सांगोल्यात खळबळ..! कारमधून तीन तलवारी, बेसबॉल स्टिक अन् चाकू जप्त!
तीन विद्यार्थ्यांसह पाच तरुण पोलिसांच्या ताब्यात; सोशल मीडियावरील वादातून दंगा करण्यासाठी आल्याचा पोलिसांचा संशय

सांगोल्यात खळबळ..! कारमधून तीन तलवारी, बेसबॉल स्टिक अन् चाकू जप्त!
तीन विद्यार्थ्यांसह पाच तरुण पोलिसांच्या ताब्यात; सोशल मीडियावरील वादातून दंगा करण्यासाठी आल्याचा पोलिसांचा संशय
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील कडलास रोडवरील महाविद्यालयाच्या परिसरात भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच सांगोला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तीन विद्यार्थ्यांसह पाच तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील विना नंबरप्लेटच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा टिगोर कारची झडती घेतली असता त्यामध्ये तीन तलवारी, एक बेसबॉल हॉकी स्टिक आणि एक चाकू अशी घातक हत्यारे आढळून आली. पोलिसांनी कारसह ही हत्यारे जप्त केली असून या घटनेने सांगोला शहरात खळबळ उडाली आहे.
ही कारवाई शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१० वाजता सांगोला महाविद्यालयाजवळ, कडलास रोड परिसरात करण्यात आली. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अविनाश विठठल रणखांबे रा. गणेशगाव, ता. माळशिरस, शिवराज संजय काळे रा. गणेशगाव, ता. माळशिरस, अभिषेक सुभाष जाधव रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे, प्रेम महेंद्र चव्हाण रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, संकेत महादेव बोरावके रा.वडापुरी, ता. इंदापुर, जि. पुणे यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोहेकॉ सचिन कुबेर भोसले हे १२ सप्टेंबर रोजी कर्तव्यावर असताना दुपारी सुमारे २.१० वाजता त्यांच्या मोबाईलवर गुंडा खटकाळे यांनी फोन करून सांगोला महाविद्यालय, कडलास रोड येथे भांडण सुरू असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोहेकॉ भोसले यांनी पोलीस नाईक शेख व पोलीस कॉन्स्टेबल शेख यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी महाविद्यालयाजवळ पाच जण मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरड करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ या पाचही जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी सुरू केली.
पोलिसांनी या पाचही जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. पोलिसांच्या चौकशीत अविनाश रणखांबे याचा कट्टे नावाच्या व्यक्तीसोबत सोशल मीडिया तसेच फोनवरून वाद झाल्याचे आणि त्या व्यक्तीकडे सांगोल्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील विना नंबरप्लेटच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा टिगोर कारची वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये बेसबॉल हॉकी स्टिक, तीन तलवारी, एक चाकू आढळून आला. पोलिसांनी हत्यारासह वाहन ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अविनाश विठठल रणखांबे रा. गणेशगाव, ता. माळशिरस, शिवराज संजय काळे रा. गणेशगाव, ता. माळशिरस, अभिषेक सुभाष जाधव रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे, प्रेम महेंद्र चव्हाण रा. खेड, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, संकेत महादेव बोरावके रा.वडापुरी, ता. इंदापुर, जि. पुणे यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, संबंधित पाच जण दंगा करण्याच्या उद्देशाने एकत्र आले होते आणि घातक हत्यारे जवळ बाळगून आढळून आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील आदेशाचे उल्लंघन करून घातक हत्यारांसह आढळून आले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९(४), भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये कायदेशीर तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.



