सांगोल्यात करवसुलीचा धडाका; ७६ ग्रामपंचायतींकडून ८ कोटी २३ लाखांची वसुली
घरपट्टी ३.६८ कोटी, पाणीपट्टी ४.५५ कोटी; शंभर टक्के वसुलीसाठी प्रशासन आक्रमक

सांगोल्यात करवसुलीचा धडाका; ७६ ग्रामपंचायतींकडून ८ कोटी २३ लाखांची वसुली
घरपट्टी ३.६८ कोटी, पाणीपट्टी ४.५५ कोटी; शंभर टक्के वसुलीसाठी प्रशासन आक्रमक
सांगोला (प्रतिनिधी) : मार्चअखेर आर्थिक वर्षाची सांगता होत असताना सांगोला तालुक्यात करवसुली मोहिमेला मोठा वेग आला असून तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींकडून तब्बल ८ कोटी २३ लाख ४४ हजार ०७६ रुपये घरपट्टी व पाणीपट्टी कर वसूल करण्यात आले आहेत. यामध्ये ३ कोटी ६८ लाख २७ हजार ०५५ रुपये घरपट्टी तर ४ कोटी ५५ लाख १७ हजार ०२१ रुपये पाणीपट्टी अशी वसुली झाली असून तालुक्याची कामगिरी समाधानकारक असल्याची माहिती गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
मार्च अखेर शंभर टक्के वसुली करण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने मोहीम आक्रमक केली आहे. मार्च महिना जवळ येताच घरपट्टी व पाणीपट्टी थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून जवळपास सव्वा दोन लाख मालमत्ताधारकांकडून कर वसुली करण्यात आली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत थकीत करांवर विशेष सवलत देण्यात आल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून अनेक ग्रामपंचायतींनी अपेक्षेपेक्षा जास्त वसुली केली आहे.
उद्दिष्टापैकी ८७ टक्के वसुली
सांगोला तालुक्यात घरपट्टी वसुलीचे एकूण उद्दिष्ट ४ कोटी ४१ लाख ४९ हजार ३८७ रुपये होते. त्यापैकी ३ कोटी ६८ लाख २७ हजार ०५५ रुपये वसूल झाले आहेत. तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ५ कोटी ५९ लाख ८६ हजार ७२३ रुपये असून त्यापैकी ४ कोटी ५५ लाख १७ हजार ०२१ रुपये वसुली झाली आहे. एकूण मिळून सुमारे ८७ टक्के करवसुली पूर्ण झाली असून उर्वरित थकबाकीसाठी प्रशासनाने विशेष पथके नेमली आहेत.
कमी वसुली असलेल्या गावांवर प्रशासनाचा दबाव
जिल्हा प्रशासनाने कमी वसुली असलेल्या ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. थकबाकीदारांशी थेट संपर्क, जनजागृती मोहीम, सवलत योजना आणि नोटिसा देण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावर बैठका घेऊन नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
४५ ग्रामपंचायतींमध्ये फेरआकारणी सुरू
तालुक्यातील ७६ पैकी ४५ ग्रामपंचायतींमध्ये फेरआकारणी प्रक्रिया सुरू असून त्यामध्ये मालमत्ताधारकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षात घरपट्टी व पाणीपट्टी महसूल वाढणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ग्रामनिधी वाढल्यासच गावांचा विकास ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात घरपट्टी, पाणीपट्टी, गाळेभाडे यांचा मोठा वाटा असतो. या निधीतून पाणीपुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती व प्रकाशयोजना, अंगणवाडी व शाळा दुरुस्ती, कर्मचारी वेतन, आरोग्य व आपत्कालीन सेवा यांसारख्या मूलभूत सुविधा दिल्या जातात. पंधराव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीसोबत ग्रामनिधी मजबूत असणे आवश्यक असल्याने करवसुलीला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
मार्च अखेर शंभर टक्के वसुलीचे लक्ष्य
मार्चअखेरपर्यंत उर्वरित थकबाकी वसूल करून शंभर टक्के लक्ष्य पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे प्रशासनाने सांगितले.



