राजकीय

विधानपरिषदेसाठी भाजपची रणनीती; कोणाची लागणार लॉटरी?

महायुतीचे निर्विवाद बहुमत; निंबाळकर, परिचारक, सातपुते, राऊत, पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच

विधानपरिषदेसाठी भाजपची रणनीती; कोणाची लागणार लॉटरी?

महायुतीचे निर्विवाद बहुमत; निंबाळकर, परिचारक, सातपुते, राऊत, पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच

सांगोला (प्रतिनिधी): चार वर्षांपासून रखडलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोर्चेबांधणीला वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रचंड संख्याबळामुळे ही जागा महायुतीच्या ताब्यात जाणे जवळपास निश्चित मानले जात असताना, आता खरी उत्सुकता भाजपची उमेदवारी नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याची लागली आहे.


जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींमध्ये भाजपने निर्माण केलेले वर्चस्व पाहता या निवडणुकीत विरोधकांची लढत अत्यंत कठीण मानली जात आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, आमदार राम सातपुते तसेच जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात भाजप ऐनवेळी ‘गनिमी कावा’ करत धक्कातंत्र वापरण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे. त्यामुळे चर्चेत नसलेले एखादे नाव अंतिम क्षणी पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सुमारे ५०१ सदस्य मतदान करणार आहेत. त्यामध्ये भाजपचे तब्बल २६२ सदस्य, शिवसेना शिंदे गटाचे ७१ आणि अजित पवार राष्ट्रवादीचे ४७ सदस्य मिळून महायुतीचे एकूण संख्याबळ ३८० पर्यंत पोहोचते. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना २७, काँग्रेस १९ आणि शरद पवार राष्ट्रवादीचे ३४ असे एकूण ७० सदस्य आहेत. तर अपक्ष व स्थानिक आघाड्यांचे मिळून ५१ सदस्य आहेत. या आकडेवारीवरून भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात असून त्यामुळेच उमेदवारीवरून पक्षांतर्गत स्पर्धा शिगेला पोहोचली आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव सर्वाधिक चर्चेत मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा पक्षासाठी त्यांनी माघार घेतली होती. विशेषतः २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांची समजूत काढण्यासाठी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट पंढरपुरात जाऊन चर्चा केली होती. त्यावेळी “परिचारक लवकरच विधीमंडळात दिसतील” असे संकेतही देण्यात आले होते. राज्यपाल नियुक्त जागा आणि विधानसभेतून विधान परिषद निवडणुकीतही परिचारक यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र त्यांना संधी मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी त्यांचा दावा अधिक प्रबळ मानला जात आहे.

संघटनेतून पुढे आलेले माळशिरसचे आमदार राम सातपुते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची संघटनात्मक ताकदही मोठी आहे. मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडीत त्यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांना समाजकल्याण सभापतीपद मिळाले आहे. त्यामुळे एकाच कुटुंबाला सलग मोठी राजकीय संधी दिली जाईल का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी तालुक्यात बाजार समिती, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. त्यामुळे संघटनात्मक ताकदीच्या जोरावर त्यांचाही दावा मजबूत मानला जात आहे. तथापि, बार्शीतील दीपक वैद्य यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले असल्याने पुन्हा बार्शीला विधान परिषदेची संधी मिळेल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव देखील राजकीय चर्चेत पुढे आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील समीकरणे आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना विधान परिषदेत पाठवण्याची शक्यता काही राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्याचवेळी जिल्ह्याबाहेरील एका बड्या नेत्याच्या नावाचीही चर्चा रंगली होती. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी “बाहेरचा-जिल्ह्यातला असा वाद निर्माण करण्याची गरज नाही, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील,” असे स्पष्ट केल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.

माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून आपली ताकद दाखवून दिली आहे. मात्र त्यांचा भाजपमधील प्रवेश तुलनेने अलीकडचा असल्याने पक्ष त्यांच्यावर एवढ्या लवकर विश्वास दाखवेल का, याकडेही लक्ष लागले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे संघटनेतून पुढे आलेले नेतृत्व मानले जाते. संघटनेशी असलेली त्यांची जवळीक आणि जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमधील स्वीकारार्हता लक्षात घेता त्यांनाही संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.

भाजपने अलीकडच्या काळात अनेक निवडणुकांमध्ये अनपेक्षित उमेदवार देत विरोधकांसह स्वतःच्या कार्यकर्त्यांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे सोलापुरातही ऐनवेळी नवीन चेहरा पुढे येऊ शकतो, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अंतिम निर्णयाची सूत्रे असल्याचे मानले जात आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा समीकरणांचा विचार करूनच उमेदवारी निश्चित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद…..एकूण सदस्य : ६८
भाजप : ३८
अजित पवार राष्ट्रवादी : ११
शरद पवार राष्ट्रवादी : ५
शिंदे शिवसेना : ८
इतर : ६

पंचायत समित्या
११ पैकी १० सभापती भाजपचे
१ सभापती शिवसेना शिंदे गटाचा

सोलापूर महापालिका…..एकूण सदस्य : १०२
भाजप : ८७
एमआयएम : ८
शिंदे शिवसेना : ४
काँग्रेस : २
अजित पवार राष्ट्रवादी : १

नगरपालिका व नगरपंचायती…..एकूण सदस्य : ३४९
भाजप : १३७
शिंदे शिवसेना : ५९
अजित पवार राष्ट्रवादी : ३४
महायुती एकूण : २३०
महाविकास आघाडी : ७३
स्थानिक आघाड्या : ४२

१९८५ पासूनचे विधान परिषद आमदार
१९८५ ते १९९१ — ब्रह्मदेव माने (काँग्रेस)
१९९१ ते १९९७ — युनूस शेख (काँग्रेस)
१९९७ ते २००३ — सुभाष देशमुख (भाजप)
२००३ ते २००९ — रणजितसिंह मोहिते-पाटील (राष्ट्रवादी)
२००९ ते २०१५ — दीपकआबा साळुंखे-पाटील (राष्ट्रवादी)
२०१६ ते २०२२ — प्रशांत परिचारक (अपक्ष-भाजप पुरस्कृत)

निवडणूक कार्यक्रम
२५ मे : अधिसूचना जारी
१ जून : अर्ज भरण्याची अंतिम मुदत
२ जून : अर्ज छाननी
४ जून : अर्ज माघारीची अंतिम तारीख
१८ जून : मतदान
२२ जून : मतमोजणी
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात असला, तरी उमेदवारी कोणाला मिळणार यावरून आता जिल्ह्याचे राजकारण तापणार हे निश्चित मानले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!