शैक्षणिक

सांगोल्याला शिक्षणाची नवी ओळख! कमलापूर-महिम शाळांची ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

राज्यातील ४०५ शाळांच्या यादीत सांगोल्याचा मान; ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक, सर्वसमावेशक शिक्षणाचा नवा मार्ग

सांगोल्याला शिक्षणाची नवी ओळख! कमलापूर-महिम शाळांची ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड

राज्यातील ४०५ शाळांच्या यादीत सांगोल्याचा मान; ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार आधुनिक, सर्वसमावेशक शिक्षणाचा नवा मार्ग

सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण शिक्षणाला नवी उंची देणाऱ्या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे सांगोला तालुक्याच्या शैक्षणिक नकाशावर अभिमानाची नोंद झाली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कमलापूर आणि जिल्हा परिषद शाळा महिम या दोन शाळांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे सांगोल्याच्या शिक्षण क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  शालेय शिक्षण विभागाने राज्यातील ४०५ शासकीय शाळांना आता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यास मान्यता दिली आहे. सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कमलापूर आणि जिल्हा परिषद शाळा महिम या दोन शाळांची निवड करण्यात आली आहे.

राज्यातील शालेय शिक्षण अधिक दर्जेदार, सक्षम आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ४०५ शासकीय शाळांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये सांगोल्याचा समावेश झाल्याने सांगोला तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शाळांमध्ये समूह साधन केंद्र, पीएम श्री आणि विद्यानिकेतन शाळांचा समावेश करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांनी आतापर्यंत सर्वसामान्य व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. आता ‘डॉ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ उपक्रमामुळे या शाळांचा दर्जा उंचावून त्यांना खाजगी शाळांशी स्पर्धात्मक बनवण्याचा सरकारचा मानस आहे.

या योजनेअंतर्गत आधुनिक आणि सुसज्ज वर्गखोल्या अखंड, गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहे, आरओद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ची विशेष व्यवस्था, क्रीडा प्रबोधिनीच्या सुविधा, गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर भर देण्यात येणार आहे.

 

“स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम पायाभरणी”

 

कमलापूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बशीर मुलाणी आणि शिक्षक सुनील आदलिंगे यांनी सांगितले, “आमचा उद्देश विद्यार्थ्यांना भविष्याभिमुख शिक्षण देण्याचा आहे. रात्र अभ्यासिका, जादा तास आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम पायाभरणी केली जात आहे. गोरगरिबांच्या मुलांनाही उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

 

 

सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कमलापूर आणि जिल्हा परिषद शाळा महिम, माढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कव्हे, जिल्हा परिषद शाळा मोडनिंब नंबर एक, सहकार महर्षी गणपतराव साठे जिल्हा परिषद हायस्कूल माढा, पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा फुलचिंचोली, दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उळे, जिल्हा परिषद शाळा वळसंग (मराठी), जिल्हा परिषद शाळा भंडारकवठे, जिल्हा परिषद शाळा कुसुर, मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आंधळगाव आणि जिल्हा परिषद शाळा भोसे, मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोन्हेरी या १२ शाळांची ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!