महाराष्ट्र

डीसीसी बँक सोलापूर….. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा शतकभराचा आधारवड!

डीसीसी बँक सोलापूर….. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा शतकभराचा आधारवड!

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची १९१८ पासूनची दमदार वाटचाल; शेती, सिंचन, फळबागांपासून विमा योजनांपर्यंत ठसा

पंढरपूरच्या बैठकीत रुजले सहकाराचे बीज; ८ मार्च १९१८ रोजी बँकेची स्थापना

 

 

 

 

 

 

 

 

१९०४ मध्ये सहकारी कायदा अस्तित्वात आल्यानंतर ग्रामीण आणि शहरी पतसंस्था स्थापन होऊ लागल्या. मात्र ग्रामीण भागातील पतव्यवस्था मजबूत करण्यासाठी मध्यवर्ती वित्तीय संस्थेची गरज प्रकर्षाने जाणवू लागली. मॅकलागन समितीच्या शिफारशींनंतर मध्यवर्ती सहकारी बँकांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

पंढरपूरच्या बैठकीत झाली निर्णायक चर्चा

मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्याच्या मुद्द्यावर ११ सप्टेंबर १९१७ रोजी पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार, मार्च १९१८ मध्ये १२ सभासदांनी आणि ५ संस्थांच्या प्रतिनिधींनी नोंदणीसाठी अर्ज केला आणि मार्च १९१८ मध्ये सहकारी संस्थांचे निबंधक श्री. यू. बॅक यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संस्थेची नोंदणी केली. पहिली सर्वसाधारण सभा माननीय जिल्हाधिकारी श्री. एम. सिमकॉक्स यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बँकेची सुरुवात ८ मार्च १९१८ रोजी झाली.

व्यवस्थापकीय मंडळाची निवड झाली आणि सभेनंतर २७ मार्च १९१८ रोजी प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले. बँकेचे पहिले अध्यक्ष कै. श्री. आर.बी.के. साठे होते. अवघ्या एक लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण सोलापूर जिल्हा होते.
Oplus_16908288

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनली डीसीसी बँक

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकारी पतसंरचनेतील महत्त्वाचा दुवा ठरली. शिखर सहकारी बँक आणि प्राथमिक कृषी पतसंस्था यांच्यामधील दुवा म्हणून काम करताना बँकेने ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना दिशा दिली.

जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांच्या राखीव निधीच्या ठेवी तसेच अन्य ठेवी बँकेत जमा होऊ लागल्या. विविध सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्याबरोबरच नागरी सहकारी बँकांसाठी क्लिअरिंग उप-सदस्य सुविधा देण्याचे कामही बँकेने केले.

राष्ट्रीयीकृत बँका आणि नागरी सहकारी बँकांच्या वाढत्या स्पर्धेच्या काळातही जिल्ह्यातील ग्रामीण जनतेशी असलेले नाते बँकेने कायम ठेवले. त्यामुळे शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्यातील विश्वासाचा दुवा म्हणून बँकेची ओळख निर्माण झाली.

सिंचनाला चालना; शेती विकासाला नवी दिशा

१९८५ पासून भुविकास बँकांना आलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या धोरणानुसार शेती विकास कर्जासाठी बँकेने मोठ्या प्रमाणावर कर्जपुरवठा केला. या कर्जपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले.

परिणामी शेतीची उत्पादकता वाढली आणि शेतकऱ्यांसोबतच बँकेच्या आर्थिक प्रगतीलाही हातभार लागला. सोलापूर जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता मर्यादित असलेल्या शेतकऱ्यांसाठी १९८७-८८ मधील फळबाग लागवड योजना महत्त्वाची ठरली. डाळिंब, बोर आणि अन्य फळपिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले.

या काळात या योजनेअंतर्गत जिल्ह्यात तब्बल १ हजार २३४ एकरांवर फळबाग लागवड झाली. पुढील काळात सोलापूर जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेत फळबागांचे वाढलेले महत्त्व पाहता ही योजना दूरदृष्टीची ठरल्याचे दिसून येते.

पुरस्कारांनीही अधोरेखित केले बँकेचे योगदान

बँकेच्या कार्याची दखल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली.

१९९५-९६ मध्ये महाराष्ट्र स्टेट को-ऑप बँक्स असोसिएशनकडून पश्चिम महाराष्ट्र विभागात बँकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्याच आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कार्याबद्दल नाबार्डकडून देशपातळीवरील प्रथम पुरस्कार, स्मृतिचिन्ह आणि ५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक प्राप्त झाले.

