सामाजिक

माण-कोरडा नदीवरील बंधारे ठणठणीत कोरडे; टेंभूच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा

उन्हाळ्यात १८ बंधाऱ्यांतील पाणी संपले; पिके, फळबागा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

माण-कोरडा नदीवरील बंधारे ठणठणीत कोरडे; टेंभूच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा

उन्हाळ्यात १८ बंधाऱ्यांतील पाणी संपले; पिके, फळबागा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न

सांगोला (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या तीव्र झळांनी सांगोला तालुक्यातील जलस्रोत अक्षरशः कोरडे पडले असून माण व कोरडा नदीवरील एकूण १८ बंधाऱ्यांतील पाणी पूर्णतः संपुष्टात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पाणी टंचाई लचे संकट कोसळले असून टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. मात्र प्रशासनाकडून अद्याप ठोस नियोजन नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके व फळबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

माण नदीवरील खवासपूर, लोटेवाडी, बलवडी, नाझरे, अनकढाळ, चिणके, वाटंबरे, वासूद, कडलास, सांगोला, वाढेगाव, मांजरी, बामणी, सावे, मेथवडे आणि पंढरपूर तालुक्यातील शेटफळ या १७ बंधाऱ्यांसह कोरडा नदीवरील आलेगाव व मेडशिंगी असे एकूण १८ बंधारे कोरडे पडले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात साठवले जाणारे पाणी १५ ऑक्टोबरपर्यंत बंधाऱ्यांमध्ये अडवले जाते, तर ३१ मेनंतर दारे काढली जातात. या पाण्यावर माण नदीकाठावरील सुमारे १२ हजार ८९२ हेक्टर आणि कोरडा नदीवरील ६४० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र यंदा उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणी आटल्याने हजारो हेक्टर शेती धोक्यात आली आहे.

दरवर्षी टेंभू व म्हैसाळ योजनांमधून उन्हाळ्यात पाणी सोडून हे बंधारे भरले जातात. मात्र यंदा पाणीपट्टीच्या थकबाकीचा मुद्दा आड येत असल्याने पाणीपुरवठा रखडल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी विहिरी, बोअरवेल आणि टँकरच्या भरवशावर जगण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत जवळा, चिंचोली व घेरडी तलावात काही प्रमाणात पाणी असले तरी अचकदानी व हंगिरंगे तलाव पूर्णतः कोरडे पडले आहेत. त्यामुळे केवळ शेतीच नव्हे, तर नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.
शेतकरी वर्गाकडून तातडीने टेंभू योजनेचे पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.

सांगोला माण नदीवरील १७ बंधारे व कोरडा नदीवरील २ बंधारे तसेच अचकदानी, हंगिरगे, जवळा, घेरडी व चिंचोली तलावाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांकडील सुमारे २८ लाख रुपये थकबाकीपैकी १२ लाख रुपये वसूली झाली आहे तर उर्वरित थकबाकीची वसुली सुरू असल्याचे शाखा अभियंता व्यंकटेश संगणवर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!