिऊताई आपल्या घराच्या अंगणातून कधी हद्दपार झालीय. नामशेष व्हायला लागलीय, याचा आपल्याला थांगपत्ताही लागला नाहीय.

काही वर्षापूर्वी शाळेत असताना भिंतींना टांगलेला खोपा, त्यात बागडणारी चिऊताई आज कुठेतरी हरवलीय. अंगणात दाणे टिपणाऱ्या चिऊताईचे आज दिवसेंदिवस दर्शन दुर्मीळ होत चालले आहे. आपल्या शाळेच्या पुस्तकातील चिऊताई कुठे हरवली, याचा विचार आज प्रत्येकाने करण्याची गरज आहे. वाढते शहरीकरण, वाढते प्रदूषण, रासायनिक खतांचा अतिवापर, शिकार, नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, अशा एक ना अनेक कारणांनी आज पक्षी नामशेष होताना दिसत आहेत. अंगणात सतत बागडणारी, जिचं नाव घेऊन बाळाला आई बालपणी घास भरवायची ती चिऊताई अर्थात चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली आहे. पर्यावरणामध्ये या प्राणी पक्षांसह चिमण्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामशेष होणारी चिमणी आधुनिक युगात टिकावी तिचे संरक्षण व जागृती व्हावी, या उद्देशाने २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो.

आजच्या आधुनिकतेच्या जमान्यात मानवाने आपल्या स्वार्थापोटी झाडे तोडून सिमेंटची जंगले उभारली आणि चिमणीच्या हक्काचे घरच हिरावले. झाडाला टांगलेला खोपा आता दुर्मीळ होत चालला आहे. शेतीमध्ये ही जैवविविधता राखण्यासाठी चिमणी महत्वाची भूमिका बजावते. शेतीमध्ये चिमणी हा पक्षी पिकाचे किडींपासून होणारे नुकसान यात किडींच्या आळ्या खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवतो. तसेच पिक काढणीला आल्यावर चिमण्या दाणे खातात यात शेतकरी स्वखुशीने तेवढे धान्य त्यांना सोडून देतो. चिमणी जगेल तरच आम्ही जगू असे त्याची भूमिका असते.
वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. आधुनिक प्रकारच्या घरबांधणीमुळे घरट्यांची तसेच अन्नाची अनुपलब्धता, शहरातील वाढते प्रदूषण, यासारख्या अनेक कारणांमुळेही चिमण्यांची संख्या घटत आहे.

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ या ग. दि. माडगूळकरां च्या गीताची आज आठवण झाल्यावाचून राहत नाही. आज प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. मात्र, अलीकडे काळाच्या ओघात ती दिसेनाशी झाली आहे. बालपणी जिच्या चिवचिवाटाने सकाळ व्हायची, त्या चिमण्या आज दृष्टीस पडणेच दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे आता केवळ कविता, बडबडगीते यातच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात चिमण्या मोठ्या प्रमाणात आढळून येत होत्या. अन्न बिया, भात, गहू, बाजरी हे चिमण्यांचं प्रमुख खाद्य शहरात अल्पप्रमाणात चिमण्यांना उपलब्ध होते. तर ग्रामीण भागातील महिला धान्य निवडताना चिमण्यांना ते खायला टाकायच्या, त्यामुळे प्रत्येकाच्या अंगणात या चिमण्या हजेरी लावायच्या अलीकडे अंगणात धान्य निवडणाऱ्या महिला दिसत नाही. परिणामी अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी चिमणी गायब झाली आहे.
आधुनिक युगात मातीच्या भिंती कौलारू घरे यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जंगल तोड होऊ लागली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरत आहे. निसर्ग साखळीत पर्यावरणाच्या समतोलासाठी चिमण्यांचं संवर्धन करणे काळाची गरज आहे. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आज बरेच पक्षी मित्र व संस्था काम करत आहेत. पक्षांविषयी असणारी अंधश्रद्धा गैरसमज या संस्था व पक्षीमित्र दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मानवाप्रमाणे पशुपक्ष्यांना ही निसर्गाने जगण्याचा अधिकार दिला आहे. वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार या पक्षांना संरक्षण देण्यात आले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, पर्यावरण वाचले तर पक्षी वाचतील. त्यामुळे आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या बागेत, परिसरात, घराजवळ जर पाणी व त्यांच्या धान्याची सोय केली. तर खऱ्या अर्थाने हा जागतिक चिमणी दिन साजरा झाला, असे म्हणता येईल. शिवाय नामशेष होऊ लागलेल्या या चिमण्या आपल्याला पुन्हा दिसू लागतील.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!