त्यानंतर १९९६-९७ मध्ये पश्चिम महाराष्ट्र विभागात प्रथम क्रमांक, तर १९९८-९९ मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभागात द्वितीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. २००१-०२ मध्ये नाबार्डकडून बँकेला उत्कृष्ट कार्यप्रणालीबद्दल देशपातळीवर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थांच्या वार्षिक अहवाल मूल्यांकन स्पर्धेत विभागीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

२००८-०९ आणि २००९-१० या आर्थिक वर्षांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून बँकेला उत्कृष्ट आर्थिक मापदंडाचा पुरस्कार प्राप्त झाला.
१९९८-९९ मध्ये शेती पतसंस्थेच्या कर्जदार सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी जनता अपघात विमा पॉलिसी राबविण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यातून कुटुंबांना एक लाख रुपयांपर्यंत आर्थिक संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच कालावधीत गावागावांत महिला बचत गटांची निर्मिती करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात २५ महिला बचत गटांची निर्मिती करण्यात आली. २०००-०१ मध्ये बँकेने बँक आणि बचत खातेदार या दोघांसाठीही फायदेशीर ठरणारी योजना सुरू केली. १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत किमान वर्षभर खात्यावर ५ हजार रुपये शिल्लक ठेवणाऱ्या खातेदारांसाठी बचत ठेवीशी संलग्न ठेव विमा योजना कार्यान्वित करण्यात आली.

केशरमाती कृषी प्रदर्शनाने शेतकऱ्यांना दिली आधुनिकतेची दिशा

शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन प्रयोग, पीक पद्धती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींची माहिती मिळावी, या उद्देशाने बँकेने ११ ते १५ एप्रिल २००७ दरम्यान श्रीक्षेत्र पंढरपूर येथे राष्ट्रीय पातळीवरील भव्य ‘केशरमाती कृषी प्रदर्शन’ आयोजित केले. राज्यात प्रथमच अशा स्वरूपाचे प्रदर्शन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला असून, त्याचा जिल्ह्यातील सुमारे ५ लाख शेतकरी सभासदांना लाभ झाला.

‘एकात्मिक शेती विकास प्रकल्पा’तून शेतकऱ्यांना आर्थिक बळ

जिल्ह्यातील शेतीची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील एकात्मिक शेती विकास प्रकल्प’ राबविण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीच्या विकासाला चालना देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेतकरी सभासदांच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने बँकेने राबविलेली ‘शरदचंद्रजी पवार आरोग्य विमा योजना’ विशेष उल्लेखनीय ठरली. बँकेशी संलग्न प्राथमिक शेती संस्थांच्या सुमारे २ लाख कर्जदार सभासदांच्या आरोग्यासाठी बँकेच्या उत्पन्नातून ४.२२ कोटी रुपयांचा विमा प्रीमियम भरून सुमारे ४०० कोटी रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेतून शेतकरी सभासदांना ६ कोटी रुपयांची मदत मिळाल्याचा उल्लेख बँकेच्या इतिहासात करण्यात आला आहे.

‘घरकुला’चे स्वप्नही केले साकार

शेतकरी सभासदांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील गृहकर्ज योजना’ सुरू करण्यात आली. तसेच बँकेशी संलग्न पगारदारांसाठी ‘नंदिनी गृहकर्ज योजना’ अंमलात आणण्यात आली.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इतिहासात अनेक सहकार महर्षींनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यामध्ये जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते. १९६६ ते २०१५ या तब्बल ४९ वर्षांच्या कालखंडात त्यांनी बँकेवर संचालक म्हणून काम केले. याशिवाय त्यांनी दोन वेळा बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे धुरीण आणि दिग्गज नेते सहकारमहर्षी स्व. शंकरराव मोहिते-पाटील, स्व. विठ्ठलराव शिंदे, स्व. गणपतराव देशमुख अशा अनेक स्थानिक नेतृत्वांनी वेगवेगळ्या कालखंडात बँकेचे संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले व ग्रामीण पतपुरवठा यंत्रणा मजबूत केली.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आतापर्यंतचे चेअरमन

