जिल्ह्यात ४ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा बहरणार खरिपातील पिके..!

जिल्ह्यात ४ लाख ९९ हजार हेक्टरवर यंदा बहरणार खरिपातील पिके..!
२ लाख ५१ हजार मे.टन खताचे आवंटन मंजूर, १ लाख ४५ हजार ४२७ मे. टन खत उपलब्ध
सांगोला (दिलीप घुले): जून महिन्यापासून खरीप पिकांच्या लागवडीला सुरुवात होणार आहे. त्याची तयारी कृषी विभागाने आतापासूनच केली आहे. खते, बियाणे, कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ४ लाख ९९ हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्याचे लक्षांक कृषी विभागाने ठेवले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली.
यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीन १ लाख ४७ हजार हेक्टर, मका ९५ हजार हेक्टर, तूर ९२ हजार हेक्टर, मूग १३ हजार ५०० हेक्टर, उडीद १ लाख १० हजार हेक्टर, बाजरी २६ हजार हेक्टर, इतर पिके १५ हजार ५०० हेक्टर असे ४ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे.

तालुकानिहाय खरीप हंगामातील प्रस्तावित पेरणीचे नियोजन पुढीलप्रमाणे, उत्तर सोलापूर ३० हजार ५०० हेक्टर, दक्षिण सोलापूर ४५ हजार ५०० हेक्टर, बार्शी १ लाख १० हजार ६०० हेक्टर, अक्कलकोट ७८ हजार ६०० हेक्टर, मोहोळ २४ हजार ५०० हेक्टर, माढा ४५ हजार ५०० हेक्टर, करमाळा ५३ हजार २०० हेक्टर, पंढरपूर १० हजार ३१७ हेक्टर, सांगोला ३९ हजार हेक्टर, माळशिरस २० हजार १०० हेक्टर, मंगळवेढा ३८ हजार ६०० हेक्टर असे एकूण ४ लाख ९९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन केले आहे.
खरिपात शेतकऱ्यांना खताची कमतरता पडू नये, यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यासाठी केलेल्या मागणीनुसार कृषी आयुक्तालयाने २ लाख ५१ हजार ९०० मेट्रिक टन खत खतांचे आवंटन मंजूर झाले असून सध्या १ लाख ४५ हजार ४२७ मे. टन खत उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले दिली.

युरिया ९९ हजार ४०० मे. टन, कॉम्प्लेक्स ८५ हजार ५०० मे. टन, डीएपी २६ हजार ८०० मे.टन, एमओपी १२ हजार १०० मे. टन, एसएसपी २८ हजार ६०० मे.टन असे जिल्ह्यात एकूण २ लाख ५१ हजार ९०० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले आहे. खरीप हंगामासाठी सोयाबीन ४९ हजार क्विंटल, मका ९ हजार क्विंटल, तूर ७ हजार १२५ क्विंटल, उडीद ५ हजार ५१३ क्विंटल, बाजरी ७०० क्विंटल इतकी बियाणांची मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खते, बियाणे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. पिकांची वेळेवर पेरणी व लागवड होण्यासाठी बियाणे उपलब्ध असणे आवश्यक आहे. खासगी व महाबिजकडून बियाणे जिल्ह्यात उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना खते,बियाणे वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. खते, बियाणे खरेदी करताना एखादा दुकानदार शेतकऱ्याची फसवणूक करीत असेल तर त्याची तक्रार ताबडतोब लगतच्या कृषी अधिकाऱ्याकडे करावे. त्याची तत्काळ दखल घेतली जाईल. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी केंद्रांमधूनच निविष्ठा घ्यावी. सोबत बिल सुध्दा घ्यायला विसरू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.


