हक्काच्या दोन टीएमसी पाण्यासाठी १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा

हक्काच्या दोन टीएमसी पाण्यासाठी १५ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा
सांगोल्याचे दोन टीएमसी पाणी कागदावरच, अस्तरीकरणानंतरही पाणी मिळेना, आश्वासन नको, प्रत्यक्ष पाणी द्या’ अशी आक्रमक मागणी,
सांगोला (प्रतिनिधी): सांगोला : निवडणुका आल्या की पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येतो… शेतकऱ्यांना आश्वासने दिली जातात… पाणीप्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली जाते; मात्र निवडणुका संपल्या की हीच आश्वासने हवेत विरतात आणि शेतकऱ्यांना पुन्हा हक्काच्या पाण्यासाठी आंदोलनाची वाट धरावी लागते. आश्वासनांची खैरात होते; मात्र निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांना पुन्हा हक्काच्या पाण्यासाठी आंदोलने, निवेदने आणि संघर्षाची वाट धरावी लागते.
निरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक ५च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नाही. अस्तरीकरणामुळे पाण्याची बचत होत असल्याचे सांगितले जाते, वाढीव पाण्याची उपलब्धताही बोलली जाते; मग फाटा क्र. ५च्या शेतकऱ्यांच्या हक्काचे दोन टीएमसी पाणी नेमके जाते कुठे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
सांगोला तालुका कायमच पाणीटंचाई आणि अनिश्चित पर्जन्यमानाचा सामना करीत आला आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने सांगोला तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. पेरणी झालेली खरीप पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. पाऊस वेळेत झाला नाही तर पिकांचे नुकसान होण्याबरोबरच पुढील काळात चारा, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. पेरणी झालेली खरीप पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून भविष्यात चारा व पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळणे अपेक्षित असताना त्यासाठी पुन्हा प्रशासनाच्या दारात धाव घ्यावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
फाटा क्रमांक ५ला पाणी मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी संघर्ष करीत आहेत. फाटा क्रमांक ५साठी दोन टीएमसी पाणी मंजूर असल्याचे सांगितले जाते. त्याचबरोबर कालव्याच्या अस्तरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊन सुमारे साडेचार टीएमसी वाढीव पाणी उपलब्ध झाल्याचा दावा केला जातो. मग या वाढीव पाण्यातील फाटा क्रमांक ५च्या शेतकऱ्यांच्या हक्काचे दोन टीएमसी पाणी त्यांना का मिळत नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पाणी बचतीसाठी कालव्याचे अस्तरीकरण करण्यात आले. मात्र, ज्या भागात शेतकऱ्यांना पाण्याची नितांत गरज आहे, त्या ठिकाणी पाणीच पोहोचत नसेल तर अस्तरीकरणाचा उद्देश काय? असा सवाल शेतकरी करीत आहेत. अस्तरीकरणामुळे पाणी शिल्लक राहत असेल तर ते पाणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी वापरले जावे, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच बारमाही पाणी असलेल्या भागातील अस्तरीकरणाच्या परिणामकारकतेबाबतही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
फाटा क्रमांक ५च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी सुमारे दहा दिवसांपूर्वी प्रशासनाकडे निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यावेळी ५ ऑगस्ट रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, १२ ऑगस्ट उजाडूनही कालव्यात पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे ‘आश्वासनांवर विश्वास ठेवायचा तरी किती वेळा?’ असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
पावसाअभावी खरीप पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. त्याचबरोबर पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे आता केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कालव्यात पाणी सोडा, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
फाटा क्रमांक ५च्या पाण्यामुळे चिणके, अनकढाळ, अजनाळे, वाटंबरे, कमलापूर, यलमर मंगेवाडी, सांगोला, वासुद, अकोला, कडलास तसेच सांगोला शहरातील वाडी-वस्त्यांसह लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ काही शेतकऱ्यांचा नसून मोठ्या लाभक्षेत्राच्या पाण्याशी संबंधित असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीत तरी फाटा क्रमांक ५ला हक्काचे दोन टीएमसी पाणी उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांची पाण्यासाठीची फरफट थांबवावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने पाणी सोडले नाही तर १५ ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
निवेदन देताना बाबुराव गायकवाड, तानाजी पाटील, विठ्ठल गायकवाड, अरविंद केदार, योगेश खटकाळे, अरुण बिले, सोमनाथ अनुसे, सुनील गायकवाड, राहुल गव्हाणे, हनुमंत लिगाडे, मनोज उकळे, संतोष तेली यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘किती दिवस पाण्यासाठी लढायचे?’
“निरा उजवा कालव्याच्या कॅनॉल मैल ९३ पासून सांगोला-पंढरपूरसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करावी. फाटा क्रमांक ५ला अस्तरीकरणातून बचत झालेले दोन टीएमसी पाणी नियमितपणे लवकर सोडावे. किती दिवस पाहण्यासाठी लढायचे? आम्हाला फक्त आश्वासने मिळतात, पाणी मात्र मिळत नाही. हक्काच्या पाण्यासाठी १५ ऑगस्टपासून आंदोलन करणार आहोत,” असा इशारा शेतकरी तानाजीकाका पाटील यांनी दिला.
“दुष्काळी परिस्थितीतही आम्हाला पाणी मिळत नाही, हे आमचे दुर्भाग्य आहे. पक्ष-पार्टीने शेतकऱ्यांना करायचे तरी काय? आता फाटा क्रमांक ५ला हक्काचे पाणी मिळविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी आमचे आंदोलन आर या पारचे असेल. आमचे पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे,” असा निर्धार शेतकरी योगेश खटकाळे यांनी व्यक्त केला.
छायाचित्र ओळ : निरा उजवा कालव्याच्या फाटा क्रमांक ५ला पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार बाळूताई भागवत यांना देताना लाभक्षेत्रातील शेतकरी.


