सांगोल्यात हमीभावाची प्रतिक्षा लांबली : २१ हजार क्विंटल मका खरेदीविना; शेतकऱ्यांत संतापाचा उद्रेक

सांगोल्यात हमीभावाची प्रतिक्षा लांबली : २१ हजार क्विंटल मका खरेदीविना; शेतकऱ्यांत संतापाचा उद्रेक
सांगोला (प्रतिनिधी ): काबाडकष्टाने पिकवलेला मका हमीभावाने विक्रीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरात निराशाच पडल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. यंदा मका पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही शासनाकडून केवळ १४ दिवस खरेदी करून प्रक्रिया बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. नोंदणी करूनही तब्बल ७४१ शेतकऱ्यांचा सुमारे २१ हजार १९८ क्विंटल मका अजूनही खरेदीविना पडून आहे.
राज्य शासनामार्फत किमान आधारभूत किंमत (एमएसपी) २४०० रुपये प्रति क्विंटल दराने भरडधान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला होता. तालुक्यातील ९१३ शेतकऱ्यांनी ११२५ हेक्टर क्षेत्रावरील २६ हजार ४६५ क्विंटल मक्याची नोंदणी तालुका खरेदी विक्री संघाकडे केली. मात्र, फेडरेशनकडून केवळ ५ हजार क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्या मर्यादित उद्दिष्टानुसार १७२ शेतकऱ्यांचा ५ हजार २६७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आणि उद्दिष्ट पूर्ण होताच २१ जानेवारीपासून खरेदी प्रक्रिया बंद करण्यात आली. उर्वरित शेकडो शेतकरी हमीभावाच्या आशेवर आजही खरेदीच्या प्रतिक्षेत आहेत.
दरम्यान, खुल्या बाजारात भुसार व्यापाऱ्यांकडून सध्या १८०० रुपये प्रति क्विंटल दराने मका खरेदी होत आहे. शासन दर आणि बाजारभाव यामधील तब्बल ६०० रुपयांचा फरक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत आहे. उत्पादन खर्च, मजुरी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना हा फरक परवडणारा नसल्याने आर्थिक ताण अधिकच वाढला आहे.
‘निवडणुका संपल्या; आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या’
तालुक्यात डाळिंब पिकावर मर व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने डाळिंब क्षेत्रात मोठी घट झाली. परिणामी अनेक शेतकरी पर्याय म्हणून मका पिकाकडे वळले. कृषी विभागाकडे यंदा सर्वाधिक मका क्षेत्राची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत २६ हजार क्विंटलपेक्षा अधिक मक्याची नोंदणी झालेली असताना केवळ ५ हजार क्विंटल खरेदी करून केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना तीव्र झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. “काबाडकष्टाने पिकवलेल्या मक्याला योग्य दर मिळाला नाही तर शेती करायची कशी?” असा हताश सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने तातडीने मका खरेदी केंद्र सुरू करून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हमीभावाच्या या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्णयाकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.
“सोलापूर जिल्ह्यासाठी २५ हजार क्विंटल हमीभावाने मका खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. उद्दिष्ट वाढीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असून वाढीव उद्दिष्ट मिळाल्यास तत्काळ खरेदी केली जाईल,” असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांनी सांगितले.
खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव म्हणाले, “तालुक्याला मिळालेले ५ हजार क्विंटल उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबवण्यात आली. वाढीव उद्दिष्ट मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा मका खरेदी केला जाईल. मोठ्या प्रमाणावर मका खरेदीविना पडून असल्याने शेतकरी नियमित चौकशी करीत आहेत. शासनाने लवकर निर्णय घ्यावा.”



