सामाजिक

सांगोल्यात १३ गावांची पाण्याची मागणी, शिरभावी योजनेची कामे रखडली

प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका, दोन गावांना पाणी, उर्वरित गावे तहानलेली!

सांगोल्यात १३ गावांची पाण्याची मागणी, शिरभावी योजनेची कामे रखडली

प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका, दोन गावांना पाणी, उर्वरित गावे तहानलेली!

सांगोला (प्रतिनिधी): उन्हाची तीव्रता वाढत असताना सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने तब्बल ११ ते १२ गावे टंचाईच्या भीषण संकटात सापडली आहेत. आलेगाव, राजापूर, सोनलवाडी, गोडसेवाडी (कमलापूर) आणि यलमर मंगेवाडी या गावांमध्ये पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. सांगोला तालुक्यातील जवळपास १३ ग्रामपंचायतींनी शिरभावी योजनेकडून पाणीपुरवठ्याची मागणी केली असली तरी प्रत्यक्षात गायगव्हाण व देवळे या दोनच गावांना पाणीपुरवठा सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उर्वरित ११ गावे अजूनही पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ८२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाइपलाइन, वॉल दुरुस्ती आणि मुख्य टाकीला जोडणाऱ्या जलवाहिन्यांच्या चाचण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. परिणामी, पाणी उपलब्ध असूनही नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचे जाणवत आहे. वास्तविक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उन्हाळ्यापूर्वीच सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करणे अपेक्षित होते. मात्र अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ही कामे रखडली आणि त्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यलमर मंगेवाडी येथील पिण्याचे पाणी पिण्यास योग्य नाही तर राजापूर येथे पाणीपुरवठ्याचा कोणताच पर्याय उपलब्ध नाही, गोडसेवाडी येथे पाणीटंचाईमुळे हातपंप अधिग्रहण करण्याची प्रक्रिया चालू आहे. सोनलवाडी येथे शिरभावी योजनेतून पंपिंग करून पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन सुरू असून आलेगाव येथेही तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्याचे गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीलाच निर्माण झालेली ही भीषण टंचाई पाहता, पुढील काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

तहसीलदार श्रीमती बाळूताई भागवत यांनी सांगितले की, “महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून १५ एप्रिलपर्यंत शिरभावी योजना सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अद्याप कोणत्याही गावाकडून टँकर मागणीचे प्रस्ताव आलेले नसले तरी ग्रामपंचायतींची पाणी मागणी वाढत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!