गुन्हेगारी

मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

१२ तास कारवाई; १५ वर्षांतील सर्वात मोठी कारवाई; १४ हजार लिटर स्पिरीट, ४७० बॉक्स दारू, सात वाहने जप्त; सात जणांवर गुन्हे

मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

१२ तास कारवाई; १५ वर्षांतील सर्वात मोठी कारवाई; १४ हजार लिटर स्पिरीट, ४७० बॉक्स दारू, सात वाहने जप्त; सात जणांवर गुन्हे

 

सांगोला (प्रतिनिधी): मोहोळ तालुक्यातील चिंचोळी एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये बनावट टॅंगो पंच व भिंगरी दारू बनविणारी फॅक्टरीच आढळली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्या गोडावूनवर बुधवार २९ जुलै रोजी छापा टाकला. त्यावेळी गोडावूनमध्ये बनावट दारूसाठी आणलेले स्पिरीट, बॅरेल, बॉक्स, रिकाम्या बाटल्यांचे ढिग, मशिन आढळली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल अडीच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई तब्बल १२ तास सुरू होती. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावरील चिंचोळी येथे जिल्ह्यातील सर्वांत मोठी एमआयडीसी आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी याच एमआयडीसीतून एमडी ड्रग्ज पावडर जप्त केली होती. त्यानंतर आता या एमआयडीसीतील गोडावूनमध्ये चक्क अवैध दारूनिर्मितीचा कारखानाच सापडला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ अदाटे, पोलिस निरीक्षक श्री. पाटील आणि त्यांच्या पथकाने सकाळी सुमारे १० वाजता चिंचोळी एमआयडीसीतील एका मोठ्या गोडावूनवर छापा टाकला. बाहेरून साधे सिमेंट कंपाउंड असलेल्या या गोडावूनमध्ये बनावट दारू निर्मितीचा पूर्ण कारखानाच सुरू असल्याचे आढळून आले. त्यावेळी बाहेरून सिमेंट कंपाउंड असलेल्या मोठ्या गोडावूनमध्ये हा सगळा प्रकार आढळला. त्या गोडावूनबाहेर दारू वाहतुकीसाठीची वाहनेदेखील होती.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सौरभ अदाटे, पोलिस निरीक्षक श्री. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, माझ्या १५ वर्षांच्या पाच जिल्ह्यांतील सेवेत ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.

चिंचोळी एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये अवैध दारूनिर्मिती आणि दुसऱ्या दोन गोडावूनमध्ये तेथे बनविलेली दारू ठेवली होती. या गोडावूनमध्ये १४ हजार लिटर स्पिरीट (७० बॅरेल), ४७० बॉक्स दारू, सात वाहने, बॉटलिंगच्या दोन मशिन होत्या. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्याच ठिकाणी होते. गोडावून कोणाचे आहे, अवैध फॅक्टरीचा सूत्रधार कोण, याची माहिती अधिकारी घेत होते. या कारवाईत सातजण निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गोडावूनमध्ये काम करणारे कामगार परराज्यातील आहेत. यापूर्वीही एमडी ड्रग्ज याच एमआयडीसीतील एका गोडावूनमध्ये सापडले होते.

अवैध दारूनिर्मितीचे मोठे रॅकेट

राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यात एक ट्रक जप्त केला होता. त्यात सव्वाकोटी रुपयांचा गोवा बनावटीचा विदेशी दारूसाठा सापडला होता. या गुन्ह्यातील सूत्रधाराचा चिंचोळी एमआयडीसीतील बनावट दारूनिर्मितीशी संबंध असल्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाला संशय आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!