कोळ्यात किरकोळ वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला!
तरुणाच्या बरगडीत चाकू खुपसला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

कोळ्यात किरकोळ वादातून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला!
तरुणाच्या बरगडीत चाकू खुपसला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी): मोटारसायकलच्या रेसिंगवरून झालेल्या किरकोळ वादातून कोळा येथे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशाल धनाजी मंडले (रा. करगणी, ता. आटपाडी, जि. सांगली) याने दिलेल्या जबाबानुसार, त्याच्या डाव्या बाजूच्या बरगडीत चाकू खुपसून गंभीर जखमी करण्यात आले. यावेळी त्याला काठीनेही मारहाण करण्यात आली आहे. जखमी विशाल मंडले याच्यावर सांगली येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विशाल मंडले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अवधूत सुभाष केंगार, यशवंत नवनाथ मोहिते, आदिनाथ नवनाथ मोहिते आणि शंभू गोविंद हातेकर यांच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विशाल मंडले याने दिलेल्या जबाबानुसार, त्याच्या भावकीतील शेखर मंडले आणि कोळा येथील यशवंत मंडले व आदिनाथ मोहिते यांच्यामध्ये दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास शुक्राचार्य देवाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकलच्या रेस करण्यावरून किरकोळ वादावादी झाली होती. हा वाद मिटवण्यासाठी अवधूत केंगार याने विशालला कोळा येथे येण्यास सांगितले होते. मात्र वेळ नसल्याने आपण दोन दिवसांत येतो, असे त्याने सांगितले.
दि. ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता विशालने अवधूत केंगार याला फोन केला. त्यावेळी भांडण मिटवण्यासाठी कोळा येथे येण्यास सांगण्यात आल्याने विशाल हा त्याचा चुलत भाऊ शरद तानाजी मंडले याच्यासोबत मोटारसायकलवरून सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान कोळा येथील माकुबाई मंदिरासमोरील चौकात पोहोचला.तेथे अवधूत केंगार, यशवंत मोहिते, आदिनाथ मोहिते आणि शंभू हातेकर उपस्थित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. विशालने मोटारसायकल थांबवून किरकोळ वाद मिटवूया, असे सांगितले. तसेच शेखर मंडले याच्याकडून माफी मागायला लावतो, असे सांगितले.
यावेळी अवधूत केंगार याने विशालला शिवीगाळ करत, ‘तू करगणीचा दादा आहेस का? तुला मस्ती आली आहे का?’ असे म्हणत वाद घातला. विशाल हा त्यांना समजावून सांगत असतानाच यशवंत मोहिते याने पॅन्टच्या खिशातून चाकू काढला. त्यानंतर अवधूत केंगार व यशवंत मोहिते यांनी ‘तुला आता जिवंत सोडणार नाही, तुला खलास करतो’, अशी धमकी दिली. यानंतर अवधूत केंगार याने विशालचे दोन्ही हात पाठीमागून पकडले आणि यशवंत मोहिते याने हातातील चाकू विशालच्या डाव्या बाजूच्या बरगडीत जोराने खुपसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. चाकू खोलवर गेल्याने तो पोटात अडकून राहिला. तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र चाकू निघाला नाही.
चाकूचा हल्ला झाल्यानंतर आदिनाथ मोहिते व शंभू हातेकर यांनी विशालला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘याला सोडू नका, मारून टाका’ असे म्हणत सर्वांगावर काठीने मारहाण करण्यात आली. या घटनेदरम्यान विशालचा चुलत भाऊ शरद मंडले यालाही आदिनाथ मोहिते व शंभू हातेकर यांनी काठीने मारहाण केली. दोघांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर शरद मंडले याने फोन करून गावातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर स्वप्निल बोडरे, राजेश मंडले, अक्षय मंडले आणि कन्हैया कांबळे हे घटनास्थळी आले. त्यांनी जखमी विशाल व शरद यांना मोटारसायकलवरून आटपाडी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. विशालच्या पोटात अडकलेला चाकू त्याने स्वतः बाहेर काढला आणि जखमेवर कापड बांधले. आटपाडी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सांगली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.



