गुन्हेगारी

“तीनपट पैशाचे आमिष; १० लाख चलाखीने लंपास!”

सांगोल्यात खळबळ : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, चलाख टोळीचा पर्दाफाश

“तीनपट पैशाचे आमिष; १० लाख चलाखीने लंपास!”

सांगोल्यात खळबळ : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, चलाख टोळीचा पर्दाफाश

सांगोला (प्रतिनिधी): “१० लाखांचे ३० लाख करून देतो” या आमिषाला बळी पडलेल्या गायगव्हाण (ता. सांगोला) येथील शेतकरी शांतीलाल हणुमंत साळुंखे (वय ४८) यांची तब्बल १० लाख रुपयांची हातचलाखीने फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोऱ्या कागदाच्या बंडलांचा वापर करून आरोपींनी अक्षरशः डोळ्यांदेखत पैसे लंपास केल्याने सांगोल्यात खळबळ उडाली आहे. याबाबत, शांतीलाल हणुमंत साळुंखे गायगव्हाण, ता.सांगोला यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार चंदू विठ्ठलराव आर्शिद रा. धामणकरनाका, कामतघर भिंवडी, रमेश विष्णु दंडी रा. सोनारपाडा भिंवडी, सज्जन कोंडीबा पवार रा, खंडाळी ता. माळशिरस, निलेश सिद्धे रा. कामतघर भिंवडी, मनोज सोनवणे रा. शेगाव, जि. बुलढाणा आणि एक अनोळखी इसम यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत, पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी शांतीलाल हणुमंत साळुंखे रा. गायगव्हाण, ता.सांगोला यांचा भाचा धनाजी सोपान दिवसे रा. घेरडी ता. सांगोला यांनी साळुंखे यांना फोन करुन तीनपट पैसे करुन देणारे मनोज सोनवणे व सज्जन पवार हे माझ्या ओळखीचे आहेत असे सांगून पैसे गुंतवणुक करणार असेल तर सांगा असे सांगितले होते. त्यानतर फिर्यादी शांतीलाल साळुंखे यांना जास्त कर्ज झाले असल्याने त्यांनी स्वतःची जमीन नवनाथ कर्चे व अंकुश माने रा. खिलारवाडी, बापुराव शिंदे, रामचंद्र मोरे दोघे रा. भोसे ता. पंढरपूर यांना लिहून दिली असल्याने ती जमीन सोडण्याकरीता फिर्यादीला पैश्याची आवश्यकता होती. म्हणून फिर्यादी शांतीलाल साळुंखे व त्यांचा भाचा धनाजी दिवसे यांनी मनोज सोनवणे व सज्जन पवार यांना फोन करुन आम्हाला पैश्याची गरज असुन आम्ही 10 लाख रुपये व्यवस्था करतो तुम्ही त्याचे तीनपट करुन द्या असे सांगितले. त्यानंतर साळुंखे यांनी मुलगी पुजा व तिची सासु वंदना यांचे दागिने सोनारकडे गहाण ठेवून 9 लाख रुपयाची व्यवस्था केली. तसेच जावई नागेश भोसले यांचेकडुन 50 हजार रुपये व स्वतःचे 50 हजार रुपये असे मिळून 10 लाख रुपयाची व्यवस्था केली.

त्यानंतर चंदू विठ्ठलराव आर्शिद रा. धामणकरनाका, कामतघर भिंवडी, रमेश विष्णु दंडी रा. सोनारपाडा भिंवडी, निलेश सिद्धे रा. कामतघर भिंवडी आणि एक अनोळखी इसम असे महूद गावात आल्यावर साळुंखे यांनी त्यांना भेटून पैश्याची व्यवस्था झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर वरील चौघेजण फिर्यादी शांतीलाल साळुंखे यांच्या घरी गेले. त्यांनी फिर्यादी शांतीलाल साळुंखे यांना तीनपट पैसे करुन देतो असे सांगुन त्यांच्याकडील 10 लाख रु. घेतले. तसेच त्यांनी साळुंखे यांना बोलण्यात गुंतवून व हातचलाखीने 10 लाख रुपये घरीच ठेवले असल्याचे सांगुन त्यांनी त्यांच्याकडील बॉक्स ठेवून साळुंखे यांची पैश्याची बॅग घेवून गेले. त्यानंतर फिर्यादी शांतीलाल साळुंखे व त्यांच्या नातेवाईकांना संशय आल्याने घरी ठेवलेले पैसे पाहीले असता आम्हाला पैसे मिळुन आले नाहीत. सदर बॉक्समध्ये 500 रु नोटाच्या साईजचे कोऱ्या कागदाचे बंडल दिसून आले.
त्यानंतर त्यांनी महूद येथे जावून शोध घेतला असता त्याठिकाणी चंदु विठ्ठलराव आर्शिद रा. धामणकरनाका, कामतघर भिंवडी, रमेश विष्णु दंडी रा. सोनारपाडा भिंवडी, सज्जन कोंडीबा पवार रा, खंडाळी ता. माळशिरस हे मिळुन आले. तेव्हा त्यांचेसोबतचे निलेश सिद्धे व एक अनोळखी इसम हे पैसे घेवून पळुन गेले. त्यानंतर साळुंखे यांनी त्यांच्या मोबाईलवरती संपर्क साधला असता त्यांनी साळुंखे यांच्या फोन पे वरती 1 लाख रुपये पाठवून उरलेले पैसे परत पाठवून देतो असे सांगितले. उरलेले पैसे मिळणार नाहीत हे समजल्यावर फिर्यादी शांतीलाल साळुंखे, त्यांचे नातेवाईक प्रमोद शेळके, कांतीलाल साळुंखे, धनाजी दिवसे, यांच्या मदतीने चंदु विठ्ठलराव आर्शिद, रमेश विष्णु दंडी, सज्जन कोंडीबा पवार यांना तिघांना पोलीस ठाण्यास घेवून आले. अशी फिर्याद शांतीलाल साळुंखे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात दिली आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!