वारी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी विशेष वारी सुविधा निधी उपलब्ध करावा – जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे
आचकदाणी रिंगण सोहळ्यासह महूद, खवासपूर, लोटेवाडी येथे पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधांची गरज

वारी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी विशेष वारी सुविधा निधी उपलब्ध करावा – जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे
आचकदाणी रिंगण सोहळ्यासह महूद, खवासपूर, लोटेवाडी येथे पाणी, स्वच्छता व आरोग्य सुविधांची गरज
सांगोला (प्रतिनिधी): आषाढी व कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी सांगोला तालुक्यातील वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. वारी काळात पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा व कचरा व्यवस्थापनाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतींवर पडत असल्याने स्वतंत्र “वारी सुविधा निधी” मंजूर करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी केली आहे.

सांगोला तालुका हा आषाढी व कार्तिकी वारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभाग तसेच गोवा राज्यातून येणाऱ्या हजारो दिंड्या महूद, आचकदाणी, लोटेवाडी, खवासपूर आणि इतर गावांमधून पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या भाविकांच्या भोजन, निवास व इतर सेवांसाठी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने सहकार्य करीत असले तरी वाढत्या गर्दीमुळे मूलभूत सुविधांवर ताण निर्माण होत आहे. वारी कालावधीत शौचालये, स्नानगृहे, सुरक्षित पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग वारकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी प्रसाधनगृहांची कमतरता असल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनत असून ग्रामपंचायतींची आर्थिक मर्यादा लक्षात घेता आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विशेषतः मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळ्यादरम्यान आचकदाणी येथे पारंपरिक रिंगण सोहळ्यासाठी सुमारे १० ते १५ हजार वारकरी व नागरिक उपस्थित राहतात. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्र येत असल्याने सुरक्षित पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, स्नान सुविधा, आरोग्य तपासणी केंद्र, रुग्णवाहिका, स्वच्छता कर्मचारी व कचरा व्यवस्थापनाची तातडीची गरज निर्माण होते. मात्र सद्यस्थितीत या सुविधा अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे. निवेदनाद्वारे वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी संख्येनुसार विशेष निधी मंजूर करणे, स्वतंत्र वारी सुविधा निधी उपलब्ध करणे, पाणी टँकर व जलसाठा व्यवस्था उभारणे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र फिरती शौचालये व स्नानगृहे उपलब्ध करणे, प्राथमिक आरोग्य पथके व रुग्णवाहिका तैनात करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष अनुदान देणे तसेच आचकदाणी, महूद, खवासपूर, लोटेवाडीसह प्रमुख मुक्कामस्थळी कायमस्वरूपी पाणी व स्वच्छता सुविधा विकसित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग आणि स्वच्छ भारत मिशन यांच्या संयुक्त समन्वयातून विशेष कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. वारकरी भाविक, स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतींची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशीअशी मागणी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब लवटे यांनी केली आहे.