श्री. आर.बी.के. साठे -१९१८-१९२२
श्री. वि. शि.जोग -१९२२-१९२३
श्री. एम.आर.गोडबोले -१९२३-२५
श्री. जी.डी. पुंडे -१९२५-१९२७
श्री. एम.एम.गव्हाणे -१९२७-१९३०
श्री.जी.डी. पुंडे – १९३०-३३
श्री. एस.एन.जमादार- १९३३-१९३६
श्री.जी.आर.कुंभकोणी – १९३६-१९३९
श्री. एस.ए.मोहोळकर- १९३९-१९४०
श्री. व्ही.एस.देशपांडे – १९४०-१९४२
श्री. जे.ई. कुलकर्णी -१९४२-१९४३
श्री. एस.एन.जमादार- १९४३-१९४४
श्री. एम.व्ही.लेले- १९४४-१९४५
श्री. एच.व्ही.केळकर १९४५-१९५०
श्री. जी.डी.साठे – १९५०-१९५८
श्री. एम.एल.पाटील -१९५८-१९६१
श्री. नामदेवराव जगताप १९६१-१९६५
श्री शंकरराव मोहिते पाटील – १९६५-१९७६
श्री. नामदेवराव जगताप १९७६-१९७८
श्री. सुधाकरपंत परिचारक -१९७८-१९७९
श्री. डी.एम.कादे – १९७९-१९८४
श्री. बी.के.गायकवाड – १९८४-१९८६
श्री. बाबुराव चाकोते – १९८६-१९८८
श्री. राजन पाटील – १९८८-१९९२
श्री. ब्रह्मदेवदादा माने १९९२-१९९४
श्री. राजन पाटील – १९९४-१९९५
श्री. वि.गु.शिवदारे -१९९५-१९९७
श्री.दिलीप सोपल १९९७-१९९८
श्री. सुधाकरपंत परिचारक -१९९८-२००५
श्री. रणजीतसिंह मोहिते पाटील २००५-२०१०
श्री.दिलीप सोपल २०१०-२०११
श्री. संजयमामा शिंदे -२०११-२०१२
श्री. दिलीप माने – २०१२-२०१५
श्री. राजन पाटील – २०१५-२०१८
श्री. अविनाश देशमुख ३० मे २०१८ ते २७ सप्टेंबर २०१८ (प्रशासक)
श्री. शैलेश कोतमिरे २८ सप्टेंबर २०१८ ते ८ नोव्हेंबर २०२२ (प्रशासक)
श्री. कुंदन भोळे ९ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही मोठी परंपरा

बँकेच्या प्रशासकीय वाटचालीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

श्री. एस. ए. जोशी (१९२३-३८), श्री. एस. एम. जिवांगीकर (१९३८-३९), श्री. बी. बी. लक्ष्मेश्वर (१९३९-४०), श्री. एन. आर. काणेगावकर (१९४०-४३), श्री. सी. एस. परांजपे (१९४३-४८), श्री. जे. के. जोशी (१९४८-५२), श्री. के. के. परबत (१९५५-६६), श्री. बी. बी. लिगडे (१९६६-८०), श्री. एस. बी. गोडसे (१९८०-८६), श्री. डी. व्ही. गुरव (१९८६-९०), श्री. ए. जे. भोसले (१९९०-२००६), श्री. पी. बी. चव्हाण (२००६-०८), श्री. आर. एल. उत्पात (२००८-११), श्री. एन. डी. पाटील (२०११-१३), श्री. के. व्ही. मोटे (२०१३-२२), श्री. व्ही. बी. देसाई (२०२२-२४), श्री. आर. डी. गोटे (२०२४) आणि सध्या श्री. आर. आर. शिंदे यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे.

सहकाराच्या शतकपूर्तीच्या दिशेने…

एका लाख रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शतकभराच्या वाटचालीत अनेक चढ-उतार पाहिले. शेती कर्ज, सिंचन, फळबाग, महिला बचत गट, विमा, आरोग्य संरक्षण, गृहकर्ज, कृषी प्रदर्शन आणि आधुनिक शेतीला प्रोत्साहन अशा विविध माध्यमांतून बँकेने ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावला. सहकारी पतसंरचनेतील महत्त्वाचा दुवा म्हणून सुरू झालेली ही बँक आजही सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि सहकारी संस्थांच्या आर्थिक जीवनाशी जोडलेली आहे. शतकभरात बदललेली शेती, बदललेले अर्थकारण, वाढलेली बँकिंग स्पर्धा आणि तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव यांचा सामना करत ‘शेतकरी हित आणि सहकार’ हा केंद्रबिंदू कायम ठेवत पुढील वाटचाल करण्याचे आव्हान बँकेसमोर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!