सामाजिक

गणराया अवार्ड-२०२६ साठी गणेश मंडळांनी सज्ज व्हा! ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला प्राधान्य

डीजे-डॉल्बी, लेझरला फाटा देत पारंपरिक वाद्यांतून गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन; रक्तदान, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

गणराया अवार्ड-२०२६ साठी गणेश मंडळांनी सज्ज व्हा! ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पनेला प्राधान्य

डीजे-डॉल्बी, लेझरला फाटा देत पारंपरिक वाद्यांतून गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन

सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन; रक्तदान, वृक्षारोपण, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याचे आवाहन

सांगोला (प्रतिनिधी): आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गणराया अवार्ड-२०२६’ या तालुकास्तरीय स्पर्धेत सांगोला शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे. तसेच ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवून गणेशोत्सवाला सामाजिक आणि विधायक उपक्रमांची जोड द्यावी, असे आवाहन मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी केले. गणेशोत्सव काळात मंडळांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम आदी उपक्रम राबवावेत. त्याचबरोबर पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सांगोला पंचायत समितीच्या बचत भवन येथे बुधवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शांतता समिती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस तहसीलदार बाळूताई भागवत व पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डीजे, डॉल्बी अन् लेझरला स्पष्ट नकारगणपती प्रतिष्ठापना तसेच विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा डीजे, डॉल्बी अथवा लेझरचा वापर करता येणार नाही, असे डॉ. शिवपुजे यांनी स्पष्ट केले. ध्वनी प्रदूषणासंदर्भातील कायदे व नियमांचे पालन करूनच स्पीकरचा वापर करावा. गणेशोत्सवात ढोल-ताशा, सनई यांसारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने गतवर्षी ‘गणराया अवार्ड-२०२५’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राबविलेले सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, सजीव देखावे, डीजे-डॉल्बी व गुलालमुक्त वातावरण तसेच पारंपरिक वाद्यांच्या साथीने काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुका आदी बाबींचे परीक्षण करण्यात आले होते. परीक्षकांनी गुणांच्या आधारे पात्र गणेश मंडळांची पारदर्शक पद्धतीने निवड केली होती. विजेत्या मंडळांचा पारितोषिक वितरण समारंभ डॉ. बसवराज शिवपुजे, तहसीलदार बाळूताई भागवत व पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या हस्ते झाला. विजेत्या मंडळांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.यावेळी स्पर्धेचे पारदर्शकपणे परीक्षण केल्याबद्दल परीक्षक प्रा. संतोष राजगुरू, आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, पत्रकार मनोज उकळे व डॉ. मानस कमलापूरकर यांचाही सन्मान करण्यात आला.

गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू होण्यापूर्वीच पोलीस ठाण्यासह आवश्यक त्या सर्व परवानग्या घ्याव्यात, असे तहसीलदार बाळूताई भागवत यांनी सांगितले. ‘डीजे-डॉल्बी’चा हट्ट न करता ‘सांगोल्यात भरपूर पाऊस पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे’ अशी प्रार्थना गणरायाकडे करावी. धार्मिक उत्सवाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, याची काळजी घेत उत्साहात व शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी मंडळांना विविध सुरक्षाविषयक सूचना दिल्या. गणेशोत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक मंडळाने गणेशमूर्तीच्या ठिकाणी दोन स्वयंसेवकांची नियुक्ती करावी. विद्युत रोषणाई करताना तसेच वीज वापरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.प्रतिष्ठापनेपासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. डीजे-डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून मिरवणूक काढावी. समाजातील सर्व घटक, महिला तसेच वारकरी बांधवांना गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेत कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान मनसेचे विनोद बाबर, रवी कांबळे, दीपक ऐवळे, बापूसाहेब ठोकळे, मुकुंद भोसेकर तसेच विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनासमोर विविध मागण्या व समस्या मांडल्या. गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते खड्डेमुक्त करावेत, विसर्जन मिरवणुकीसाठी एक टॉप व एक बेस लावण्यास परवानगी द्यावी, तात्पुरत्या वीज जोडणीसाठी आकारण्यात येणाऱ्या वीज आकारणीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा तसेच ‘गणराया अवार्ड’ स्पर्धेचे परीक्षण पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावे, अशा सूचना करण्यात आल्या.

बैठकीस सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत वाघे व सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील व सत्यपाल कांबळे, महावितरणचे सहाय्यक अभियंता संतोष कोरे, नगरपालिका विद्युत अभियंता प्रभाकर कांबळे, शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज उकळे यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!